भाग – 44
शर्वाय पुढे आला, त्याने आराध्याचा हात हलकेच धरला. ते दोघे गुरुजींसमोर उभे राहिले — गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू आणि आशीर्वादाचं मिश्रण होतं… प्रेम, विश्वास आणि नियतीचा स्वीकार करत आज अमृतसिद्धी योगाने त्या दोघांना नव्या प्रवासासाठी जोडलं होतं.
आज कमी होती ती फक्त शर्वायच्या आईची! आपल्या मुलाच्या आयुष्यातील एवढ्या मोठ्या घटनेपासून ती अनभिज्ञ होती… आणि या क्षणाला शर्वायला त्याची जाणीव होत होती. शर्वायच्या मनातले विचार दिवाकर यांनी ओळखले. त्याच्या जवळ जात त्याच्या पाठीवर त्यांनी थोपटलं, ते काही बोलणार तोच दादांनी आवाज दिला… ते दोघंही त्यांच्याजवळ गेले…
“शर्वाय तुला आईची आठवण येणं स्वाभाविक आहे, पण आज इथे तिला बोलवून घेणं योग्यच नव्हतं. तिला सांगितलं असतं, तर पुढच्या सर्व गोष्टींवर पाणी सोडावं लागलं असतं…”
दादांच्या असं काही बोलण्याने दिवाकर आणि शर्वाय दोघंही प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून दादा म्हणाले…
“दिवाकर आनंदीला माधवने आपल्या जाळ्यात ओढलं आहे. तो जे आणि जसं सांगेल, ते ती ऐकते… मग आराध्याशी लग्न तिने कसं स्वीकारलं असतं?”
“आराध्याशी लग्न हाच एक उत्तम पर्याय समोर होता… यामुळे माधव आता काही चुकीची पावलं उचलणार नाही…”
“आराध्याचे स्टार आता तुला मदत करतील… माधवच्या चुकीच्या गोष्टी तुझ्यावर परिणाम करणार नाहीत…”
“आनंदी आणि इतर समाजाकरिता आपण तुम्हा दोघांच लग्न नंतर पुन्हा एकदा लावू… काय?” दादा म्हणाले.
विधींना अजून सुरुवात व्हायची होती… तयारी सुरू होती… प्राजक्ताच्या मनात आज एकाच वेळी असंख्य भावना उसळत होत्या. आराध्याच्या अचानक लग्नाचं जेव्हा तिला समजलं, तेव्हा तिच्या हृदयात एक अजब गोंधळ माजला होता. ती शांत होती, पण तिच्या मनात विचारांचे वादळ होतं.
हेही वाचा – शर्वाय आणि आराध्याला प्रतीक्षा उद्याची
आराध्या, तिची लाडकी, अनेक वादळांना सामोरी गेलेली… आणि आजही तिच्या आयुष्यातला हा मोठा निर्णय असा अचानक आई-वडिलांच्या नकळत घेतलेला…
त्या दिवशी आश्रमाच्या शांत आणि साध्या परिसरातही एक दिमाख होता. शर्वाय जहागीरदार — नावाजलेला उद्योजक, शहरातील नामवंत, त्याचा रुबाब आणि सुसंस्कृतपणा, सगळ्यांनाच जाणवत होता. आराध्याच्या कुटुंबीयांनी कल्पनाही केली नव्हती की, आपल्या घरातील एक वेळची दुर्लक्षित, तिरस्कृत वाटलेली मुलगी… इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाशी जोडीदाराचं नातं जोडेल.
विधींना सुरुवात होण्याआधी शर्वाय पुढे आला, सगळ्यांच्या पाया पडल्यानंतर त्याने आराध्याकडे एक प्रेमळ नजर टाकली. त्याच्या नजरेत आदर होता, आणि ती नजर सगळ्यांना भावली.
प्राजक्ताच्या डोळ्यांत पाणी आलं… पण ते आनंदाचं होतं.
शांताबाई हात जोडून उभ्या होत्या, त्या मनात म्हणत होत्या — “आपल्या घरात इतका मोठा मुलगा ‘जावई’ म्हणून येईल, असं कोणाला वाटलं होतं?”
