आराधना जोशी
आयुष्याचा सूर महत्त्वाचा… म्हणूनच 21 जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. तसं पाहिलं तर, शास्त्रीय संगीतापासून फिल्मी संगीतापर्यंत… भारतीयांचे जीवन त्यानेच व्यापलेले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ज्या 64 कला मानल्या गेल्या आहेत, त्यात संगीत ही एक महत्त्वाची कला आहे. भारतीय संगीताने जागतिक पातळीवर स्वतःची ओळख तयार केली आहे. आज अनेक परदेशी तरुण, तरुणी भारतीय संगीत शिक्षणासाठी भारतात दाखल होत आहेत. तथापि, असा दिवस साजरा करण्याची प्रथा फ्रान्समध्ये आणि नंतर ती जगातील इतर देशांमध्ये सुरू झाली.
खरंतर, संगीताचा हा कान आपल्याला जन्मजात मिळालेला असतो. आईच्या पोटात असताना तिच्या हृदयाचे ठोके हे बाळाचं पहिलं संगीत असतं. आज गर्भसंस्कारांना असणारं महत्त्व आणि त्यातही बडबड गीतांना बाळाकडून मिळणारा प्रतिसाद, हेच दर्शवते. जन्मानंतर बाळाच्या कानावर पडणारी आईने म्हटलेली अंगाई गीते, काऊ चिऊची गाणी, बडबड गीते यातूनच बाळ प्रतिसाद द्यायला शिकत असते. ही बडबड गीते हातवारे करून दाखवायला बाळांनाही खूप आवडते. संगीताची झालेली ही ओळख नंतर आयुष्यभर पुरणारी असते.
भारतीय चित्रपटांमध्ये अनेक गाणी रिमिक्स सादर करण्याचा ट्रेंडही आला होता. अर्थात, हे चांगलं की वाईट, चूक की बरोबर यापेक्षाही या ट्रेंडमुळे जुनी गाणी, जुन्या संगीतचाली आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचतात, ही त्यातली जमेची बाजू आहे, असं मला वाटतं. पिढीनुसार चित्रपट संगीताचा बाज, ढंग बदलत जातो. आधीच्या प्रत्येक पिढीला आपल्या काळातलं संगीत काय जबरदस्त होतं, आताच्या संगीतात ती जादू नाही, असं कायम वाटतं असतं. पण समाजमाध्यमे आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे जगभरातील संगीत एका क्लीकवर आज आपल्याला ऐकायला मिळते. यामुळे जगभरातील संगीताशीही आजची तरुण पिढी जोडली गेली आहे. जे समजायला सोपं ते सु-गम संगीत आणि जे समजून घ्यायला अवघड ते शास्त्रीय संगीत ही काही वर्षांपूर्वी असणारी मानसिकता म्हणूनच हल्ली बदललेली आहे.
हेही वाचा – संवेदनशील साहित्यिक… पी.व्ही. नरसिंह राव
भारतीय मातीतील संगीताची ही जादू मला काही वर्षांपूर्वी माझ्याच घरात बघायला मिळाली. संगीतावर आधारित ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट 2015 साली थिएटरमध्ये झळकल्यानंतर त्याला तुफान लोकप्रियता मिळाली होती. हा सिनेमा बघितल्यानंतर त्यावेळी माझी 13 वर्षांच्या असलेल्या मुलीला शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी ऐकायला आवडू लागले आणि आजही ती अशी गाणी आवर्जून ऐकते. तोपर्यंत ‘ते तुमचं आss आss आss मला नाही कळत आणि म्हणून नाही आवडत,’ असं म्हणणारी माझी मुलगी आज मात्र अनेक शास्त्रीय गायक-गायिकांची मोठी चाहती बनली आहे. अर्थात, घरातला हा बदल मला समाजातही काही प्रमाणात बघायला मिळाला. कट्यारच्या अगोदर आलेल्या बालगंधर्व या चित्रपटानेही संगीत नाटकांची परंपरा रसिकांसमोर मांडली आणि त्याला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आनंद भाटे, राहुल देशपांडे, महेश काळे यासारख्या नव्या दमाच्या गायकांना मिळणारी प्रसिद्धी आणि त्यांचे असणारे फॅन्स यात तरुण वर्ग सर्वात जास्त आहे. याशिवाय, आज जागतिक संगीताशी आपल्या पालकांची ओळख करून देऊन त्याचाही आस्वाद घ्यायला हीच पिढी पुढाकार घेताना दिसतेय हे एक आशादायक चित्र सध्या दिसून येत आहे.
मधल्या काळात संगीतोपचार हा विषय महाविद्यालयीन स्तरावर अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. खरंतर, मी त्यातील तज्ज्ञ नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की, काही ठराविक प्रकारचे संगीत आपल्या मनावर काही विशिष्ट परिणाम करत असते. चिडचिड होतं असताना किंवा मानसिकदृष्ट्या त्रास होत असताना काही विशिष्ट प्रकारचं संगीत मनाला शांतता देते. मग भले ते चित्रपट संगीत असो, सुगम संगीत असो किंवा सुफी संगीत असो… फक्त आयुष्याचा सूर बदलू नये!
हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य