दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 01 नोव्हेंबर 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 10 कार्तिक शके 1948; तिथि : सप्तमी 14:51; नक्षत्र : पुष्य 28:30;
- योग : साध्य 14:38; करण : बालव 25:57;
- सूर्य : तुळ; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:37; सूर्यास्त : 18:06;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
भानुसप्तमी
कालाष्टमी
कराष्टमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर
टीम अवांतर
ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1918 रोजी अहमदनगर येथे झाला. मात्र त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. भावे स्कूलमध्ये शिकत असताना ते शिक्षकांच्या हुबेहूब नकला करायचे. एकदा ऐनवेळेस ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील ‘भद्रायू भाटकर’ हे पात्र शरद तळवलकर यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती.
कॉलेजमध्ये गेल्यावर 1935 साली ‘रणदुंदुभी’ नाटकातील शिशुपालाची भूमिका करणारा कलाकार ऐन वेळी अडला. त्यावेळीही शरद तळवलकर यांनी आपल्या अभिजात कलागुणांनी त्या भूमिकेत कमालीचा रंग भरला. तेव्हापासून दरवर्षी कॉलेजच्या स्नेहसंमेलनातील नाटकांमध्ये त्यांना भूमिक मिळावी यासाठी आग्रह धरला जाऊ लागला. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली.
हेही वाचा – शरीरात उष्णता अधिक आहे? हे घरगुती उपाय करून पाहा…
नटश्रेष्ठ केशवराव दाते यांच्या पाहण्यात त्यातील एक भूमिका आली आणि ‘नाट्य विकास’ संस्थेत त्यांनी तळवलकरांना सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले. नाटकात कामे करणे ही गोष्ट त्या काळात फारशी समाजमान्य नव्हती. त्यामुळे वडिलांनी नाटक कंपनीत जाण्यास विरोध केला. पण नाटकाच्या वेडापायी शरद तळवलकरांनी घर सोडले. एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे मिलीटरी अकाउंट्समध्ये नोकरी करत त्यांनी आपली अभिनयाची आवड जोपासली.
‘छापील संसार’ नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. 1952 साली गाजलेल्या ‘पेडगावचे शहाणे’ आणि ‘लाखाची गोष्ट’ या राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपटांत त्यांना छोट्या भूमिका मिळाल्या. याशिवाय दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘अखेर जमलं’ या चित्रपटात लक्षात राहण्याजोगी भूमिका मिळाली. तिथून सुरू झालेला त्यांचा अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता.
नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता. नटश्रेष्ठ बालगंधर्वांसोबत केलेल्या ‘एकच प्याला’ नाटकात रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. ‘लग्नाची बेडी’ या नाटकातला ‘गोकर्ण’ शरद तळवलकरांनी आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केला. ‘करायला गेलो एक’ या तुफान विनोदी फार्सने शरद तळवलकर यांचे नाव महाराष्ट्रभर गाजायला सुरूवात झाली.
मराठी चित्रपट सृष्टीत राजा गोसावी यांच्याबरोबर ‘अवघाची संसार’, ‘दोन घडीचा डाव’ आणि ‘याला जीवन ऐसे नाव’ हे त्यांचे चित्रपट गाजले. या शिवाय भावबंधनमधील ‘कामण्णा’, ‘अपराध मीच केला’ मधील ‘गुप्तेकाका’, ‘दिवा जळू दे’मधील ‘गोळे मास्तर’ अशा अनेक नाटकांमधील अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या. ‘अप्पाजींची सेक्रेटरी’ आणि ‘सखी शेजारीण’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका हलक्या फुलक्या; पण संपूर्ण नाटक पेलून धरणाऱ्या दमदार अशाच होत्या.
पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील ‘नभोनाट्ये’ हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. ‘कलाकार’ ही नाट्यसंस्था देखील त्यांनी उभारली. ‘मुंबईचा जावई’, ‘धाकटी मेहुणी’, ‘आली अंगावर’, ‘नवरे सगळे गाढव’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘गडबड घोटाळा’, ‘धुमधडाका’ यांसारख्या चित्रपटांमधील विनोदी भूमिका तर ‘एकटी’, ‘लेक चालली सासरला’, ‘अष्टविनायक’, ‘कैवारी’ या चित्रपटांतील चरित्र भूमिकाही त्यांनी अजरामर केल्या.
हेही वाचा – एका मुठीतील आनंद…
जावई विकत घेणे आहे आणि एकटी या चित्रपटांतील भूमिकांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. याशिवाय नाट्यसृष्टीत अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या विष्णुदास भावे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 1992 साली वाशी येथे झालेल्या 72 व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. गुदगुल्या आणि अनुभवाचे बोल ही त्यांची दोन पुस्तकेदेखील प्रकाशित झाली. प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनी शरद तळवलकर यांच्या अभिनयाचे मार्मिक वर्णन करून ठेवले आहे. ते म्हणतात, “हा माणूस इतका साधा आहे की, यांच्या नावात काना, वेलांटी, उकार काहीच नाही हो.” जवळजवळ 60 वर्षे अभिनय करणाऱ्या या अवलियाचे 22 ऑगस्ट 2001 रोजी निधन झाले.


