मुळ्याचा कुठलाही पदार्थ खायला बरीचशी लोक टाळाटाळ करतात. परंतु निसर्गनिर्मित प्रत्येक घटकांना काही ना काही महत्व आहे आणि त्यांची पोषणमूल्ये आहेत; म्हणून या घटकांचा शक्य तेवढा वापर व्हायला हवा. गाजर, मुळा, बीट, काकडी यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे सॅलड म्हणून मुख्यत्वे यांचा वापर केला जातो. एकवेळ मुळ्याचे पराठे, सॅलड, कोशिंबीर, मुळ्याचा चटका असे विविध प्रकार आपण करत असतो. पण बहुतेक लोक मुळ्याची पानं फेकून देतात. त्या पानांची मी डाळीचे पीठ पेरून किंवा मुगाची डाळ घालून भाजी करते. मुळ्याचा अजून नाविन्यपूर्ण प्रकार काय करता येईल, याचा विचार करत असता मला ‘पालक आणि मुळा पॉकेट्स’ ही कल्पना सुचली. पॉकेट करता मिक्स भाकरीचे पीठ, गव्हाचे पीठ आणि थोडे बेसन, त्यामध्ये पालकाची प्युरी वापरून पीठ तयार केले. सारणामध्ये किसलेले बीटरूट, मुळा, शेंगदाण्याचे कूट आणि चाट मसाल्याचा वापर केला. हे पॅाकेटस तुम्हीपण करून पाहा आणि आवडतात का ते सांगायला विसरू नका.
साहित्य
- मुळ्याची पान – एक मोठी वाटी (बारीक चिरलेली)
- मुळा – एक (किसलेला)
- गाजर – एक (किसलेले)
- बीट (ऐच्छिक) – अर्धे (किसलेले)
- पालक – एक पाव ब्लान्च करून त्याची प्युरी केलेली
- कणीक – दीड वाटी
- मिक्स भाकरीचे पीठ – अर्धी वाटी
- बेसन – दोन चमचे
- हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट – अर्धी वाटी
- तांदळाचे पीठ – पुरीला लावण्याकरिता
- लसूण पाकळ्या – 7-8 (बारीक चिरलेल्या)
- कोथिंबीर – मुठभर (बारीक चिरलेली)
- शेंगदाण्याचे जाडसर कूट – अर्धी वाटी
- चाट मसाला – एक चमचा
- हिरव्या मिरच्या – तीन ते चार (बारीक चिरलेल्या)
- धणे-जिरे पावडर – एक चमचा
- तिखट – एक चमचा
- हळद – एक लहान चमचा
- तीळ – एक चमचा
- जिरे – एक चमचा
- ओवा – चिमुटभर
- मीठ – चवीनुसार
- अर्ध्या लिंबाचा रस
- साखर – चवीपुरती
- तेल – तळणासाठी
- तूप – एक चमचा
- बारीक रवा – एक चमचा
हेही वाचा – Recipe : पालक आणि कांद्याच्या पातीचे रायते
कृती
- सर्वप्रथम पालकाची पाने स्वच्छ धुवून ब्लांच करून घ्यावी.
- पालकाची पाने थंड झाल्यावर त्याची प्युरी करावी.
- हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीरीची जिरे टाकून पेस्ट करून घ्यावी.
- गव्हाच्या पिठामध्ये मिक्स भाकरीचे पीठ आणि बेसन मिसळावे आणि एक चमचा बारीक रवा टाकावा.
- या पिठात तीळ, ओवा, जिरे, मीठ, हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट तसेच पालकाची प्युरी टाकून सर्व पीठ तूप टाकून छान मळून घ्यावे. वरून थोडा तेलाचा हात लावून पीठ थोडा वेळ मुरत बाजुला ठेवावे.
- एका कढईत तेल तापवून त्यामध्ये जिरे टाकून बारीक चिरलेला लसूण टाकावा आणि तो लालसर होऊ द्यावा. नंतर हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकाव्यात. वरुन थोडी हळद, एक चमचा तिखट, एक चमचा धणे-जिरे पावडर, चवीनुसार मीठ टाकून त्यात शेंगदाण्याचे जाडसर कूट घालावे.
- सर्व मसाले तेलात परतून घेतल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला मुळ्याचा पाला मिक्स करावा.
- मुळ्याच्या पाला किंचित शिजल्यावर त्यामध्ये किसलेला मुळा, गाजराचा किस टाकावा आणि परत हे मिश्रण थोडे वाफेवरच नरम होऊ द्यावे.
- गॅस लगेच बंद करून या मिश्रणावर वरून चाट मसाला टाकून अर्धे लिंबु पिळावे आणि चवीपुरती साखर टाकून मिश्रण थंड होऊ द्यावे.
- आता मळलेल्या पिठाची एक मोठी थोडी जाडसर पोळी, तांदळाचे पीठ लावून लाटावी आणि एका वाटीच्या सहाय्याने गोल आकारात त्या पोळीचे तुकडे करावेत किंवा आपल्या आवडीनुसार तुकडे करावेत.
- पोळपाटावर खाली तांदळाचे पीठ टाकून गोलाकार केलेली गोलाकार आकाराची पुरी घ्यावी आणि त्या पुरीला सर्व बाजूने पीठ व्यवस्थित लावून घ्यावे.
- एक चमचाभर मुळ्याच्या पाल्याचे मिश्रण त्या पुरीवर टाकावे आणि नंतर वरून दुसरी पुरी लावून या पॉकेटच्या कडा दाबून एकमेकांना चिकटवून बंद करावे.
- हे पॉकेट जरा आकर्षक दिसावे म्हणून या पॅाकेटच्या कडांवर काटेरी चमच्याने दाबुन डिझाईन तयार करावे.
- अशा प्रकारे सर्व पॉकेट्स तयार झाले की, तेलामध्ये तळून घ्यावेत.
हेही वाचा – Recipe : मिसळीचे वरण अर्थात मिश्र डाळींचे वरण
टीप्स
- पालक आणि मुळा पॉकेट्स तळायचे नसतील तर हे पॉकेट्स थोडे वाफवून शॅलो फ्राय करू शकता.
- हे पॉकेट्स सर्व्ह करताना पुदिना चटणी किंवा टोमॅटो हॉट अँड सोअर सॅाससोबत खायला द्यावे.


