भाग – 22
तो तिला आतल्या खोलीत घेऊन गेला, आणि एका सुंदरशा सोफ्यावर बसायला सांगितलं. ती अजूनही सावध होती, कानासमोर कुठलाही आवाज आला की दचकायची… तो तिच्यासमोर शांतपणे बसला… पण नजरेत एक वेगळीच उत्सुकता होती – कसली असेल ती उत्सुकता तिला फसवण्याची की, तिला समजून घेण्याची?
तो तिच्यासमोर बसलेला, हातात पाण्याचा ग्लास घेत हलक्या आवाजात म्हणाला, “आता थोडं बरं वाटतंय का? घाबरू नकोस, मी इथे आहे. पण मला सांग, नक्की काय झालं?”
आराध्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेतला संयम, काळजी आणि कोणताही अडथळा न आणणारा संयोजित शांतपणा तिच्या मनाला हळूहळू आधार देऊ लागला. तिने थोडा खोल श्वास घेतला, थरथर थोडी कमी झाली. मग तिने हळूहळू बोलायला सुरुवात केली…
“माझ्या बहिणी नं — अन्वी आणि तिच्या मित्राने मला कामाच्या इंटरव्ह्यूच्या नावाखाली इकडे आणलं. ही जागा पाहून आधीच मनात संशय आला होता, पण… विश्वास ठेवून आले.”
“मी फ्रेश होऊन बाहेर आले, तेव्हा दोघं गायब झाले होते. दरवाजा बंद… मी घाबरले होते. रूमबाहेर कुणाचा तरी आवाज जाणवला…”
ते कुणीतरी आत येतील, या भीतीनं मी दार बंद केलं… पण मग काही हालचाल झाली अन् ते आत यायचा प्रयत्न करू लागले…”
तिचे डोळे पाणावले होते.
“…तेव्हा मला काही सुचत नव्हतं. नंतर गॅलरीतून बाजूच्या खोलीत जायचं ठरवलं. पडद्याआडून गॅलरी ओलांडली… देवाचं नाव घेत उडी मारली, स्वतःला वाचवायला… काहीही झालं असतं माझं…”
तो तिचं शांतपणे ऐकत होता. तिचं बोलणं ऐकताना त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्टपणे दिसत होती. तिला थोडं पाणी आणून दिलं, आणि म्हणाला,
“तुझं धाडस खरंच मोठं आहे आणि तू इथे आलीस, हे चांगलंच झालं. आता मी आहे. घाबरू नकोस… पण हे सर्व आपल्याला पोलिसांपर्यंत पोहचवायचंय. तुझी परवानगी असेल तर मी मदत करू शकतो.”
हेही वाचा – आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…
आराध्या त्याच्याकडे एकटक पाहात राहते… एकदम नवखा माणूस, पण त्याच्यात एक आश्वास्त करणारं सौम्यपण जाणवतं होतं.
“नाही पोलिसात नको… उद्या अन्वी आणि शेखरला पकडलं तर घरात वादंग होतील… पोलीस नको!”
त्या उद्याची भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवली. त्याने फोन उचलला आणि खिडकीशी जाऊन उभा राहिला. त्याचा चेहरा गंभीर होता, पण बोलण्यात घाई नव्हती. त्याने थेट आपल्या विश्वासू माणसाला – दत्ताला – कॉल केला.
“दत्ता, माझ्या रूमशेजारी काहीतरी विचित्र घडलंय. एक मुलगी इथे माझ्याकडे आलीय– गडबडीत. ती थरथरत होती. तू ताबडतोब ती रूम चेक कर, मी पाठवत आहे डिटेल्स. काही संशयास्पद वाटलं तर मला लगेच कळव.”
आराध्या अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत सोफ्यावर बसली होती, पण आता तिच्या नजरेत एक वेगळी जिज्ञासा होती – कोण होता हा माणूस, जो इतक्या आत्मविश्वासाने तिच्यासाठी काही करत होता!
दत्ताचा कॉल परत येतो. तो शांतपणे फोन कानाला लावतो. दुसऱ्या टोकावर दत्ता बोलतो —
“सर, रूम नंबर 408… आत फक्त एक बॅग सापडली. खोली व्यवस्थित वाटते, पण कॅमेऱ्यात एक गोष्ट दिसली… जिच्या सोबत ही आलेली होती, ती मुलगी आणि तिचा मित्र – दोघं मिळून प्लॅन करत होते… त्या मुलीला रूममध्ये एकटीला सोडून निघून गेले. असं वाटतं, त्यांना तिचा काही ‘वापर’ करायचा होता… बहुधा ब्लॅकमेल, किंवा काही जास्त गंभीर…”
त्याचं मन अस्वस्थ झालं. त्याने फोन ठेवला. चेहऱ्यावर हलकासा संताप दिसत होता. तो आराध्याकडे वळला…
“ते दोघं – अन्वी आणि शेखर – तुला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आणून सोडून गेले. ते काही तरी वेगळं करत होते. शक्य आहे की, त्यांना तुझ्याकडून काही मिळवायचं होतं… की जे तुला अजून माहीतही नाही!”
आराध्या थक्क होते.
“पण का? मी कोण आहे त्यांच्या दृष्टीने? माझ्याकडे असं काय आहे?”
तो थोडा वेळ तिच्याकडे पाहतो… शांतपणे विचार करत राहतो.
“कदाचित हे तुला हळूहळू कळेल. पण एक लक्षात ठेव – तू अजिबात एकटी नाहीस. आता, तुला सुरक्षित ठेवणं, ही माझी जबाबदारी आहे.”
आराध्याच्या श्वासाची लय सामान्य होते, हळूहळू ती स्थिर होते.
