सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
आणि जी आर्तीचेनि पडिभरें । आर्तु आपुली ठाकी पैं विसरे । तान्हेला म्हणे न पुरे । समुद्र मज ॥91॥ ऐसी सचाडपणाचिये भुली । न सांभाळवे समस्या आपुली । यालागीं योग्यता जेवीं माउली । बाळकाची जाणे ॥92॥ तयापरी जनार्दना । विचारिजो माझी संभावना । मग विश्वरूपदर्शना । उपक्रम कीजे ॥93॥ तरी तैसी ते कृपा करा । एऱ्हवीं नव्हे हें म्हणां अवधारा । वायां पंचमालापें बधिरा । सुख केऊतें देणें ॥94॥ एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे । मेघ जगापुरतें काय न वर्षे । परि जहालीही वृष्टि उपखे । जऱ्ही खडकीं होय ॥95॥ चकोरा चंद्रामृत फावलें । येरा आण वाहुनि काय वारिलें । परि डोळ्यांवीण पाहलें । वाया जाय ॥96॥ म्हणोनि विश्वरूप तूं सहसा । दाविसी हा कीर भरवंसा । कां जे कडाडां आणि गहिंसा- । माजी नित्य नवा तूं कीं ॥97॥ तुझें औदार्य जाणों स्वतंत्र । देतां न म्हणसी पात्रापात्र । पैं कैवल्याऐसें पवित्र । कीं वैरियांही दिधलें ॥98॥ मोक्षु दुराराध्यु कीर होय । परी तोही आराधी तुझे पाय । म्हणोनि धाडिसी तेथ जाय । पाइकु जैसा ॥99॥ तुवां सनकादिकांचेनि मानें । सायुज्यीं सौरसु केला पूतने । जे विषाचेनि स्तनपानें । मारूं आली ॥100॥ हां गा राजसूयाचां सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वादीं । निस्तंजिलासी ॥101॥ ऐशिया अपराधिया शिशुपाळा । आपणपयां ठावो दिधला गोपाळा । आणि उत्तानचरणाचिया बाळा । काय ध्रुवपदीं चाड ॥102॥ तो वना आला याचिलागीं । जे बैसावें पितयाचां उत्संगीं । कीं तो चंद्रसूर्यादिकांपरिस जगीं । श्लाघ्यु केला ॥103॥ ऐसा वनवासिया सकळां । देतां एकचि तूं धसाळा । पुत्रा आळवितां अजामिळा । आपणपें देसी ॥104॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…
अर्थ
महाराज, आणि इच्छा वाढली म्हणजे उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो. (ज्याप्रमाणे) फार तहान लागलेल्या मनुष्यास, ‘मला समुद्रही पुरणार नाही’ असे वाटते, ॥91॥ याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेडाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही. म्हणून ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाची योग्यता जाणते, ॥92॥ त्याप्रमाणे हे जनार्दना, माझी योग्यता किती आहे, याचा आपण विचार करा आणि मग विश्वरूप दाखविण्यास आरंभ करा. ॥93॥ तरी माझ्या योग्यतेनुरूप कृपा करा. (एरवी माझी विश्वरूप पाहाण्याची योग्यता नसेल तर) तुला विश्वरूप दाखविणे शक्य नाही, असे स्पष्ट सांगा. पाहा, बहिर्या मनुष्याला पंचम स्वरातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न करणे, हे कोठचे? ॥94॥ सहज पाहिले तर, मेघ हा एकट्या चातकाची तहान भागवण्याकरिता पर्जन्यवृष्टी करतो, ती वृष्टी जगापुरती होत नाही काय? परंतु तीच पर्जन्यवृष्टी खडकावर झाली तर वृष्टी होऊनसुद्धा व्यर्थ ठरते. ॥95॥ चकोर पक्ष्याला चंद्रामृत प्राप्त झाले, तेच चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊ नका, म्हणून शपथ घालून चंद्राने त्यांचे निवारण केले आहे काय? परंतु जसे इतरांस (अमृतसेवनाची) दृष्टी (हातोटी) नसल्यामुळे चंद्रोदय होऊनही तो व्यर्थ जातो. ॥96॥ म्हणून तू विश्वरूप मला एकदम दाखवशील याबद्दलच मला खरोखर खात्री आहे. कारण की जाणत्यांत आणि नेणत्यांत तू नित्य नवा (उदार) आहेस. ॥97॥ तुझा उदारपणा स्वतंत्र आहे. (याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही). द्यावयास लागलास म्हणजे, हा योग्य आहे अथवा अयोग्य आहे, अशी निवड तू करीत नाहीस. मोक्षासारखी पवित्र वस्तू, ती तू आपल्या शत्रूंना देखील दिलीस. ॥98॥ खरोखर, मोक्ष हा मिळण्यास फार कठीण आहे; परंतु तो देखील तुझ्याच चरणांची सेवा जो करतो आणि म्हणूनच तू धाडशील तेथे तो चाकराप्रमाणे जातो. ॥99॥ जी पूतना राक्षसी विषाचे स्तनपान करवून तुला मारण्यासाठी तुझ्याकडे आली, त्या पूतनेला तू सनकादिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयी योग्य केलेस. ॥100॥ अहो, राजसूय यज्ञाच्या सभासदांत त्रिभुवनातील हजारो मंडळी पाहात असताना, शेकडो प्रकारच्या वाईट शब्दांनी (शिशुपालाकडून) तुझा पाणउतारा झाला. ॥101॥ अशा अपराधी शिशुपालाला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी, श्रीकृष्णा तू जागा दिलीस आणि उत्तानपाद राजाच्या मुलाला (ध्रुवाला) अढळपदाची इच्छा होती काय? ॥102॥ तो एवढ्याकरिता रानात आला की, आपण बापाच्या मांडीवर बसावे, परंतु त्याला या लोकामध्ये चंद्रसूर्यादिकांपेक्षाही प्रशंसनीय केलेस. ॥103॥ याप्रमाणे दु:खाने व्यापलेल्या सर्वांना देण्यात सढळ असे, एक तुम्हीच आहात. मुलाला हाक मारीत असता अजामिळाला आपली तद्रूपता दिलीत. ॥104॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…


