श्रम करणाऱ्याला, घाम गाळणाऱ्याला या जगात कधीच पोटापाण्याची चिंता नसते. मुंबईत तर नाहीच नाही. बरेच परप्रांतीय मुंबईत येतात आणि पडेल ते काम करून, कष्ट करून, जागा मिळेल तिथे राहून, स्वतःचा जीव जगवतात आणि प्रगती करतात. बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा, बंगाल या भागातून येणारे हे जत्थे अवघ्या महामुंबईत पसरतात आणि स्वस्त श्रमाची गरज अगदी लीलया भागवतात. मुख्यत्वे, बांधकाम क्षेत्रात यांच्या झुंडी अगदी विनासायास सामावल्या जातात, स्थानिकांच्या नाकावर टिच्चून.
यांच्यातलेच काहीजण वेगळे मार्ग चोखाळतात त्यातल्या त्यात कमी कष्टाची कामे! असाच एक अवलिया भेळवाला आमच्या ऑफिसशेजारी असलेल्या पेट्रोलपंपाजवळ दिसतो मला, सदैव. लहानखुरी चण, काळासावळा रंग. गुलाबी, नाहीतर भडक लाल, पिवळा अशा रंगांचे शर्ट आणि कुठल्याही रंगाची धुवट पॅन्ट अशी वेशभूषा. पायात कधी सपाता, तर कधी प्लॅस्टिकच्या चपला.
समोर बांबूच्या तिवईवर चुरमुरे, फरसाण, शेव, चपट्या पुऱ्या, चिरलेला कांदा, टोमॅटो, भेळेचा मसाला, वर्तमानपत्राच्या नीटसपणे कापलेल्या कागदांची चळत, भेळ कालवण्याचा प्लॅस्टिकचा डबा, कांदा आणि टोमॅटो चिरण्यासाठी छोटीशी लाकडी फळी आणि सुरी असा सगळा जामानिमा. अत्यंत कमी भांडवलातला व्यवसाय.
भेळ या पदार्थावर जीव टाकणाऱ्यांची मुंबईत कमी नाही आणि तेच सगळे त्याचे ग्राहक. ‘चहाला वेळ नसते, त्याप्रमाणे त्याच्या भेळेला पण काळवेळ नसते. मुख्य ग्राहक म्हणजे सीएनजी भरण्यासाठी आलेले रिक्षा आणि टॅक्सी चालक, शाळा-कॉलेजची मुलंमुली, कामातनं थोडा विरंगुळा म्हणून, ‘दम’ मारण्यासाठी खाली उतरलेले, सगळ्याच वयाचे कर्मचारी वगैरे…
किंमत अगदी माफक, म्हणजे वीस रुपये फक्त. सगळ्यांनाच परवडेल अशी!
सकाळी साधारण अकरा वाजता त्याचं आगमन होतं. खांद्याला लटकवलेली तिवई आणि एक मोठी पिशवी एवढंच सामान. ठरलेल्या जागी तिवई उतरवून, सगळा जामानिमा त्यावर मांडला जातो. कांदे आणि टोमॅटो सफाईने चिरले जातात. फरसाण, शेव आणि पुऱ्यांच्या पिशव्या उघडल्या जातात आणि तो बोहनी करायला सज्ज होतो. आकर्षकपणे मांडलेला सुबक पसारा हेच त्याचं मार्केटिंग… अगदी शांत, मितभाषी, पटापटा भेळ कालवणारा हा कष्टकरी. कायम हसतमुख.
हेही वाचा – केल्याने होत आहे रे!
सहज एकदा त्याच्या कागदांच्या चळतीकडे नजर टाकली आणि अंदाज बांधला की, साधारण दोन अडीचशे कागद तरी सहज असावेत. शंभर भेळींची विक्री झाली दिवसभरात तर दोन हजार रुपये होतात. एका भेळीसाठी कच्च्या मालाची किंमत पाच रुपयांच्या वर नसावी. म्हणजे एका भेळीमागे अदमासे पंधरा रुपयांचा नफा. म्हणजे दिवसाचे दीड हजार रुपये. महिन्यात पंचवीस दिवस जरी काम केलं तरी साडेसदतीस हजार रुपये महिन्याची कमाई?
माझा विश्वासच बसेना माझ्या गणितावर, म्हणून परत एकदा केलं आणि ते बरोबर आहे याची खात्री केली. हातच्या कंकणाला आरसा कशाला? म्हणून एके दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटायच्या आधी भेळ खायला खाली उतरलो, एका सहकाऱ्यासोबत. तीन-चार लोकं उभीच होती त्याच्या भोवती, मी आम्हाला भेळ सांगितली. मित्राने धूम्रकांडी शिलगावली आणि मी भेळवाल्याच्या लयबद्ध हालचाली बघत राहिलो. एक भेळ तयार व्हायला फक्त दोन मिनिटं लागत होती, एवढ्या त्याच्या हालचालींचा ताळमेळ होता. सगळं अगदी synchronized होतं, यंत्रमानवासारखं!
