रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. मुगाचे फोडणीचे वरण, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव बनविण्याच्या या टिप्स वापरून पाहा.
- मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी जर मोड आलेले संबंध मूग वापरले तर खिचडी अतिशय चविष्ट होऊन तिची पौष्टिकताही वाढते.
- बहुतेक घरात मुगाचे फोडणीचे वरण खाण्यास मुले कुरकुर कररतात. याचे कारण म्हणजे, मुगाला जो उग्र वास येतो, तो मुलांना आवडत नाही. हल्ली मेथीची भाजी मुबलक मिळते आणि आपण नेहमी करतोही. हीच मेथीची भाजी जरा अर्धी वाटी पाणी टाकून करावी आणि भाजी शिजल्यावर त्यातील पाणी निथळून काढून घेऊन भाजी परत फडफडीत परतावी. भाजीतून काढून घेतलेले पाणी (मेथीचे) वरण फोडणीला टाकताना मुगाच्या डाळीत घातल्यास वरणाला सुंदर चव येते आणि मुगाचा उग्र वास अजिबात येत नाही. मुले आनंदाने हे मेथीच्या वासाचे फोडणीचे वरण खातात.
हेही वाचा – Kitchen Tips : अशा प्रकारे पालक परोठे अन् कोबीची थालिपीठ भाजी करून पाहा…
- आपण नेहमी काबुली चण्याची उसळ करतो. जे चणे थोड्या मोठ्या आकाराचे आणि भुरकट असतात, अशा चण्यांचीही उसळ केली जाते. परंतु कधी कधी या उसळीचा रस्सा जास्त खाल्ला जातो आणि चणे जसेच्या तसे राहतात किंवा उसळ उरते. तेव्हा त्यातील काबुली चणे काढून घ्यावेत आणि ते वाळू द्यावेत. इतका वेळ वाळू द्यावेत, की आपण सहजपणे प्रत्येक चण्याला हातात घेऊन दाबू शकू. हाताने ते चपटे करावेत. त्यानंतर ते तळून घ्यावेत. नंतर त्या चण्यांवर जिरेपूड, तिखट, मीठ, आमसूल पावडर, मिरीपूड, थोडी बारीक साखर आणि चाट मसाला घालावा. आमसूल पावडर नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चणे खूप चटपटीत लागतात.
- दुपारचा किंवा आदल्या दिवशीचा भात राहिला असेल तर, तो भात तसा खाण्याऐवजी ताज्या भातात कुस्करून घालावा. त्यामुळे ताज़ा भात लवकर शिजतो. पाणी नेहमीइतकेच घालावे. दुपारचे वरण आणि भात (उरलेला) खाण्याचा तसेच वेगळे गरम करण्याचा कंटाळा येतो, पण वरणाच्या डाळीत, राहिलेले वरण आणि तांदळात भात घातल्यास ताजा भात आणि ताजे वरण खाल्ल्याचे समाधान मिळते. शिळा आणि दुपारचा भात किंवा दुपारचे शिळे वरण या ताज्या भातात मिसळले आहे, हे कोणालाही कळत नाही.
हेही वाचा – Kitchen Tips : बिटाचे कटलेट आणि परोठे, भरली वांगी करताना…
- पुलावासाठी किंवा फ्राइड रइससाठी केलेल्या भाताची शितं मोडू नयेत म्हणून भात काटा चमच्याने ढवळावा.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.
(‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)