सुशांत मात्र शांतपणे आराध्याकडे पाहत होता… त्या बापाच्या नजरेत अभिमान दिसत होता…
“नुसत्या रंगावरून तिरस्कार सहन करत आलेली ती! एकटीच घरातल्या आणि समाजातल्या लोकांशी लढत आलेली आणि आज तिचं प्रेम तिच्या पाठीशी उभं राहिलं…”
शर्वायचा आदर, प्रेम आणि वागणं सगळ्यांनाच जाणवत होतं. त्याने जराही मोठेपणाचा आव दाखवला नव्हता. तो त्यांच्या पंक्तीतच बसत होता. प्राजक्ताला हे सगळं फार खोलवर स्पर्शून गेलं. ती नकळत आराध्याकडे वळली, तिचा हात हातात घेत म्हणाली —
“तू जिंकलीस आराध्या… केवळ प्रेम नाही, तर सगळ्यांचा मान आणि स्वतःवरचा विश्वास… आता मला भीती नाही वाटत, माझी मुलगी एकटी नाही.”
आराध्याने स्मित केले. ती कोणत्याही क्षणी कोसळेल असा भरलेला क्षण होता, पण आता ती एकटी नव्हती… तिचा हात घट्ट पकडणारा शर्वाय जवळ होता. प्रेमाचं, आधाराचं… आणि नव्या आयुष्याचं वचन त्यांनी एकमेकांना दिलं होतं.
मंद वाऱ्यावर हळुवार पंखासारखं काहीतरी विरघळत होतं — त्या वातावरणात एक पवित्रता होती, एक अव्यक्त माधुर्य…
गुरुजींचे स्पष्ट आणि गंभीर आवाजात मंत्रोच्चार सुरू होते.
“इदं नार्यै पतये अन्नमस्तु…”
अर्थ सांगितला जात होता — “ही कन्या आता आपल्या पतीला समर्पित होते; पवित्र, पूर्ण आणि प्रेमपूर्वक.”
अगदी साजरा, पण देखणा मंडप. फुलांच्या लडी, समईंचा कोमल उजेड… आणि मधे बसलेले दोन जीव — शर्वाय आणि आराध्या!
आराध्याचे हात थोडेसे कापत होते. पण चेहऱ्यावर ठाम विश्वास होता. तर, शर्वायच्या नेहमीच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाला आज एक वेगळाच कोमल भाव लाभला होता.
त्याने तिच्याकडे पाहिलं… क्षणभर विसरूनच गेला… मंत्र, विधी आणि आसपासचं सगळं! फक्त ती होती आणि तो…
गुरुजी म्हणत होते, “सप्तपदी म्हणजे जीवनाच्या सात पावलं एकत्र चालण्याचं वचन. पहिलं पाऊल अन्नासाठी… दुसरं आरोग्यासाठी… तिसरं संपत्ती आणि समृद्धीसाठी…”
शर्वाय आणि आराध्या दोघंही शांतपणे एकेक पाऊल टाकत होते. ती पावलं म्हणजे फक्त विधी नव्हते — होते एकमेकांशी बांधणारे वचन, आतापर्यंतची परीक्षा… आणि अजून येणाऱ्या वादळांशी लढण्याची तयारी! साक्षीला होते देव, आप्तजन आणि त्या दोन आज्या — सुमित्रा आणि शांताबाई, ज्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते…
मंगलाष्टक सुरू झाली होती… मंत्रांचा उच्चार जोरात होतो, आणि सर्वजण फुलं उधळू लागले. त्यानंतर शर्वायने तिच्या कपाळावर कुंकवाची रेषा ओढली आणि आराध्याच्या डोळ्यांतून गालावर थोडंसं पाणी उतरलंच!
तो क्षण नव्हता फक्त विधीचा — तो होता आराध्या आणि शर्वायच्या नात्याच्या शाश्वततेचा दिव्य क्षण… विधी संपले होते. फुलांच्या वासात, शंखाच्या निनादात आणि आशीर्वादांच्या गूंजेत, आराध्या आणि शर्वाय पती-पत्नी झाले होते.