आमची भेळ तयार होऊन पुडी हातात आली, एक फक्की मारली, मस्त जमलीये भेळ असा अभिप्राय दिला आणि तो खुलला थोडासा. संधी साधून मी थोडी सलगी साधली त्याच्याशी…
“कहाँसे आये हो?”
“योगीजी के राज्य से,” असं अनपेक्षित उत्तर आलं.
उद्या एखाद्या भारतीय माणसाला परदेशात विचारलं, कुठून आलात? आणि ‘मोदीजी के देश से’, असं उत्तर एखाद्याने दिलं तर काय बहार येईल, हा विचार येऊन, नकळतच हसू आलं.
“सातवी पास हूँ… इथे जवळच राहतो. चालत येतो आणि चालत जातो.”
मला माझा ऑफिसला पोहोचण्याचा द्राविडी प्राणायाम आठवला.
“किती भेळ विकतोस दिवसाला?” मी थोडं अवघडतच प्रश्न विचारला.
पुरुषाला त्याची आमदनी आणि स्त्रीला वय विचारायचं नसतं, असं शास्त्र आहे, पण तरीही मी विचारलं. उत्तर देणं न देणं त्याच्या हातात होतं. माझा शंभर भेळ हा अंदाज कितपत खरा ठरतो, ते बघायचं होतं मला.
“कम से कम देढसो तो हो जाती है. दिन अच्छा रहा तो दो सौ भी हो जाती है” I
त्याने न संकोचता उत्तर दिलं आणि मी अवाक् झालो. सरासरी दीडशे दिवसाला विकल्या आणि पंचवीस दिवस धरले तर महिना पंचाहत्तर हजारचा गल्ला. खर्च वजा जाऊन, पन्नास पंचावन्न हजार तर कुठेच नाही गेले. पोलीस आणि तथाकथित समाजसेवकांचा वाटा बाजूला काढला, तरी महिना पंचेचाळीस ते पन्नास हजारच्या वर कमाई?
मी पुन्हा आकडेमोड केली आणि माझं गणित कुठे चुकतंय का ते बघितलं, पण सगळं अगदी बरोबर होतं… कोण कुठला एक कष्टकरी, लांबून कुठून तरी येऊन स्वतःच्या बळावर पाय रोवून उभा होता.
आमच्या ऑफिसमधली हाऊसकीपिंगची मुलं आली डोळ्यासमोर. सगळी यच्चयावत मराठी मुलं-मुली. बरीचशी अंग चोरून काम करणारी, सांगकामी. सकाळी उशिरा जरी आली, तरी रोजची वेळ झाली की, बिनदिक्कत निघणारी… दोन-पाचशे रुपयांसाठी नोकऱ्या बदलणारी, न सांगता दांड्या मारणारी…
पगार किती, तर पंधरा ते अठरा हजार! वेगळं काहीतरी करावं, छोटासा व्यवसाय करावा, अशी मानसिकताच न रुजलेला आपला समाज आणि या समाजाचाच एक अविभाज्य भाग असलेली ही मुलं आणि अर्थात, आपण सगळेच, काही अपवाद वगळता!
हेही वाचा – पुस्तकांमध्ये रमलेला माणूस
सदोदित, नोकरी ही एकच मानसिकता आणि तेवढं एकच ध्येय बाळगणारी, मराठी असल्याचा वृथा अभिमान उराशी कवटाळणारी आणि त्यासाठी हिंदीत बोलणाऱ्या लोकांचा दुस्वास करणारी. हीच मुलं मग लोकल गाड्यांमध्ये, ‘हिंदी का बोलतोस? मराठीत बोल,’ म्हणत परप्रांतीयांच्या जीवावर उठतात आणि स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आयुष्याचं मातेरं करून जातात…
इथे परप्रांतीयांची भलामण करण्याचा उद्देश अजिबातच नाही, पण त्यांचा दुसऱ्या मातीत जाऊन रुजण्याचा हा गुण सगळ्यांनीच अनुकरण करण्यायोग्य, यात दुमत नसावं.
सहज म्हणून एकदा आमच्या परिसरातल्या किरकोळ दुकानांच्या मालकांची नोंद करत गेलो मनाशी आणि पोळीभाजी केंद्र, किराणा दुकानदार, चर्मकार, डॉक्टर, औषधांचं दुकान असे काही किरकोळ अपवाद वगळता बाकी सगळी दुकानं मारवाडी, उत्तर भारतीय, सिंधी, गुजराती, शेट्टी आदी लोकांच्या ताब्यात असलेली बघून मन विषण्ण झालं. आपले लोक फक्त पाच टक्के आणि इतर भाषिक पंचाण्णव टक्के… अशी ही विलक्षण विषम आकडेवारी. डोंबिवलीसारख्या मराठी बहुल उपनगराची ही गत, मग इतर ठिकाणची तर गोष्टच नको!
कोण जबाबदार या परिस्थितीला, कधी आपण नोकरी करण्याच्या मानसिकतेतून बाहेर येऊन, नोकरी देण्याच्या मानसिकतेत शिरणार, याचं उत्तर कसं आणि कधी मिळणार आणि कोण देणार?
कुठे कमी पडतो आपण?


