Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, May 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : माझा प्रवास… एखादा सिंह डरकाळी फोडतो, तेव्हा-
    ललित

    Bookshelf : माझा प्रवास… एखादा सिंह डरकाळी फोडतो, तेव्हा-

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारMay 6, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, पुस्तक वाचन, पुस्तकसंग्रह, मी मराठी, अभिजात मराठी, Bookshelf, विष्णूभट गोडसे वरसईकर, विष्णूभट गोडसे यांचा माझा प्रवास, माझा प्रवास पुस्तक, मराठीतील पहिले प्रवास वर्णन, 1857चे स्वातंत्र्य युद्ध, 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचे वर्णन, बखरीसारखे लिहिले माझा प्रवास, झाशीच्या राणीच्या शौर्याचे वर्णन,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    विष्णूभट गोडसे वरसईकर  यांचे ‘माझा प्रवास’ (संशोधित आवृत्ती- चिंतामणी विनायक वैद्य (1907)) हे मराठीतले पहिले प्रवास वर्णन आहे. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी लेखक विष्णूभट गोडसे वरसईकर उत्तर भारतात फिरत होते. त्यांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवलेले स्वातंत्र्य समर लिहून ठेवले आहे. त्यांचा हेतू मात्र इतिहासाची नोंद करण्याचा नव्हता. त्यांनी डायरी लिहिली आहे, असे म्हणायला हरकत नाही. या पुस्तकाला इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे, कारण हे बखरीसारखे लिहिले आहे. परदेशी प्रवाशांनी भारतात आल्यावर अशा प्रकारच्या बखरी लिहून ठेवल्या, ज्या आज ऐतिहासिकदृष्ट्‍या मौलिक पुरावा आहेत. उदा. मॅगस्थेनीसचे इंडिका.

    पुस्तकाच्या प्रस्तावनेत चि. वि. वैद्य म्हणतात की, 1857च्या युद्धाबद्दल (‘बंड’ असे लिहिले आहे, पण हा शब्द मला योग्य वाटत नाही.) ब्रिटिशांनी लिहिले आहे ते एकांगी आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून आहे. एतत्देशीय नसल्याने बरेच संदर्भ त्यांना कळत नाहीत आणि अर्थातच त्यांनी स्वतःची बाजू मांडली आहे. त्यामुळे या पुस्तकात गोडसे भटजींनी लिहिलेला वृत्तांत अधिक विश्वसनीय आहे.

    त्यांनी पेणच्या वरसईपासून गया-प्रयागपर्यंत बराचसा प्रवास पायी केला. परतीचा प्रवास तर पायीच केला. त्यांनी निसर्ग सौंदर्य वर्णन केलं आहे. सामान्य लोकांची स्थिती, आर्थिक स्थिती, राजकारण, संस्थाने, धार्मिक विधी, श्रद्धा हे सर्व लेखनाच्या ओघात लिहिले आहे. ही माहिती सांगोवांगी नसून प्रत्यक्ष अनुभवलेली आहे. त्यांनी झाशीच्या राणीला प्रत्यक्ष पाहिले, तिच्या पदरी काम केले हे वाचून माझी उत्सुकता अधिक वाढली. आपण युद्धाच्या हकीकती वाचतो, तेव्हा राजांच्या, नायकांच्या बाबतीत घडलेल्या घटना समजतात; पण सामान्य माणसाची कशी स्थिती होते, हेही समजणे तितकेच महत्त्वाचे असते.

    हेही वाचा – Bookshelf : वलय… सर्वच कथा सशक्त

    राजाचा वाडा लुटला जातो तेव्हा इतरांची, अगदी गोरगरीबाची सुद्धा, संपत्ती लुटली जाते, अन्नान्न दशा होते. लेखक एक सामान्य गरीब भिक्षुक असल्यामुळे एका नव्या दृष्टीने हे स्वातंत्र्यसमर बघायला मिळते.

