माधवी जोशी माहुलकर
हिवाळा सुरू झाला की, विदर्भात बाजारामधे तुरीच्या शेंगा दिसायला लागतात. पावसाळा संपता संपता मुगाच्या शेंगाच्या दाण्यांची आमटी आणि हिवाळा सुरू झाला की, तुरीच्या दाण्यांचा ‘दाणेभात’ हे समीकरण विदर्भातील घराघरात ठरलेल असतं. विदर्भात तुरीच्या दाण्यांना सोले देखील म्हणतात. सीझनल भाज्या आणि कडधान्यांचे विविध पदार्थ करण्यात विदर्भातील गृहीणी नेहमी दक्ष असतात. तुरीचा दाणेभात चवीला भन्नाट आणि करायला अतिशय सोपा आहे!
साहित्य
- तांदूळ – दीड वाटी
- तुरीचे ओले दाणे – 1 वाटी
- मोहरी – अर्धा चमचा
- जिरं – 1 चमचा
- आलं, लसुण पेस्ट – 1 चमचा
- हिरवी मिरची, कोथींबीरीची पेस्ट
- धणे पुड – 1 चमचा
- जिरेपुड – 1 चमचा
- दालचिनी – एक तुकडा (फ्लेव्हरकरिता)
- गोडा मसाला – 1 चमचा
- लाल तिखट – 2 चमचे
- कढीलिंबाची पाने – 6 ते 7
- हिंग – 1 लहान चमचा
- हळद – गरजेनुसार
- मीठ – चवीनुसार
- तेल – पळीभर
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… भातावरचे पिठले
कृती
- तांदूळ स्वच्छ धुऊन पाणी निथळत ठेवावे.
- पातेल्यात पळीभर तेल टाकून तापवावे. तेल तापले की, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचे जिरे टाकावे.
- मोहरी, जिरं तडतडलं की, दालचिनीचा एक तुकडा टाकावा. अर्धा चमचा हिंग टाकून लगेच कढीलिंबाची पाने टाकावीत.
- त्यानंतर तेलात आले, लसणाची पेस्ट टाकून परतून घ्यावी. नंतर हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकावी आणि तीपण परतून घ्यावी.
- या मिश्रणात थोडेसे पाणी टाकावे आणि पाण्याला उकळी आली की, त्यामधे हळद, तिखट, धणे- जिरे पुड, गोडा मसाला टाकून ते छान ढवळून घ्यावे.
- लगेच धुतलेले तांदूळ टाकून हे मिश्रण छान परतवून घ्यावेत आणि साधारण तीन ते साडेतीन वाट्या पाणी घालून भात शिजायला ठेवावा.
- भात अर्धवट शिजला की, यामध्ये वाटीभर तुरीचे दाणे मिक्स करून तांदूळ परत एकदा छान परतून मंद आचेवर हा भात शिजू द्यावा.
- साधारणत: पंधरा मिनिटांत हा तुरीचा दाणेभात तयार होतो.
टीप
- गरमागरम वाफाळलेला, दाणा न दाणा मोकळा असलेला हा भात कढी किंवा ताक, मठ्ठा यासोबत सर्व्ह करा.
- याच्यासोबत तुरीच्या दाण्यांचा ठेचा छान लागतो.
पुरवठा संख्या – चार ते पाच व्यक्तींसाठी
तयारीसाठी कालावधी – 15 मिनिटे
शिजण्यासाठी – 25 मिनिटे
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात
तुरीच्या दाण्यांचा ठेचा
साहित्य
- तुरीचे दाणे – 1 वाटी
- लसूण पाकळ्या – 10 ते 12
- हिरव्या मिरच्या – 7 ते 8 (आवडीनुसार घेऊ शकता)
- बारीक चिरलेली कोथींबीर – मूठभर
- जिरे – 1 चमचा
- मीठ – चवीनुसार
कृती
- प्रथम एका कढईत अगदी थोड्या तेलावर तुरीचे दाणे खमंग भाजून घ्यावेत.
- त्यानंतर त्याच कढईत तेलावर मिरच्या आणि लसूण देखील भाजून घ्यावा.
- मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये भाजलेले तुरीचे दाणे, लसूण, हिरव्या मिर्च्या, कोथिंबीर, जिरे आणि मीठ घालून या मिश्रणाचा जाडसर ठेचा करावा.
टीप
- ठेचा किंवा चटणी जाडसर याकरिता करावा / करावी, जेणेकरून जेवताना अर्घवट क्रश झालेले तुरीचे दाणे जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा या ठेच्याला खरी लज्जत येते.
- हा सीझनल ठेचा पोळी, पालक- मेथीचे पराठे, धिरडे, बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी यासोबत खा मस्तच लागतो.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


