दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 29 मे 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 08 ज्येष्ठ 1948; तिथि : त्रयोदशी 09:50; नक्षत्र : स्वाती 10:37;
- योग : परिघ 28:35; करण : गरज 22:52;
- सूर्य : वृषभ; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:10;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
संगीतकार स्नेहल भाटकर
टीम अवांतर
संगीतकार स्नेहल भाटकर यांचे मूळ नाव वासुदेव गंगाराम भाटकर होते. 17 जुलै 1919 रोजी प्रभादेवी येथील पाटील वाडीत त्यांचा जन्म झाला. शिक्षिका असलेल्या आई सखुबाई यांच्या सुरेल आवाजामुळे स्नेहल भाटकर यांना लहानपणीच गाण्याची गोडी लागली. घराजवळच्या मारुती मंदिरातील होणाऱ्या भजनात ते पेटी वाजवत असत. श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी गाण्याचे धडे गिरवले. ‘एचएमव्ही’ या कंपनीमधील प्रवेशामुळे भाटकरबुवांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने वळण मिळाले. 16 जून 1939 रोजी ते पेटीवादक म्हणून या कंपनीत रूजू झाले. येथे त्यांनी आपल्या प्रतिभेने संगीत दिग्दर्शक बनण्यापर्यंत मजल मारली.
बाबूराव पेंटर यांची निर्मिती असलेल्या “रुक्मिणी स्वयंवर’ या चित्रपटाद्वारे भाटकरबुवांना संगीत दिग्दर्शक बनण्याची प्रथम संधी मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटाला सुधीर फडके आणि भाटकर या जोडीने ‘वासुदेव-सुधीर’ या नावाने संगीत दिले होते. या चित्रपटात ललिता फडके यांनी गायलेल्या ‘कुहू कुहू बोल गं, चंद्रमा मनात हसला गं’, ‘धाडिला प्रीतीदूत माझा देईल का ग मान’ या गाण्यांना भाटकरबुवांनी संगीत दिले होते. “भाटकरबुवा’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या या संगीतकाराने पाच दशकांमध्ये गावोगावी भजनाचे असंख्य कार्यक्रम केले होते.
हेही वाचा – शांत पूर्णत्व अन् सर्जनशील अपूर्णत्व!
एचएमव्हीतील नोकरीमुळे त्यांनी ‘स्नेहल’ या टोपणनावाने चित्रपटांना संगीत दिले. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव. या नावातील ‘स्नेहल’ हा शब्द घेऊन दिग्दर्शक केदार शर्मा यांनी भाटकरबुवांचे ‘स्नेहल भाटकर’ असे बारसे केले. ‘हमारी याद आयेगी’ चित्रपटामधील ‘कभी तनहाइयों में यूं, हमारी याद आयेगी’ हे त्यांचे सर्वाधिक गाजलेले गाणे. हे गाणे ध्वनिमुद्रित झाल्यानंतर केदार शर्मा यांनी मुबारक बेगम यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती, तसेच भाटकरबुवांनाही बक्षीस दिले होते.
अभिनेते राज कपूर यांना सर्वप्रथम गाण्यासाठी उसना आवाज भाटकरबुवांनी दिला. राज कपूरचा नायक म्हणून ‘नीलकमल’ हा पहिला चित्रपट. या चित्रपटात राजकुमारीने गायलेल्या ‘जईयोना बिदेस मोरा जिया भर आयेगा’ या गाण्याच्या दोन ओळी राज कपूर यांच्या तोंडी होत्या. या ओळी स्नेहल भाटकर यांनी गायल्या आहेत. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र हे भाटकरांचे निकटचे मित्र. त्यांनी ‘संगीता’ या चित्रपटाला संगीत दिले होते. या चित्रपटातील एक कव्वाली महम्मद रफी आणि स्वतः सी. रामचंद्र गाणार होते. मात्र, काही कारणास्तव रफी प्रत्यक्ष ध्वनिमुद्रणाच्या वेळी येऊ शकले नव्हते. तेव्हा सी. रामचंद्र यांनी ही कव्वाली गाण्यासाठी भाटकरबुवांना आमंत्रित केले.
मधुबाला, गीता बाली, नूतन, तनुजा या नायिकांच्या पहिल्या चित्रपटांना त्यांनीच संगीत दिले. तसेच कमळाबाई मंगळूरकर, कमला कोटणीस, शोभना समर्थ, बेगम पारा, लीला चिटणीस, शुभा खोटे या नायिकांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा, आपल्या चित्रपटांच्या संगीताची जबाबदारी भाटकरबुवांवरच सोपवली होती.
नीलकमल, सुहागरात, हमारी बेटी, गुनाह, हमारी याद आयेगी, प्यासे नैन, छबिली इत्यादी हिंदी चित्रपटांतील त्यांचे संगीत गाजले होते. रुक्मिणी स्वयंवर’, नंदकिशोर’, चिमुकला पाहुणा, मानला तर देव, बहकलेला ब्रह्मचारी यांसह अनेक मराठी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. नंदनवन (मो. ग. रांगणेकर), राधामाई (गो. नी. दांडेकर), भूमिकन्या सीता (मामा वरेरकर), बुवा तेथे बाया (आचार्य अत्रे) या नाटकांचेही त्यांनी संगीत दिग्दर्शन केले होते. 1994 साली त्यांना कंठसंगीत पुरस्कार तर, 2005 साली महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय “महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आला. 29 मे 2007 रोजी या संगीतकाराचे मुंबईत निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – व्यवसायात काही चढ-उतार येऊ शकतात, परंतु सुज्ञ निर्णय तुम्हाला त्यातून मार्ग काढण्यास मदत करेल. तुम्ही एक महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेऊ शकता जो भविष्यात फायदेशीर ठरेल. सभोवतालच्या लोकांचे खरे हेतू ओळखले, तर आजचा दिवस अधिक शांततापूर्ण आणि आनंददायी असेल. कुटुंबातील वातावरण शांत असेल. सुसंवादामुळ जोडीदाराबरोबरचे संबंध आणखी दृढ होतील.