    लेखक सुरुवात कौटुंबिक माहिती देऊन करतात. बहीण, भावंडांच्या विवाहांमुळे कर्ज झाले होते. उत्पन्न तुटपुंजे होते. कर्जाच्या डोंगराखाली असताना एकामागोमाग एक संकटे येत होती. त्याबद्दल सांगताना लेखक ‘खल्वाटे चंड किरणे अति तप्त झाला’ हा श्लोक लिहितात. भावंडांत आधीच असलेले प्रेम दारिद्र्याने ‘दार्टय’ झाले, असा शब्द वापरतात. उत्तरेत बायजाबाई शिंदे मथुरेस यज्ञ करणार आहेत आणि ब्राह्मणांना आमंत्रित केले आहे, असे समजल्यावर ते चुलते रामभट यांच्याबरोबर उत्तरेत जायला निघाले. सात महिन्यांत परत येऊ, असे आश्वासन देऊनही पत्नी, आई आणि इतर कुटुंबीय नाराज होते. हिंदुस्तानात (उत्तरेत) लोक भांग पितात आणि स्त्रिया नादाला लावतात अशी समजूत होती… हे वाचून आता गंमत वाटते.

    प्रवासाला निघताच त्यांना काही लोकांनी युद्ध होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत, असे म्हणत माघारी परत फिरायला सांगितले. पण गरीब भिक्षुकाला धोका नाही, असे वाटल्यामुळे ते पुढे निघाले. महूला आल्यावर मात्र त्यांना परिस्थिती समजली. महूमध्ये सैनिकांची छावणी होती. काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावलेली आहे. ती दातांनी तोडावी लागल्याने हिंदू आणि मुसलमानांचा धर्म भ्रष्ट होणार आणि सर्वांना ख्रिस्ती करणार… त्यामुळे जाळपोळ, लुटालूट होणार असल्याचे शिपाई म्हणाला. छावणीजवळ त्यांना तोफांचे, बंदुकांचे आवाज आले. त्यांना सैनिकांनी गराडा घातल्यावर भिक्षुक असल्याचे सांगून सुटका करून घेतली. पुढे इंदूरवरून उज्जैनला आले. चर्मण्वती (चंबळ) नदी पार करून धारला गेले. तिथला राजा मृत्यू पावला होता. धारा नगरी पाण्यावर वसली आहे, असे ते लिहितात.

    नानासाहेब पेशवे पेन्शन बंद झाल्यामुळे चिडले होते. त्यांना मीरतच्या उठावाची बातमी मिळाल्यावर त्यांनी युद्धात सामील व्हायचे ठरवले. तात्या टोपेंनी ग्वाल्हेरमधून शिंद्यांकडून कुमक घेतली. कानपूर शहर जिंकून गोऱ्यांना मारले.

    हेही वाचा – Bookshelf : ‘नाच ग घुमा’… लेखिकेला रिंगणाच्या बाहेर पडायचेच नाही!

    गोडसे भटजींनी हे लेखन प्रवासावरून परत आल्यावर पंचवीस वर्षांनी लिहिले. ते लिहितात, पंचवीस वर्षांपूर्वी लोकांची धर्मावरची श्रद्धा अधिक होती. आज अशी काडतुसे मिळती, तर युद्ध होणार नाही. लोकांची प्रेते झाडांवर लटकत असताना पत्रिकांची लांब भेंडोळी उलगडून ग्राहनुकूल्य पाहावे, हे आज चमत्कारिक वाटेल. पण त्यावेळी तलवारीच्या धारेपेक्षा घ्रुतधार आणि ग्रहानुकूल्य पाहून केलेले प्रयाण शत्रूक्षय करेल, यावर श्रद्धा होती.

    गोऱ्या लोकांची नाव वाळूत अडकली असता तोफगोळे टाकून लोकांना मारले, ज्यात स्त्रिया होत्या. वाचलेल्या बायका, मुलांना कैदेत ठेवले होते. त्यांनाही काही कारणाने मारून टाकले. लेखक याची निंदा करतात आणि शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवून दिले होते याची आठवण करून देतात. यानंतर कानपुरात झालेल्या भीषण युद्धाचे वर्णन येते. यात पेशव्यांचा पराभव झाला होता. इंग्रजांनी नंतर वाडा पाडला. तिथे सरस्वतेश्वराचे भव्य मंदिर होते तेही पाडले. लखनऊ लुटले. इंग्रजांचा या युद्धामुळे खूप फायदा झाला, त्यांना अमाप संपत्ती मिळाली.

    नंतर लेखक झाशीला गेले. शेवटचे संस्थानिक गंगाधर बाबांची त्यांनी दिलेली माहिती ऐकीव आहे. त्यांची रयतेवर इतकी जरब होती की, लोक दारे उघडी टाकून झोपत, पण चोरी होत नसे. ते एकदा इंग्रज अधिकाऱ्याला म्हणाले होते की, इतक्या दूरस्थ द्विपावरून येऊन तुम्ही आम्हाला कसे हरवले?

    राणी लक्ष्मीबाईंबद्दल माहिती सविस्तर लिहिली आहे. त्यांचे वडील तांबे लेखकाच्या परिचयाचे होते. राणी लक्ष्मीबाईंची दिनचर्या वर्णन केली आहे. त्यांना व्यायामाची, घोडेस्वारीची आवड होती. त्या दुपारी तीन नंतर कचेरीत येताना कधीकधी पुरुष वेष घालत. राणी न्यायप्रिय होती. गुन्हेगाराला कठोर शिक्षा देत असे. रयतेची काळजी घेत असे. लेखकाने राणीचे गुणवर्णन केले आहे. तिची स्तुती करताना एकीकडे ते अनुष्ठानात विधवा राणीचे नाव घेतले म्हणून नाराजी व्यक्त करतात.

    युद्धाची तयारी करताना राणीने गोरगरीब उपाशी राहणार नाहीत, याची व्यवस्था केली होती. इंग्रजांनी शहराचे बिजन केले असे लेखक म्हणतात… बिजन म्हणजे पाच वर्षांपेक्षा कमी वयाचे आणि ऐंशी वर्षे वयाच्या पुढचे लोक जिवंत ठेवले, बाकीच्यांना मारले. राणी युद्धासाठी घोड्यावर स्वार होऊन निघाली, त्यावेळी दत्तक मुलगा पाठीशी बांधला. तो बारा वर्षांचा होता. राणीचे जे चित्र असते, त्यात मूल लहान दाखवलेले असते.

    झाशी लुटली गेल्यामुळे लेखकाने जमवलेले पैसे सुद्धा गेले. काल्पीपासून काही कोसांवर गेल्यावर लेखक विश्रांतीसाठी थांबले असता राणी आणि सैनिक घोड्यावरून तिथे आले. राणी म्हणाली, ‘मी विधवा धर्म सोडून हिंदू धर्माच्या अभिमानामुळे लढत आहे.’ राणीच्या लढाईचे वर्णन वाचून तिच्याबद्दलचा आदर द्विगुणीत होतो. तिचे मनोबल आणि राष्ट्रनिष्ठा किती प्रखर होती, हे कळते. ती स्त्री असल्यामुळे आलेल्या नैसर्गिक अडचणींवर मात करावी लागली होती. कारण ती नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडली होती. तिच्याकडे वस्त्रे, धन नव्हते.

    झाशीनंतर लेखकाने भागीरथी नदी आणि ब्रह्मावर्ताच्या निसर्गाचं सुंदर वर्णन केलं आहे. यानंतर पेशव्यांचे वर्णन आहे. इंग्रजांनी भेटीला बोलवून पेशव्यांचा अपमान केला आणि त्यांना कैद केले. ग्वाल्हेरचे संस्थान इंग्रजांचे मांडलिक झाले.

