डॉ. प्रिया गुमास्ते
‘अरे, किती आइसक्रीम खातोयस? थंडीत बाधेल की…’, आयुर्वेदाची माहिती असणारी आजी आपल्या नातवाला एक प्रकारे ऋतुचर्या समजावत होती. कधी काय खाणे योग्य, काय अयोग्य याची चर्चा बर्याच घरांमध्ये होत असते. ऋतुमानानुसार कसे वागावे, काय खावे जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती वाढेल आणि आपण आजारी पडणार नाही, याचे सखोल मार्गदर्शन आयुर्वेदात केले आहे.
ऋतुचर्या म्हणजे काय?
ऋतौ ऋतौ आचरणीय: विधि: ऋतुचर्या इति अभिधीयते।
वेगवेगळ्या ऋतुनुसार आपल्या आहारविहारात केलेले बदल म्हणजे ऋतुचर्या. यामुळे शरीरातील दोष (वात, पित्त, कफ) संतुलित राहतात आणि आरोग्य चांगले राहते.
पण ऋतू म्हणजे काय? आणि कोणता ऋतू सुरू आहे, हे कसे ओळखायचे?
मासैर्द्विसङ्ख्यैर्माघाद्यै: क्रमात् षडृतव: स्मृता:।
शिशिरोऽथ वसन्तश्च ग्रीष्मवर्षाशरद्धिमा:॥
अष्टाङ्गहृदयम् सूत्रस्थानम् 3.1
ऋतू म्हणजे द्वौ मासौ वा दोन महिने. आपल्या बारा महिन्यांना प्रत्येकी 2 महिन्यांच्या भागांत विभागले आहे आणि त्या दोन महिन्यांचा एक ऋतू बनतो. त्यामुळे जरी बाकी जगात फक्त चार ऋतू मानले असले तरी, आयुर्वेदाप्रमाणे सहा ऋतू आहेत. ते म्हणजे –
- वसन्त (Spring)
- ग्रीष्म (Summer)
- वर्षा (Rainy season)
- शरद् (Autumn)
- हेमन्त (Early winter)
- शिशिर (Late winter)
हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
या सहा ऋतुंची महिन्यांनुसार विभागणी पुढील प्रमाणे केली आहे.
माघ: फाल्गुनश्चशिशिर:चैत्र: वैशाखश्चवसन्त: ज्येष्ठ: आषाढश्चग्रीष्म:श्रावण: भाद्रपदश्चवर्षाअश्विन: कार्तिकश्चशरद्मार्गशीर्ष: पौषश्चहेमन्त:||
- वसन्त (Spring) – चैत्र, वैशाख
- ग्रीष्म (Summer) – ज्येष्ठ, आषाढ
- वर्षा (Rainy season) – श्रावण, भाद्रपद
- शरद् (Autumn) – अश्विन, कार्तिक
- हेमन्त (Early winter) – मार्गशीर्ष, पौष
- शिशिर (Late winter) – माघ आणि फाल्गुन
ऋतुचर्येची आवश्यकता काय?
‘यत् पिंडे तत् ब्रह्मांडे |’ या उक्तीनुसार, ‘तुमचे शरीर एक लहान विश्व आहे.’ निसर्गाप्रमाणेच आपले शरीरही पंचमहाभूतांनी बनलेले आहे. निसर्गात होणार्या बदलांचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळेच जर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये (Lifestyle) ऋतुनुसार बदल केले नाहीत तर, आपण आजारी पडण्याची खूप शक्यता वाढते आणि म्हणूनच प्रत्येक ऋतुमधील वातावरण बदलांचा शरीरावर काय परिणाम होतो आणि त्यानुसार आपण काय बदल केले पाहिजेत, हे आपण पुढच्या भागात पाहू.
(क्रमश:)
Mobile : 9819340378
हेही वाचा – त्वचा आणि त्वचेवर परिणाम करणारे घटक