सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
जी आनंदसरोवरींचीं कमळें । तैसे जे हे तुझे डोळे । आपुलिया प्रसादाचीं राउळें । जयालागीं करिती ॥65॥ हां हो तयाही आणि मोहाची भेटी । हे कायसी पाबळी गोठी । केउती मृगजळाची वृष्टी । वडवानळेंसीं ॥66॥ आणि मी तंव दातारा । कृपेचां ये रिघोनि गाभारां । घेत आहें चारा । ब्रह्मरसाचा ॥67॥ तेणें माझा जी मोह जाये । एथ विस्मो कांहीं आहे । तरी उद्धरलों कीं तुझे पाये । शिवतले आहाती ॥68॥
भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया । त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥2॥
पैं कमलायतडोळसा । सूर्यकोटितेजसा । मियां तुजपासोनि महेशा । परिसिलें आजि ॥69॥ इयें भूतें जयापरी होती । अथवा लया हन जैसेनि जाती । ते मजपुढां प्रकृती । विवंचिली देवें ॥70॥ आणि प्रकृती कीर उगाणा दिधला । परि पुरुषाचाही ठावो दाविला । जयाचा महिमा पांघरोनि जाहला । धडौता वेदु ॥71॥ जी शब्दराशी वाढे जिये । कां धर्माऐशिया रत्नांतें विये । ते एथिंचे प्रभेचे पाये । वोळगे म्हणोनि ॥72॥ ऐसें अगाध माहात्म्य । जें सकळमार्गैकगम्य । जें स्वात्मानुभवरम्य । तें इयापरी दाविलें ॥73॥ जैसा केरु फिटलिया आभाळीं । दिठी रिगे सूर्यमंडळीं । कां हातें सारूनि बाबुळी । जळ दाविजे ॥74॥ नातरि उकलतयां सापाचे वेढे । जैसें चंदना खेंव देणें घडे । अथवा विवसी पळे मग चढे । निधान हातां ॥75॥ तैसी प्रकृति हे आड होती । ते देवेंचि सारिलि परौती । मग परतत्त्व माझिये मती । शेजार केलें ॥76॥ म्हणोनि इयेविषयींचा मज देवा । भरंवसा कीर जाहला जीवा । परि आणीक एक हेवा । उपनला असे ॥77॥ तो भिडां जरी म्हणों राहों । तरी आना कवणा पुसों जावों । काइ तूंवांचोंनि ठावो । जाणत आहों आम्ही ॥78॥
हेही वाचा – Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…
अर्थ
महाराज, आनंदरूप सरोवरातील कमळासारखे हे तुमचे डोळे आपल्या कृपाप्रसादाची घरे ज्याला करतील, ॥65॥ अहो महाराज, त्याला देखील आणि भ्रांतीने ग्रासावे? ही दुबळी गोष्ट काय बोलावी? वडवानळ (समुद्रात जळत असलेला अग्नी) समुद्राच्या पाण्याने (देखील) विझला जात नाही. त्यावर मृगजळाच्या वृष्टीचा काय परिणाम होणार आहे? ॥66॥ आणि तशात, अहो श्रीकृष्णा, मी तर आपल्या या कृपेच्या गाभार्यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन करीत आहे. ॥67॥ महाराज, त्या योगाने माझी भ्रांती नष्ट होईल, यात काय आश्चर्य आहे? पण माझी भ्रांती गेली इतकेच नव्हे, तर माझा उद्धार झाला, हे तुमच्या पायांची शपथ घेऊन सांगतो. ॥68॥
हे कमलपत्राक्षा, भूतांची उत्पति आणि नाश तुझ्याकडून विस्तारपूर्वक ऐकले आणि तसेच तुझे अपार माहात्म्यही मी तुझ्यापासून सविस्तर ऐकले. ॥2॥
कमळासारखे मोठे डोळे असणाऱ्या आणि कोटिसूर्यासारख्या तेज:पुंज अशा देवा, महेशा, मी आपल्यापासून आजच असे ऐकले आहे की, ॥69॥ हे सर्व प्राणी ज्या रीतीने (प्रकृतीपासून) उत्पन्न होतात अथवा उत्पन्न झालेली भूते ज्या रीतीने (पुन: प्रकृतीमध्ये) लय पावतात, ती प्रकृती देवाने मला सांगितली. ॥70॥ आणि प्रकृतीच्या स्वरूपाचा खरोखर सर्व हिशोब दिला आणि ज्या परमेश्वराचा माहिमा पांघरून वेद सवस्त्र (सुशोभित) झाला, त्या परमेश्वराचेही ठिकाण तुम्ही दाखवले. ॥71॥ महाराज, वेद वाढतो (उत्कर्ष पावतो) आणि जगतो (टिकतो), अथवा धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो, ते सर्व या आपल्या स्वरूपसामर्थ्याचा आश्रय करतो म्हणून. ॥72॥ असे आपले अपार माहात्म्य आहे. आपले माहात्म्य हे सर्व मार्गांनी जाणण्याचा एकच विषय आहे आणि जे आपल्या स्वत:च्य़ा आत्म्याच्या अनुभवामुळे रममाण होण्यास योग्य असे जे आपले माहात्म्य, ते आपण मला याप्रमाणे दाखवले. ॥73॥ ज्याप्रमाणे आकाशातील ढग नाहीसे झाल्यावर दृष्टी सूर्यमंडळात प्रवेश करते, अथवा पाण्यावरील गोंडाळ हाताने दूर करून मग ज्याप्रमाणे पाणी दाखवावे, ॥74॥ अथवा, सापाचे वेढे उकलले असता ज्याप्रमाणे चंदनाला भेटता येते, अथवा पिशाच्च दूर गेल्यावर जसे पुरलेले द्रव्य हाती लागते ॥75॥ त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड अज्ञान होते, ते देवांनीच दूर सारले. नंतर माझ्या बुद्धीला आपणच परब्रह्माचे शेजघर केले. (ब्रह्मस्वरूपी माझी बुद्धी स्थिर केली.) ॥76॥ म्हणून देवा, याविषयी माझ्या जीवाची खरोखर खात्री पटली, परंतु आणखी एक उत्कट इच्छा उत्पन्न झाली आहे. ॥77॥ आम्ही भिडेमुळे ती गोष्ट जर विचारावयाची राहू दिली तर, आम्ही दुसर्या कोणास विचारावयास जावे? तुझ्यावाचून दुसरी विचारण्याची जागा आम्हास माहीत आहे काय? ॥78॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…