    लेखक जालवणहून बांद्याला गेले, तिथे चित्रकूटचे महाराज कैदेत होते. बुंदेलखंडातल्या सूर्ययंत्र आणि सूर्यमंदिराचे दर्शन केले. यानंतर ते जयपूरला गेले. बेटमा गावात रोगराई पसरली होती, त्यामुळे गावाबाहेर लेखकासह तिघांनी मिळून स्वयंपाक केला. पण पुढच्या गावात तिसरा ब्राह्मण मरण पावला. लेखकाची तब्येत ठीक नव्हती.

    लेखक बेलसियाला गेले. तिथला राजा तुलापुरुष करणार होता. अनुष्ठानासाठी कुंडमंडप घातला होता. राजा, राणी, शाळीग्राम एका तागडीत आणि दुसरीत रुपये घालून तुलापुरुष झाला. द्रव्य लोकांत वाटून दिले. पुढे गोमती नदी, निमिषारण्यात गेले. अयोध्येला राम नवमीला पोहोचले, तेव्हा तिथल्या एका पुजाऱ्याने रामाची मूर्ती शरयूत कशी सापडली, ती कथा सांगितली. तिथून काशी, गया, प्रयाग आणि विन्ध्यवासिनीचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला. गंगेतून कावड न्यायचे ठरवले, तेव्हा इतरांनी हे काम कठीण आहे, असं सांगितलं तरी त्यांनी बावीस कुप्या भरून गंगाजल घेतले. पैसे नाही तर किमान इतके तरी मातापित्यासाठी करावे, असे वाटले.

    हेही वाचा – भारतीय तत्वज्ञानाची झलक… पवनाकांठचा धोंडी!

    पागोटे घालून अनवाणी चालायचे, शुद्ध असेल तर परान्न घ्यायचे, असा नियम होता. कावड घेऊन जाताना कष्ट झाले. ते इंदूरला आले. त्यांनी अहल्याबाई होळकरांचा सुद्धा उल्लेख केला आहे. इंदूरला किबेंच्या घरी मुलीचा विवाह होता. तिथे काही पैसे मिळाले. तिथून वणी, नाशिक, पंचवटी, पुणे असा प्रवास केला. तिथून कावड घेऊन घरी पोहोचले. सात महिन्यांच्या जागी दोन वर्षं लागली होती…

    लेखकाची स्मरणशक्ती आणि प्रखर बुद्धिमत्तेची दाद द्यावीशी वाटते. त्यांचे पाठांतर, शास्त्राचे ज्ञान उत्तम असल्यामुळे त्यांना राणीच्या दरबारात सन्मान मिळाला होता. त्यांचे निरीक्षण आणि चौकस बुद्धी तीव्र असल्यामुळे बारकावे लिहू शकले. भारताच्या इतिहास लेखनात अशा प्रकारचे लेखन मिळत नाही, ही मोठी त्रुटी आहे. त्यामुळे इंग्रजांनी आणि इतर परदेशी लोकांनी लिहिलेल्यावर विश्वास ठेवावा लागतो.

    Until Lion learns to tell his story, hunter is the winner ही किती सार्थ उक्ती आहे! आपल्याकडे कायमच शिकारी जिंकत आलेला दाखवला आहे, पण कधीतरी असा एखादा सिंह डरकाळी फोडतो, तेव्हा सत्य समजते… त्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026 ललित

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026 ललित

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    By डॉ. अस्मिता हवालदारMay 19, 2026

    लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी 2005 साली प्रसिद्ध झाली आणि…

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026

    Recipe : खमंग सुरळीच्या वड्या अन् स्वादिष्ट गव्हाचे वडे

    May 19, 2026

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026

    Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें

    May 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 302
    • अवांतर 186
    • आरोग्य 111
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 425
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 211
    • मैत्रीण 19
    • ललित 637
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.