तो शांतपणे उठतो. त्याच्या डेस्कवर तिने ठेवलेली फाइल उचलतो आणि काळजीपूर्वक ती चाळायला लागतो. प्रत्येक पानावर नजर फिरवताना त्याचे डोळे क्षणाक्षणाला अधिक गंभीर होत जातात. काही वेळाने, तो फाइल बंद करतो आणि आराध्याकडे पाहून सौम्य स्वरात म्हणतो —
“आराध्या… तुझ्या प्रोफाइल आणि एकूणच वागणुकीवरून एक गोष्ट स्पष्ट होते – तू खूपच प्रामाणिक आणि बुद्धिमान आहेस. इतक्या परिस्थितीत तू स्वतःला सावरलं… ही लहानसहान गोष्ट नाही.”
ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहात राहते.
“मी तुला माझ्या कंपनीच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एक जबाबदारीचं काम देतोय. सुरुवातीला सीनियर असिस्टंट म्हणून. योग्य मार्गदर्शन आणि तुझी मेहनत… दोन्ही असतील तर तू खूप पुढे जाशील.”
आराध्याच्या डोळ्यांत आश्चर्य आणि आनंदाची चमक एकत्र दिसते.
“पण…” तो हलकेच बोटाचा इशारा करत म्हणतो, “हे सगळं तू घरच्यांना एक वेगळ्याच पद्धतीने सांगायचं आहेस.”
“कसं?”
“घरी सांग की, तुझा इंटरव्ह्यू झाला आणि त्यात तुला यश मिळालं, जॉब मिळाला… आणि हीच ती बिल्डिंग आहे, जिथे तुझी निवड झाली. अन्वी कुठे गायब झाली, काय घडलं – हे काहीच सांगायचं नाही. तूर्तास तरी नाही.”
“पण… का?”
“कारण सध्याची परिस्थिती हाताळणं. हे माझं काम आहे. तू सुरक्षित आहेस, आणि राहशील. पण हे गुंतागुंतीचं आहे.”
“जे काही त्या अन्वी आणि शेखरने केलं, त्याच्यामागे काहीतरी मोठं कारस्थान आहे. तू उगाच चर्चेचा भाग होऊ नकोस आणि तू आता माझ्या विश्वासात आहेस!”
आराध्या गहिवरते. तिला प्रथमच वाटतं – ती कुठल्याशा अंधाऱ्या रहस्यात अडकली असली, तरी तिचं मार्गदर्शन करायला एक प्रकाशसदृश व्यक्तिमत्व तिच्या पाठीशी उभं आहे.
ती हलकेच हसते आणि म्हणते —
“ठीक आहे. मी तसंच सांगेन आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.”
तो तिच्या फाइलवर सही करतो… आता केवळ जॉबची नोंद नाही, तर एका नव्या नात्याचीही सुरुवात होते…
आराध्या आपली फाइल हातात घेते आणि त्याची सही पाहून चक्रावते…. ‘शर्वाय जहागीरदार’
शर्वायनं खिडकीजवळ जात लगेचच दत्ताला फोन लावला, आवाजात नेहमीसारखा आदेशात्मक थंडपणा होता…
“दत्ता, आराध्याला घरी सोडण्यासाठी गाडी पाठव. तिला कोणतीही अडचण येऊ देऊ नकोस. आणि ड्रायव्हरला सांग, घराजवळ कुणाला काही विचारायचं नाही.”
“गॉट इट, सर,” दत्ताने तत्परतेने उत्तर दिलं.
घरापासून काही अंतरावर आराध्या गाडीतून उतरली. ड्रायव्हरला ‘थँक्स’ बोलून ती घराकडे निघाली.
तिच्या चेहऱ्यावर अजूनही हलकासा गोंधळ होता, पण ती ठरवलेलं बोलायला विसरली नव्हती.
घरात प्रवेश करताच आईने लगेच विचारलं, “काय झालं? इंटरव्ह्यू कसा झाला गं?”
ती हलकंसं हसली, “झाला… आणि जॉबही मिळाला! कॉर्पोरेट ऑफिसमध्ये… जहागीरदार इंडस्ट्रीजमध्ये!”
प्राजक्ताच्या डोळ्यात चमक उमटली… “व्वा! एवढ्या मोठ्या कंपनीत? अभिनंदन!”
तिने अजून काही विचारू नये म्हणून आराध्याने पटकन पुढचं वाक्य टाकलं, “HR नं सांगितलं – ट्रेनिंग लवकर सुरू होईल, पण तोवर कुणालाही ऑफिसच्या डिटेल्सबद्दल बोलू नका.”
हेही वाचा – तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…
आईने त्याबद्दल आणखी चौकशी केली नाही. “बरोबरच आहे… सगळं स्थिर झाल्यावरच सांगावं.”
मात्र, त्या सगळ्या गोंधळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली — निशा घरी नव्हती.
“निशा काकी कुठे आहे?” आराध्याने सहज विचारलं.
आई म्हणाली, “अगं, ती काही फाइल्स घेऊन काकाच्या ऑफिसला जातेय म्हणाली. पण अजून परतलेली नाही…”
आराध्याला काहीतरी चुकल्याचे हलकेसे संकेत मिळाले, एक लहर गेली — ती नसावी तेव्हाच का मी घरात आले? तिचा चेहरा जरी स्थिर असला तरी मनात विचारांची साखळी सुरू होती…
“निशा खरोखर काकाकडेच गेली आहे की…? आणि का?”
तिला आता जाणवत होतं, ती एकटी नाही… आणि खेळ अजून गडद होत चालला आहे.