वृषभ – एक मोठा व्यावसायिक करार मिळू शकतो. तुमच्या मेहनतीचे चीज आज होईल. घर किंवा मालमत्तेसंबंधीची स्वप्ने पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर खूश राहतिल. समाजकार्यात सहभागी झाल्याने तुमची ओळख आणि आदर वाढेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम पूर्ण झाल्याने मोठा दिलासा मिळेल.
मिथुन – तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. तुमचे सर्जनशील विचार आणि नवीन कल्पना कामाच्या ठिकाणी सर्वांचे लक्ष वेधून घेतील. कला, लेखन किंवा इतर सर्जनशील कामांमध्ये आनंद मिळेल. घरी एका विशेष पाहुण्याच्या आगमनाने वातावरण प्रफुल्लित होईल. एखाद्या सहकाऱ्याच्या शब्दांनी दुःख झाले तरी, संयम ठेवा. तुमच्या मदतीसाठी अनेक हात मदतीसाठी पुढे येतील.
कर्क – मन थोडे गोंधळलेले आणि अस्वस्थ असू शकते. पैशांसंबंधी घाईने घेतलेले निर्णय हानिकारक ठरू शकतात, त्यामुळे सावधगिरीने वागा. कुटुंबातील किरकोळ वादांमुळे तणाव वाढू शकतो, परंतु चर्चेने सर्व काही सुटू शकते. सरकारी कामकाजात अडकलेल्या फाईल्स पुढे सरकतील. काहीतरी नवीन सुरू करण्याची इच्छा देखील अधिक प्रबळ होऊ शकते.
सिंह – तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा शिगेला पोहोचलेली असेल. नोकरदार जातकांना कामाबद्दल प्रशंसा आणि मान्यता मिळू शकते. गुंतवणुकीसाठी, विशेषतः शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी, आजचा दिवस चांगला असून नफा अपेक्षित आहे. सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ नात्यांमधील दरी कमी करण्यास मदत करेल.
कन्या – प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा लागेल. भागीदारीत काम करणाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. एक दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल, ज्यामुळे दिलासा मिळेल. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करणेच उत्तम. महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तऐवज सुरक्षित ठेवा, कारण निष्काळजीपणामुळे गहाळ होण्याची शक्यता आहे.
तुळ – उत्पन्न वाढण्याचे नवीन मार्ग खुले होतील, परंतु एका आर्थिक बाबीमुळे थोडी चिंता निर्माण होऊ शकते. भूतकाळातील एखाद्या चुकीमागील सत्य समोर येऊ शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा. परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना उत्तम संधी मिळू शकतात. आपली कामे स्वतःच सांभाळा, कारण इतरांवर अवलंबून राहिल्याने समस्या निर्माण होऊ शकतात.
वृश्चिक – सामाजिक प्रतिष्ठा आणि दर्जा यात वाढ होणार आहे. घरी एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा पूजा आयोजित करू शकता. सततच्या कठोर परिश्रमामुळे तुम्हाला आज थकवा जाणवेल. तुमचा तापट स्वभाव कधीकधी तुम्हाला अडचणीत आणू शकतो, म्हणून शांत रहाण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाच्या गोष्टी किंवा वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करणे टाळा.
हेही वाचा – आत्तू… एकमेकांच्या भावविश्वात समरस होणारं नातं
धनु – आज तुम्ही उत्साह आणि आनंदी असाल. प्रत्येक गोष्टीबद्दल उत्कट असाल. स्वतःच्या आरोग्यासंबंधी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग आणि व्यायामाचा समावेश करा. कौटुंबिक बाबी चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रवासादरम्यान मिळालेली कोणतीही मौल्यवान माहिती भविष्यात खूप उपयुक्त ठरू शकते. विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून दाखवतील.
मकर – संयमाने आणि समजूतदारपणे पुढे जाण्याची गरज आहे. एखादा जुना आजार तुम्हाला पुन्हा त्रास देत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंब आणि काम यांच्यात संतुलन राखणे अत्यावश्यक असेल. प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या, कारण घाईघाईत उचललेल्या पावलामुळे नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. तुम्ही शांतपणे काम केल्यास, अडचणींवरही सहजपणे मात करता येईल.
कुंभ – आज सामाजिक दर्जा आणि प्रभाव वाढू शकतो. लोक तुमच्या कामाचे आणि विचारांचे कौतुक करतील. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. तुमचा आत्मविश्वास टिकून राहील. कौटुंबिक जीवनातील मतभेद कमी होतील आणि सामंजस्य वाढेल. इतरांच्या कामात जास्त हस्तक्षेप करणे टाळा. कोणावर प्रेम असेल, तर मनातील भावना व्यक्त करण्याची योग्य वेळ असू शकते.
मीन – आरोग्य उत्तम असेल आणि तुम्हाला उत्साही वाटेल. जोडीदारासोबतचे तुमचे भावनिक नाते अधिक घट्ट होईल, ज्यामुळे तुमच्यातील जवळीक वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला भेडसावणाऱ्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी तुमचा एखादा कनिष्ठ किंवा सहकारी मदत करू शकतो. आज नशीब तुमच्या बाजूने असेल, त्यामुळे अनेक कामे सहजपणे पूर्ण होतील. समाधान आणि शांती मिळेल. दिवस सकारात्मक होईल.


