सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
अहो शेषाचेहि डोळे चोरिले । वेद जयालागीं झकविले । लक्ष्मीयेही परि राहिलें । जिव्हार जें ॥118॥ तें आतां प्रगटुनी अनेकधा । करीत विश्वरूपदर्शनाचा धांदा । बाप भाग्या अगाधा । पार्थाचिया ॥119॥ जो जागता स्वप्नावस्थे जाये । तो जेवीं स्वप्नींचें आघवें होये । तेवीं अनंत ब्रह्मकटाह आहे । आपणचि जाहला ॥120॥ तेथिंची सहसा मुद्रा सोडिली । आणि स्थूळदृष्टीची जवनिका फाडिली । किंबहुना उघडिली । योगऋद्धि ॥121॥ परि हा हें देखेल कीं नाहीं । ऐसी सेचि न करी कांहीं । एकसरां म्हणतसे पाहीं । स्नेहातुर ॥122॥
श्रीभगवानुवाच :- पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः । नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥5॥
अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें । आणि तेंचि दावूं तरि काय दाविलें । आतां देखें आघवें भरिलें । माझांचि रूपीं ॥123॥ एकें कृशें एकें स्थूळें । एकें ऱ्हस्वें एकें विशाळें । पृथुतरें सरळें । अप्रांतें एकें ॥124॥ एकें अनावरें प्रांजळें । सव्यापारें निश्चळें । उदासीनें स्नेहाळें । तीव्रें एकें ॥125॥ एकें घूर्णितें सावधें । असलगें एकें अगाधें । एकें उदारें अतिबद्धें । क्रुद्धें एकें ॥126॥ एकें संतें सदामदें । स्तब्धें एकें सानंदें । गर्जितें निःशब्दें । सौम्यें एकें ॥127॥ एकें साभिलाषें विरक्तें । उन्निद्रितें एकें निद्रितें । परितुष्टें एकें आर्तें । प्रसन्नें एकें ॥128॥ एकें अशस्त्रें सशस्त्रें । एकें रौद्रें अतिमित्रें । भयानकें एकें पवित्रें । लयस्थें एकें ॥129॥ एकें जनलीलाविलासें । एकें पालनशीलें लालसें । एकें संहारकें सावेशें । साक्षिभूतें एकें ॥130॥ एवं नानाविधें परि बहुवसें । आणि दिव्यतेजप्रकाशें । तेवींचि एकएकाऐसें । वर्णेंही नव्हे ॥131॥
हेही वाचा – Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे
अर्थ
अहो, जे हजार डोळे असलेल्या शेषाच्या दृष्टीसही पडू दिले नाही, वेदांना ज्याचा पत्ता लागू दिला नाही (फार काय सांगावे?) लक्ष्मी हे भगवंताचे कुटुंब खरे, पण तिलाही जे दाखविले नाही, असे जे भगवंताच्या जीवाचे गुह्य विश्वरूप ॥118॥ ते आता अनेक प्रकारांनी प्रकट करून, देव विश्वरूप दाखविण्याचा व्यवहार करू लागले. अर्जुनाच्या अपार भाग्याची धन्य आहे! ॥119॥ जागा असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर तो जसा स्वप्नातील सर्व वस्तू आपणच बनून राहतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपणच अनंत ब्रह्मांडे बनून राहिलेला आहे. ॥120॥ श्रीकृष्णांनी तेथील विश्वरूपाचा आकार एकदम प्रकट केला आणि स्थूल दृष्टीचा पडदा फाटला (दूर केला). फार काय सांगावे? त्याने तो आकार म्हणजे आपले योगाचे वैभव प्रकट केले. ॥121॥ परंतु हा अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल की नाही, हे देवांनी काही लक्षातच घेतले नाही, तर अर्जुनाच्या प्रेमामुळे उतावळे होऊन एकाएकी अर्जुनास ‘पाहा, पाहा’ असे म्हणावयास लागले. ॥122॥
श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, नाना प्रकारची, नाना वर्णांची आणि नाना आकृतींची माझी शेकडो, हजारो (दिव्य) रूपे पाहा. ॥5॥
अर्जुना तू एक विश्वरूप दाखवा, असे म्हटलेस, आणि आम्ही तेच (एकच विश्वरूप) दाखविले, तर त्यात आम्ही काय मोठेसे दाखवले? तर आता तू असे पाहा की, सर्व (विश्व) माझ्या स्वरूपात सामावलेले आहे. ॥123॥ काही रोडकी, काही लठ्ठ, काही ठेंगू, काही प्रशस्त, काही फारच विस्तृत, सडपातळ आणि काही अमर्याद, ॥124॥ काही न आवरणारी आणि काही प्रामाणिक, काही सक्रिय आणि काही निष्क्रिय, काही उदासीन, काही प्रेमळ, काही कडक, ॥125॥ काही धुंद, काही सावध, काही उघड आणि काही गूढ, काही उदार, काही कृपण, आणि रागावलेली काही ॥126॥ काही सदाचरणी, काही सदा मदोन्मत्त, काही स्तब्ध, काही आनंदित, काही गर्जना करणारी, काही शब्दरहित आणि काही शांत ॥127॥ काही आशाखोर, आणि काही निराश, काही जागी झालेली आणि काही झोपलेली, काही सर्व बाजूंनी संतुष्ट, काही पीडित आणि काही प्रसन्न, ॥128॥ काही बिनहत्यारी आणि काही हत्यारी, काही तामसी आणि काही अतिशय स्नेहाळू आणि काही भयंकर, काही पवित्र आणि काही समाधीत असलेली, ॥129॥ काही उत्पन्न करण्याचा स्वभाव असलेली, काही मोठ्या आवेशाने संहार करणारी, काही तटस्थ म्हणून राहिलेली, ॥130॥ याप्रमाणे अनेक प्रकारची, परंतु पुष्कळ आणि दिव्य तेजाने प्रकाशरूप, अशी ती रूपे होती. त्याचप्रमाणे वर्णाच्याही बाबतीत ती रूपे एकसारखी एक नव्हती. ॥131॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तुझें विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे


