अर्जुन कॅन्टीनमध्ये बसून कॉफी पित होता. एका हातात सिगरेट होती. सिगरेटचा एक झुरका आणि एक घोट कॉफी सुरू होतं. इतक्यात अलका समोर येऊन बसली.
“काय कसला विचार चाल्लाय?”
“दोन दिवस बंक मारायचा…”
“कुठे? ट्रेकिंग की मॅरेथॉन?”
“ट्रेकिंग नाही आणि मॅरेथॉन नाही, वारीला जावं म्हणतोय?”
“वारीला? आणि तू?”
“का?”
“अरे पक्का नास्तिक तू! कुठल्या देवळात कधी जात नाहीस…”
“मग तुला काय वाटलं मी आस्तिक झालोय? मी बदललो नाही…”
“मग?”
“हे बघ, आपला विश्वास असो वा नसो, पण लाखो वारकरी वारीत येतात ना! मनोभावे विठ्ठलचा जयघोष करतात… पंढरपूरच्या दिशेने पायी जातात. बरोबर त्यांचा छोटा संसार असतो. तुळस असते… कुत्रा असतो… हे वारकरी कसे चालतात? आपापसात काय बोलतात? राहतात कुठे? जेवण कुठं बनवतात? झोपतात कुठे? त्यांना पाणी कोण देते? असे अनेक प्रश्न मला आणि अख्ख्या जगाला पडतात…”
“मग?”
हेही वाचा – नीला-विनायक प्रेमकहाणी अन् भूतबंगला..
“मी दोन दिवस या वारीसोबत चालणार आहे आणि याची रील्स बनवून इन्स्टा आणि फेसबुकवर टाकणार आहे.”
“अच्छा! म्हणजे तू रील्स बनवणार आहेत तर?”
अर्जुन मोठ्याने हसला…
“मग तुला काय वाटलं, त्या अडाणी वारकऱ्यांसंगे वारीत पाय तुडवणार!”
आता अलका पण हसू लागली…
“पण अर्जुन, ते वारकरी कितीही मळकट असले तरी, अख्ख्या जगात त्यांचे आकर्षण असते. यंदा युरोपमधून वारी येणार आहे म्हणे!”
“त्याचाच फायदा घ्यायचाय. मी रील्स बनवले की एका दिवसात लाखो लाइक्स मिळतात की नाही बघ! हजारो लोक शेअर करणार… मेसेज करणार… माझे लाखो फॉलोअर्स वाढतील दोन दिवसांत…”
“एकंदरीत तुझी कमाई वाढणार तर!”
“तसंच होईल…”
“मग पार्टी ठेव ओली… आणि पावडरीची व्यवस्था कर… आजकाल पावडरीशिवाय किक् येतंच नाही!”
“हो करू गं, एक पंटर आहे माझा दोस्त…”
कॉफी पिऊन अंजली उठली आणि कॉम्प्युटरसमोर बसली.
पुढील दोन दिवस अर्जुनने बंक मारले. अंजलीला अर्जुनचे कौतुक वाटले… रील्स बनवायच्या कल्पनेने का होईना, अर्जुन वारीला दोन दिवस जाणार, वारकऱ्यांसोबत चालणार… वीस लाखाचे पॅकेज घेणारा अर्जुन या वारकऱ्यांसोबत दोन दिवस असणारं, हे तसे मोठेच होते… ती स्वतः चार दिवस रजा घेऊन सांगलीला घरी जाणार होती; कारण वारकरी गेल्यानंतर शहराची अवस्था बघवत नाही.
दुसऱ्या दिवशी अर्जुन पायात आदिदासचे बूट, जीन्स, वर पांढरा सदरा आणि डोक्यावर पांढरी टोपी घालून निघाला. त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याला बजावून ठेवले होते… वाटेत बाटलीबंद पाणीच पी… पाणपोईमधील पिऊ नकोस… ते वारकऱ्यांसाठी कुठल्या तरी मंडळांनी मिळेल तेथून भरलेले असते. भूक लागली की, पॅक फूड मिळते तेच खा वगैरे…
हातात कॅमेरा घेऊन अर्जुन एका दिंडीसोबत चालू लागला… त्याने सोबत सेंट मारलेले रुमाल घेतले होते… अधूनमधून ते नाकाला लावत होता… दिंडीतील पुरुष… सर्व वयोगटातील… पण बहुतांश पन्नास आणि त्याच्या पुढचे… बहुतेक जीर्ण झालेले धोतर… मूळचा पांढरा, पण आता मळकट झालेला शर्ट… पायात वाहणा असल्या तर असल्या नाहीतर अनवाणी… डोक्यावर टोपी… गळ्यात माळ…
स्त्रिया सर्व वयोगटातील… विटक्या रंगाची साडी… पायात चप्पल… काहींच्या पायात तुटलेल्या… डोक्याला आडवे कुंकू… सोबत काही लहान मुलेसुद्धा! खाकी पॅन्ट, पांढरा जुना शर्ट… टोपी… पायात काही नाही.. एखाद्याच्या पायात असावे.. प्लास्टिक चप्पल…
अर्जुनने व्हिडीओ कॅमेरा हातात घेतला आणि तो शूटिंग करू लागला… हातात टाळ, गळ्यात मृदंग, एका हातात भगवी पताका घेतलेल्या वारकऱ्यांचे जथ्थे एका मागोमाग एक जात होते. मधेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या बायका… काही छोटी मुले, चालत होती आणि काही कमरेवर होती… तोंडाने भजने सुरू होती…
“निघालो… पंढरीच्या वारी…”
अर्जुन रेकॉर्डिंग करत होता… सोबत स्वतः त्याचे वर्णन करत होता आणि इन्स्टा, युट्यूबवर टाकत होता… मधेच कुठेतरी थांबून एखादे सॅन्डविच खात होता… बाटलीबंद पाणी तोंडाला लावत होता…
दुपारचे बारा वाजले तरी अर्जुनच्या लक्षात आले की, आपण दमलो नाही.. त्याने स्मार्टवॉचमध्ये चेक केले. सकाळपासून पंधरा किलोमीटर चालणे, धावणे झाले पण अजून तो फ्रेश होता!
दुपारी एका अन्नछत्राजवळ वारी थांबली. वारकरी मंडळींसाठी या ठिकाणी दुपारचे जेवण एका मंडळाने ठेवले होते. अर्जुनने ठरवले, आपणही येथेच जेवावे… हे वारकरी काय जेवतात, त्याचे शूटिंग करावे आणि आपला जेवणाचा अनुभव पण सांगावा. म्हणून, तो पण एका तंबूमध्ये गेला आणि विसावा घेत असलेल्या वारकऱ्यांचे शूटिंग करू लागला.
प्रत्येकाला पान मिळतं होते…. भात, त्यावर डाळ, एक भाजी आणि एक मुद गोड शिरा.. अर्जुन या जेवणावळीचे शूट करत होता…
“मी अर्जुन लोखंडे… सासवडमधून… आत्ता इथे वारी मध्यान विश्रांती आणि जेवणासाठी थांबली आहे. इथे मोठमोठे तंबू उभारले आहेत… बाहेर भुरभूर पाऊस पडतो आहे आणि आतमध्ये सकाळपासून पंढरीच्या दिशेने चालणारे वारकरी थांबले आहेत.. चालून चालून दमलेले पाय दाबत बसले आहेत, एकमेकांची चौकशी करत आहेत.. आणि आता जेवणाची ताटे या मंडळाचे स्वयंसेवक प्रत्येकाच्या समोर ठेवत आहेत… माझ्याही हातात एक ताट दिले आहे… भात, त्यावर डाळ, एक भाजी आणि एक मुद गोड शिरा…”
एवढ्यात अर्जुनला आपल्या मागे एका लहान मुलाचा आवाज ऐकू आला. त्याने वळून पाहिले… एक सात आठ वर्षांचा मुलगा वाढणाऱ्या स्वयंसेवकाकडे तक्रार करत होता…
“दादा, म्हला गोड न्हाय वाढलं…”
तो स्वयंसेवक हसून म्हणाला, “बाळा.. आज शिरा संपला रे… त्याबद्दल भाजी वाढतो जास्त…”
“भाजी नको दादा, वारीमध्ये गोड मिळतं म्हणून म्या आलो आज्जीसोबत. तीन दिवस झाले मला चालून… अजून गोड न्हाई मिळाल मला आणि आजीला…”
अर्जुनने त्याचा आवाज ऐकला आणि आपल्या पानात पाहिले… पानात गोड शिरा होता. त्याने पटकन आपल्या पानातील शिरा त्या मुलाच्या पानात टाकला.. त्या मुलाने आनंदाने त्या शिऱ्याकडे पाहिले. अर्जुनला वाटले तो मुलगा पटकन तो शिरा मट्ट करील. पण त्या मुलाने त्या मुदभर शिऱ्याचे चार भाग केले… एक भाग त्याने शेजारील मुलीला दिला…
“ताई, हा घे शिरा.”
दुसरा भाग आजीला दिला… “आज्जे… हा घे…”
तिसरा भाग अर्जुनच्या पानात टाकला…
“दादा, तुम्ही पण शिरा खा… आता हा शिरा मी खातो,” असे म्हणून त्या मुदभर शिऱ्यातील चौथा भाग त्याने तोंडात टाकला.
अर्जुन आश्चर्यचकित झाला… आपल्या ताटात मी दिलेला शिरा स्वतः खायचे सोडून या मुलाने त्याचे चार भाग केले आणि तीन भाग इतरांना वाटून एक भाग फक्त तोंडात टाकला! त्याने त्या मुलाला विचारले…
“अरे, मी माझ्या पानातील शिरा तुला दिला होता, तू त्याचे चार भाग का केलेस?”
“दादा, वाटण्यात इट्टल असतो, आसं माझा आज्जा सांगायचा…”
कुणीतरी खाडकन तोंडात मारली, असे अर्जुनला वाटले.
‘वाटण्यात इट्टल असतो? मग आपण वीस लाखांचे पॅकेज घेतो… त्यातील कुणाकुणाला वाटतो? की स्वतः हॉटेलात मजा मारतो, मित्रांसमवेत दारू पितो, कोकेनच्या पार्ट्या करतो… काय करतो काय आपण?’
अर्जुन त्या मुलाच्या जवळ गेला… “बाळा, नाव काय तुझं?”
“आनंद.”
“गाव?”
“जत.”
“तुझ्या पानात आज गोड शिरा वाढला नाही ना… उद्या आपण सासवडला अख्ख्या वारीला गोड शिरा वाटू. तू माझ्यासोबत रहा…”
आनंदने मान हलवली.
अर्जुनला रात्री झोप येईना. एका आठ वर्षांच्या खेडेगावातील मुलाने आयुष्यभराचा धडा दिला… ‘एक घास चार लोकांत वाटून खा… वाटण्यात विठ्ठल आहे…’
एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर करत अर्जुनने रात्र काढली. सकाळी उठल्याबरोबर प्रथम त्याने काल रेकॉर्डिंग केलेले रील्स, मेसेज, लाखो व्ह्यूज डिलिट केले. हे सर्व खोटे आहे, हे त्याच्या लक्षात आले. सकाळी सासवडच्या बाजारातून दहा किलो रवा, साखर, तूप, वेलची घेतली. पुढील मुक्कामाच्या ठिकाणी दोन स्टोव्ह मागून घेतले… तो आणि आनंदा शिरा करू लागले.
वारकरी विश्रांतीसाठी थांबले आणि वेलची घातलेल्या शिऱ्याच्या वासाने जमा होऊ लागले. रांग लावून उभे राहिले. प्रत्येकाच्या पानात अर्जुनने शिरा घातला… आणि सांगू लागला…
“वाटण्यात विठ्ठल आहे… प्रत्येकाने शिऱ्याचे चार भाग करावेत, तीन भाग आजूबाजूला वाटा आणि एक भाग आपल्या तोंडात घाला…”
सर्व वारकऱ्यांनी आनंदाने आपल्या पानातील शिऱ्याचे चार भाग केले… तीन भाग दुसऱ्यांना वाटले आणि एक भाग आपल्या तोंडात टाकला.
आनंदने तीन भाग शिरा खाल्ला… त्याच्या तिप्पट वाटला.. तो आठ वर्षांचा मुलगा बाकी वारकऱ्यांना सांगत होता…
“काल मी विठ्ठल होतो, कारण मी माझ्या पानातील शिरा तिघांना वाटला…” मग तो अर्जुनकडे हात दाखवून सांगू लागला,
“आज या दादाने सातशे वारकऱ्यांना शिरा वाटला. आज हा काका विठ्ठल आहे…”
अर्जुन सद्गदीत झाला. अनावर होऊन त्याच्या डोळ्यांतून अश्रू त्याच्या गालवरून वाहू लागले.
अर्जुनने आनंदला जवळ घेतले…
“बाळा, मी कसला विठ्ठल? कालपर्यत मी वाटमारी करत होतो… वीस लाखांचे पॅकेज घेणारा… एकटाच खाणारा… या पैशांवर मौजमजा मारणारा… या वारीची आणि या वारकऱ्यांची चेष्टा करणारा.. लाइक, शेअरमध्ये रमणारा… पण ‘एकटा खाऊ नको, आजूबाजूला वाट,’ असे सांगणारा तुझा आज्जा खरा विठ्ठल…”
वारी पुढे सरकत होती… जेजुरी जवळ येत होती. सोन्याची जेजुरी, पिवळा भंडारा उधळणारी… आज पण अर्जुन शिरा बनवणार होता. तो बाजारात खरेदीला जायचा होता. एवढ्यात आनंद धावत आला… त्याच्या मुठीत दोन-तीन नोटा आणि काही सुट्टे पैसे होते…
“दादा, हे घे पैकं… मायने दिल्ले येताना खाऊला…”
अर्जुनने पाहिले… त्यात वीस रुपयांच्या तीन नोटा आणि सुट्टे 12 रुपये होते!
“अरे आनंदा, हे बावन्न रुपये आहेत. हे कशाला आणलेस?”
“दादा, तू आज गोड शिरा करणार न्हवं… त्यासाठी पैकं लागतील न्हवं… हे मला मायने दिल्ले… ते पैस घे आणि सामान आन.”
अर्जुनला काय बोलावे हेच कळेना!
“बाळा आनंदा, आज शिरा गोड लागेल ना, तो साखरेमुळे नाही, तुझ्या या बावन्न रुपयांचा गोडवा त्यात असेल.”
अर्जुनने आनंदाला साथीला घेऊन पुन्हा दहा किलोचा शिरा बनवला… रांगेने उभे राहिलेल्या वारकऱ्यांना तो वाटला… आनंदा सर्वांना सांगत होता…
“माझा आज्जा सांगायचा, आपल्या पानात जे पडतं, त्याचे चार भाग करा… तीन भाग आजूबाजूला वाटा, एक तुमी खावा… वाटण्यात इट्टल असतो!”
सर्व वारकरी आपणाला मिळालेला शिऱ्याचे चार भाग करायचे… तीन भाग वाटायचे… एक भाग तोंडात टाकायचे…
अर्जुनने नोकरी सोडली. या पॅकेजमध्ये आणि शेअर, व्ह्यूज, फॉरवर्डमध्ये त्याचे मन रमेना. तो वारीचे व्यवस्थापन बघू लागला.
गेली काही वर्षे अर्जुन वारीच्या प्रत्येक ठिकाणी शिरा बनवून वाटतोय… त्याची पुण्याची मैत्रीण अलका पण त्याच्यासोबत असते. पूर्वी अलका नेहेमी नाकाला रुमाल लावून असायची… आता तिला फक्त तुळशी-बुक्क्याचा वास येतो!
हेही वाचा – बनिया आणि मराठी कस्टमर
आनंदा प्रत्येक वारीत अर्जुन आणि अलका यांच्यासोबत असतो.. एक मेटॅडोर अर्जुनने घेतला. त्यात रवा असतो, साखर असते, तूप असते, गॅस शेगडी आणि सिलिंडर असतो… अर्जुनचे काही मित्र वारीला येतात. अर्जुन त्यांना सांगत असतो…
“बाबांनो… वारी म्हणजे मजा नाही, ती जबाबदारी आहे…”
तुम्ही पण वारीला जात असाल… नाही तर, मुद्दाम जा! वारी एक अनुभव आहे… वारीच्या मार्गात तुम्हाला एक मॅटेडोर दिसेल… त्यात रवा, तूप, साखर दिसेल… गाडीत अर्जुन असेल, अलका असेल.. त्त्यांचे साथीदार असतील आणि आता दहा-अकरा वर्षांचा आनंदा असेल.
आनंदाच्या आज्याने सांगितले ते लक्षात ठेवा…
“एक घास खाल्ला तर चार घास वाटा, कारण त्या एका घासात विठ्ठल असतो…”
पुंडलिक वरदे… हरी विठ्ठल…


