स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये गवारीची भाजी, कढी गोळे, साबुदाणा खिचडी, वांग्याचे भरीत बनविण्याच्या टिप्स पाहूयात.
- गवारीची भाजी करताना मीठ-गूळ घालताना तीन-चार चमचे दूध घालावे. गवारीच्या भाजीचा उग्रपणा कमी होतो. चटकन शिजते, खमंगपणा वाढून रुचकर होते.
- साबूदाणा भिजत घालताना त्यात तीन-चार चमचे दूध घातल्यास तो साबुदाणा मऊ आणि मोकळा होतो.
- कढी नेहमी करतो तशीच करावी, आवडेल त्या चवीची आणि स्वादाची, पण पाहिजे असल्यास एक दिल्ली गाजराचा जाड किसणीने किसलेला किस, हिरव्या मिरच्यांचा ठेचा, मीठ, जिरे पावडर, कोथिंबीर घालून मिश्रण तयार करावे. त्यात जाडसर बेसन घालून छोटे छोटे गोळे करावेत आणि कढीला उकळी आली की, त्यात सोडावे. दोन मिनिटांनी कढी खाली उतरवावी. या पिवळ्या आणि सोनेरी रंगाच्या कढीत केशरी रंगाचे गोळे खूप छान दिसतात.आणखी एक प्रकार करता येऊ शकतो. हवे असल्यास गाजराचे गोल काप, काकडीचे काप, एखाद्या फणसाचे गरे, पिकलेल्या केळ्यांचे काप किंवा शेवग्याची फुले कढीला उकळी आल्यानंतर टाकावीत. अशी ही कढी वेगवेगळ्या स्वादाची आणि चवीची तयार होते.
हेही वाचा – Kitchen Tips : कोबीचे रायते, कांद्याची कोशिंबीर अन् टोमॅटोचे सूप तयार करताना…
- आपण भरताची वांगी भाजतो, त्यावेळी वांग्याला थोडा तेलाचा हात लावावा. वांग्याला चार-पाच छिद्रे पाडावीत. त्यातील दोन-तीन छिद्रांत सोललेल्या लसणीच्या पाकळ्या खुपसून घालाव्यात. तसेच हिरवी मिरचीही एखाद्या छिद्रात खुपसून ठेवावी आणि नंतर वांगे भाजावे. छिद्र केल्यामुळे वांगी आतून छान भाजून तर निघतातच, पण लसूण आणि मिरचीमुळे भरताला एक आगळीच चव येते. नंतर वांगी गार झाल्यावर सोलून नेहमीप्रमाणे भरीत करावे.
हेही वाचा – Kitchen Tips : खमण ढोकळा, डोसा, ऑम्लेट बनवताना या टिप्स वापरून पाहा
- नेहमी तयार मसाल्याच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. कधी कधी भाजीला दाण्याचे कूट घालावे लागते आणि कूट घातल्यावर भाजीचा रंग बदलतो. त्यासाठी किसलेले खोबरे एक वाटी, अर्धी वाटी धणे, एक वाटी दाणे, पाव वाटी जिरे हे सर्व जिन्नस भाजून कुटून ठेवावे. वाटल्यास त्यात लसूणसुद्धा घालावा. भाजी फोडणीस टाकण्याच्या अगोदर तेलात मोहरी, हिंग टाकून हा मसाला परतून घ्यावा आणि वाटल्यास जास्त दाण्याचे कूटही घालावे. लाल रंगावर परतून झाल्यावर थोडे पाणी टाकून नंतर भाजीच्या फोडी टाकून भाजी शिजवावी. असेच दाण्याचे कूट आणि खोबऱ्याचा किस तेलात परतून भेंडीची भाजी करता येते. यामुळे भाजी तेलकट लागत नाही, तसेच दाट रस्सा होण्यास मदत होते. वरील मसाल्यात लसूण असला, तरी आठवडाभर टिकून राहतो.


