लेखिका आशा बगे यांच्या ‘भूमी’, ‘मारवा’ यासारख्या कादंबऱ्या आणि कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. दिवाळी अंकातून त्यांच्या कथा आपण वाचलेल्या आहेत. त्यांच्या ‘सेतू’ या कादंबरीबद्दल मी ऐकलं होत, त्यामुळे उत्सुकता होतीच. कथानकाची घट्ट वीण असलेली ही कादंबरी म्हणजे ब्रिजमोहन आणि सुचरिता यांची कहाणी आहे.
कादंबरीचं नाव इतकं योग्य, चपखल आहे की, याहून वेगळं नाव पटलंच नसतं. ब्रिजमोहन आणि सुचरिता या दोन व्यक्ती प्रेमाच्या बंधनाने एकत्र येतात, तेव्हा त्यांची अगदी पूर्णत: भिन्न असलेली पार्श्वभूमी आड येत नाही. सुचरिता विद्वान लेखक, विचारवंत, इतिहास संशोधक डॉक्टर नियोगींची मुलगी. तिच्या आई कुमुदने स्वत: शाळा काढून ती नावारूपाला आणली. कुमुद पतीबरोबर (त्यांना सुचरिता ‘दादा’ म्हणते) राहिली नाही, पण घटस्फोट सुद्धा घेतला नाही. त्यांच्या घरातलं वातावरण पुस्तकांनी भारलेलं. वडील सतत लिहिणारे, वाचणारे तसेच अलिप्त, मितभाषी. अर्थ्रायटिसने ग्रस्त असलेली, स्वत:चा चेहरा नसलेली कुमुदची बहीण बबी दादांजवळ राहात असते, त्यांची काळजी घेत असते. सुचरिताने इम्युनोलॉजी विषयात पीएचडी केलेलं आहे.
ब्रिजमोहनही उच्चशिक्षित. त्याचं बनारसजवळच्या गावातलं शेतकरी कुटुंब खाऊन-पिऊन सुखी. पण अगदी प्रतिगामी विचारांचं. वडील, आई, भाऊ नंदकिशोर, वहिनी, मुलगा सुमंगल, जान्हवी, अर्पिता, नीरजा बहिणी… हे त्याचं कुटुंब. कुटुंबावर, घरावर आणि गंगेवर त्याचा जीव असतो. घराला आर्थिक सहाय्य करून तो वर आणायचा प्रयत्न करतो.
हेही वाचा – भारतीय तत्वज्ञानाची झलक… पवनाकांठचा धोंडी!
ब्रिजमोहन आणि सुचरिता यांच्यातला हा सेतू प्रतिगामी आणि पुरोगामी कुटुंबांमधला ‘सेतू’ आहे… आणि शहर आणि गाव यातलाही! वीस वर्षांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यानंतर ब्रिजमोहन आणि सुचरिता त्यांचा मुलगा उदितसह परत येतात. अमेरिकेत जन्मलेला, वाढलेला उदित. आता भारत आणि अमेरिका यातला ‘सेतू’!!
कादंबरीची सुरुवात फ्लॅशबॅकमध्ये आहे. सुचरिता एकटीच बनारसच्या घरी सासऱ्यांच्या मृत्युनंतर भेटायला आली आहे. नवऱ्याबरोबर पहिल्यांदा सासरी आलेली असताना ती ‘या घरात मी येणार नाही, तुझ्या माणसांशी संबंध ठेवणार नाही,‘ असे सांगून निघून गेलेली असते. नंतर ती कधी येतही नाही. मोठा झाल्यावर उदित एकटा बनारसच्या घरी येऊन जातो, ब्रिजमोहन एकदा जाऊन येतो आणि पुन्हा येणार नाही, असेही सांगतो. असे असले तरी त्या घराचा आणि त्याचा भावनिक ‘सेतू’ तो तोडू शकत नाही! हा सेतू इतका मजबूत आहे, की पत्नीप्रेम, वात्सल्य, ज्ञानलालसा, आर्थिक तफावत, कीर्ती, मानमरातब यापैकी कशालाही जुमानत नाही. सेतू मोडण्याचे प्रयत्न करताना तो स्वतःलाच हरवून बसतो.
वडिलांशी असलेला जन्मजात सेतू अस्तित्वहीन वाटू लागल्यानंतर तो पुन्हा सांधायचा प्रयत्न सुचरिता करते, त्यावेळी आधाराचे खांब कमकुवत आहेत, भावनेचे सांधे दुर्बल आहेत आणि नात्याचा पायाच कच्चा आहे… हे तिच्या लक्षात येते आणि त्याला लागलेली असत्याची कीड दिसते. तिचे पूर्वग्रह किती चुकीचे होते, हेही समजते. दादांबरोबर असलेल्या नात्याचा सेतू कितीही कमजोर असला, तरी त्यातला एक बंध तुटला नव्हता. जे दादाचं घर तिला कधीच आपलं वाटलं नाही, ते विचित्र कारणांनी तिचं झालं होत.
माणूस कितीतरी अदृश्य सेतूंनी जगाशी जोडलेला असतो. त्याच्या आत, मनात एक सेतू असतो. ब्रिजमोहनचा त्याच्या घराशी असलेला सेतू त्याने मोडून टाकला, तरी आतला सेतू तसाच होता. तोही ढासळू लागल्यावर त्याने जगाशी बांधलेले इतर सेतूही ढासळले. अर्पिताने तिचा एक सेतू जाणीवपूर्वक मोडला, परतीचा रस्ता बंद केला आणि नवा सेतू बांधायला घ्यायचं स्वातंत्र्य मिळवलं. सुचरिताला ब्रिजमोहनमुळे मिळालेला सेतू कितीही प्रयत्न केले तरी, मोडता आला नाही.
हेही वाचा – बनगरवाडी… लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी
कथानकात वाचक न्यायाधीशाची भूमिका घेऊन कोण बरोबर, कोण चूक याची शहानिशा करू शकत नाही. भावनांची गुंतागुंत असलेलं हे कथानक कोणालाही दोषी ठरवत नाही आणि कोणाचेही गुणगान करत नाही. परदेशात एकावर एक असे फ्लायओव्हर असतात. आकाशातून त्यांच्याकडे पाहिलं तर अनादी अनंत असलेले, एकावर एक रचलेले हे उड्डाणसेतू एकमेकांत गुंतलेले तरी अलिप्त, आपापल्या मार्गाने, अविरत, अखंड वाहत असलेले दिसतात… तशीच या कथानकातली माणसं वाटतात. त्यांचे नातेसंबंध उलगडताना लेखिका कितीतरी हृदयाला भिडणारी वाक्य लिहिते. दादांना जेव्हा सुचरिता विचारते, “तुम्ही आईबरोबर का राहिला नाहीत?” यावर ते सहज उत्तरतात, “राहायलाच हवं का?” शेवटी तिला ते एक धक्कादायक गुपित सांगतात तेव्हा म्हणतात, “आता इतकं आयुष्य पाहिल्यावर ही बाब तुला अवास्तव महत्त्वाची वाटणार नाही, तर तुझ्या साऱ्या जगण्यात ती मिसळून जाईल.”
सुचरीताला ती उदास संध्याकाळ ‘गंगेच्या पाण्यावर संध्याकाळी लाल सोनेरी सूर्य कसा पसरत जातो, ते मोहन सांगायचा…’ तशी दिसते. तिने कधीही न पाहिलेली, पण ब्रिजमोहनने अनुभवलेली… हाही या दोघांच्या मधला अतूट सेतूच.
मला आवडलेली आणि संग्रही असलेली कादंबरी.


