दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 30 ऑगस्ट 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 08 भाद्रपद शके 1948; तिथि : द्वितीया 09:37; नक्षत्र : उ. भाद्रपदा 27:44;
- योग : शूल 27:45; करण : वणिज 21:17;
- सूर्य : सिंह; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:56;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
आदित्य पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
संगीतकार दशरथ पुजारी
टीम अवांतर
मराठीतील प्रसिद्ध संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म 30 ऑगस्ट 1930 रोजी बडोदा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मात्र मुंबईत गिरगावातील युनियन हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील वैद्यकीय पेशात असल्यामुळे पुजारी कुटुंबीयांचे सोलापूर, बार्शी, पंढरपूर अशा विविध ठिकाणी वास्तव्य घडले. बार्शीच्या गोपाळराव भातंब्रेकर गुरुजींकडून दशरथ पुजारी यांनी संगीताचे आणि गायनाचे धडे घेतले.
वयाच्या अवघ्या 18 वर्षांपासूनच त्यांनी संगीत दिग्दर्शनातील कारकिर्दीस सुरुवात केली. ते स्वतः उत्तम हार्मोनियम वादकही होते. नंतरच्या काळात पुजारी यांनी पं.लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडून जयपूर घराण्याची तालीम घेतली. पुजारी हे एक उत्तम संगीतकार आणि तितकेच उत्तम गायक देखील होते.
हेही वाचा – शर्वायच्या आयुष्यात माधवची लुडबूड
खरंतर पुजारी यांना शास्त्रीय संगीतात अधिक गोडी होती आणि त्यातच त्यांना वाटचाल देखील करायची होती. मात्र देवाच्या मनात काही वेगळंच होतं. पुजारी यांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या की ते शास्त्रीय संगीताऐवजी भावगीतांकडे वळले. सुरुवातीला जे. एल. रानडे, जी. एन. जोशी, ज्योत्स्ना भोळे यांची गाणी ऐकून पुजारी यांनी भावगीतांचा अभ्यास केला. गीतांना चाली लावण्याचा छंदच त्यांना जडला. पुढे त्यांनी ‘श्रीराम घनश्यामा’ आणि ‘हास रे मधु हास ना’ या दोन गीतांना संगीत दिग्दर्शक म्हणून स्वरबद्ध केले. ही दोन्ही गाणी प्रमोदिनी देसाई यांनी सुरेल आवाजात गायिली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने पुजारी यांच्या संगीत दिग्दर्शकाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 1952 साली ते आकाशवाणीची स्वरचाचणी देऊन आकाशवाणीवर नियमित गाऊ लागले. अर्थातच त्यामुळे मराठी भावगीतांना एक अवीट गोडीचा गायक आणि उत्तम संगीतकार लाभला.
गायक म्हणून त्यांना जास्त संधी मिळाली नसली तरी त्यांनी जी काही मोजकी गाणी गायली ती सगळीच विलक्षण लोकप्रिय झाली. तुलनेत संगीतकार म्हणून त्यांची कारकीर्द अधिक काळ सुरू राहिली. पुजारी यांनी स्वत: गायलेल्या गाण्यांची संख्या खूपच कमी आहेत. तरी सुद्धा ‘अशीच अमुची आई असती’ किंवा ‘अजून त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते’ अथवा ‘हरी भजनाविण काळ घालवू नको रे ‘ हे भक्तिगीत अशा सगळ्याच प्रकारची गाणी गाजलेली आहेत. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले ‘माणुसकीच्या शत्रूसंगे’ हे समरगीत पुजारी यांनीच पहिल्यांदा आकाशवाणीसाठी गायलं होतं. आकाशवाणीमुळे पुजारी यांचं नाव घराघरात पोहोचलं.
हेही वाचा – उमानं ऐकली वंदनाची व्यथा
त्यांनी संगीतबद्ध केलेली अवीट गोडीची आणि गाजलेली अनेक गाणी प्रामुख्याने सुमन कल्याणपूर आणि माणिक वर्मा यांनी गायलेली आहेत. तरीही लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्याकडून पुजारींनी अभंग गाऊन घेण्याचा कमालही केली होती. याशिवाय आपल्या प्रदीर्घ संगीत कारकीर्दीत पुजारी यांनी मंगेश पाडगावकर, रमेश आणावकर, शांताराम नांदगावकर, सुधांशु, योगेश्वीर अभ्यंकर, मधुकर जोशी यांसारख्या गीतकारांच्या गीतांना सुमधुर चाली लावल्या. ‘झिमझिम झरती श्रावणधारा’, ‘अशीच अमुची आई असती’, ‘चल ऊठ रे मुकुंदा’, ‘केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’, ‘मृदुल करांनी छेडित तारा’, ‘देव माझा विठू सावळा’ ‘क्षणभर उघड नयन देवा’ इत्यादी गाणी त्यांच्या अतिशय गाजलेल्या गाण्यांपैकी आहेत. मराठी सुगम संगीतातील 350 गाण्यांना पुजारी यांनी चाली लावल्या आहेत.
प्रसिद्ध संगीत-संयोजक आणि अनिल – अरुण या संगीतकार जोडीतील अनिल मोहिले हे उमेदवारीच्या काळात दशरथ पुजारी यांचे सहाय्यक होते. पुजारी यांनी ‘अजून त्या झुडपांच्या मागे’ हे आत्मचरित्रपर पुस्तकही लिहिले. कवी पी. सावळाराम हा प्रतिष्ठेचा पुरस्कार तसेच ‘चतुरंग संगीत सन्मान‘ पुरस्कार पुजारी यांना मिळाला होता. 13 एप्रिल 2008 रोजी त्यांचे निधन झाले.


