अनिता बाळकृष्ण वैरागडे
इंग्रजी उच्चाराप्रमाणे योगा म्हणून ओळखला जाणारा योगाभ्यास किंवा योग मुळात भारतातील प्रकार आहे. योग किंवा योगा करणे हा आपल्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. योग म्हणजे केवळ व्यायाम नाही तर, योग आपल्याला दैनंदिन ताण-तणावातून मुक्त करण्यासाठी प्रेरित करते. योगचे असे अनेक फायदे आहेत. योगमुळे शरीर लवचिक बनतो. रोगप्रतिकारशक्ती वाढते. नियमित योग केल्याने आपले अंतर्मन शुद्ध होते… योगमुळे आपल्यात भरपूर प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, त्याचबरोबर स्वतःमध्ये कौशल्य विकसित होण्यास मदत होते. योग ही परिपूर्णतेची जननी आहे.
धकाधकीच्या आयुष्यात कायम ताणतणावांना सामोरे जावे लागते. म्हणूनच, लहान वयातच उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास, हृदयविकाराच्या झटक्याचा धोका निर्माण होतो. परिणामी, आयुष्यात अस्थिरता आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. अनेकदा आपल्या मनामध्ये नकारात्मक भाव निर्माण होतो. त्यामुळे आपण असहाय्य होतो. आपल्या नकारात्मक भावना कशा हाताळायच्या हे शाळेत किंवा घरी कोणीही शिकवू शकत नाही. या मन:स्थितीला वळण लावते, ते म्हणजे योग.
हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
योग हे मानव जातीला एक वरदान आहे. योगमुळे मन एकाग्र होते आणि आपली स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. आपल्यातील सकारात्मक भावना वाढू लागतात. योग असा प्रकार आहे, जो संपूर्ण जगाला जागृत करू शकतो. योगमुळे आत्म्याचे ईश्वराशी मिलन होते… जेव्हा आपण ध्यानस्थ बसतो तेव्हा. योगचे प्रवर्तक पतंजली यांनी आपल्या योगसूत्रामध्ये योगचा उद्देश स्पष्ट केला आहे. योग केल्याने आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होतो. दिवस चांगला जातो आणि झोप चांगली लागते.
जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होते. म्हणून आजच्या आधुनिक काळात योग आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. याद्वारे आपण तणावमुक्त आणि आनंदी राहू शकतो. म्हणूनच आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला वेळ देऊन योग करून रोग मुक्त व्हा… आणि समाजाला आणि जगाला रोगमुक्त करा.
हेही वाचा – आयुर्वेद अन् ऋतुचर्या