शर्वायचा हात अजूनही आराध्याच्या हातात घट्ट होता. ती डोळे झुकवून हलकंसं हसत होती — जणू हे वास्तव आहे, यावर तिचा स्वतःचा विश्वास बसत नव्हता.
गुरुजींच्या समोर अगदी साधेपणात पार पडलेला विवाहसोहळा संपला होता. हळूहळू सगळं पुन्हा स्थिर होत होतं. त्या क्षणी, दोन नजरा एकमेकींवर थांबल्या — सुमित्रा आजी आणि प्राजक्ता एकमेकींना पाहात होत्या… प्राजक्ताने त्यांना पाहून हात जोडले…
सुमित्रा आजींनी प्रेमाने आणि विश्वासाने आराध्याकडे पाहिलं. त्या नजरेत प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद यांचा संगम होता. तसेच, त्या नजरेत अभिमान होता, “माझ्या घरात आता खरी वंशाची दीपज्योत आली आहे”, असा भाव होता.
प्राजक्ता काही क्षण सुमित्रा आजींकडे पाहत राहिली. त्यांच्या डोळ्यांत ती अनुभवाची खोली, आणि स्वीकृतीचं मूक आश्वासन तिला दिसलं. त्या दोघींच्या नजरा म्हणजे त्या दोन मातृहृदयांचं मौन संवाद होता. कोणालाही नक्की शब्दांत सांगता येणार नाही, काय बोललं गेलं ते! पण त्या क्षणात त्या दोघीही आराध्याच्या मागे एक भक्कम आधार बनून उभ्या राहिल्या होत्या.
प्राजक्तानेही त्याच क्षणी आपल्या मुलीकडे पाहिलं, आणि नकळत डोळे भरून आले. तिने हळूच मान खाली घातली, डोळ्यांतून अश्रू वाहिले… पण त्या अश्रूंत पश्चात्ताप नव्हता — होता केवळ मनाच्या ओलाव्याचा स्वीकार.
सप्तपदी होऊन आराध्या आणि शर्वाय पती-पत्नी म्हणून बांधले गेले होते… ‘शुभमंगल सावधान’चे शब्द अजूनही हवेत घोळत होते, आणि त्या पवित्र क्षणात सगळ्यांचे चेहरे आनंदाने उजळले होते.
पण… याची साक्ष पटवणारं एक अंतिम पाऊल बाकी होतं. जवळच उभ्या असलेल्या एक प्रतिष्ठित पाहुण्याने पुढे येत रजिस्टर उघडलं. त्याने हळूच सांगितलं,
“हे लग्न विधीवत पूर्ण झालं आहे. पण कायदेशीर मान्यता देखील आवश्यक आहे. दादांनी आधीच सगळं प्लॅन केलं आहे.”
आराध्या थोडी गोंधळली. शर्वाय शांतपणे तिच्या दिशेने वळला…
“आपण आज फक्त नवरा-बायको म्हणून नाही, तर प्रत्येक अर्थाने एकमेकांचे झालो आहोत.”
हेही वाचा – अमृतसिद्धी योगावर गुरुजींचा शर्वाय-आराध्याला आशीर्वाद
त्याने तिच्या समोर पेन धरलं…
“चल. आपली सही ही आपल्या नात्याची अंतिम मोहर ठरू दे.”
आराध्याने त्याच्याकडे पाहिलं क्षणभर… डोळे पाणावले… पण ते आनंदाश्रू होते. तिने पेन घेतलं आणि रजिस्टरवर लिहिलं —
‘आराध्या शर्वाय जहागीरदार’
त्या अक्षरांत स्थैर्य होतं, प्रेम होतं, आणि भविष्याचे संकेतही!
शर्वायने तिच्या पुढे सही केली… आणखी दोन साक्षीदारांनी सही करताच लग्न पूर्णत: कायदेशीर झालं. दिवाकर आणि दादांनी सगळं इतकं योजून ठेवलं होतं की, कोणतीही त्रुटी राहिली नव्हती. माधवसारख्या माणसाला कोणतीही पळवाट न मिळावी, यासाठी हा निर्णय अचानक घेतला गेला होता — पण त्यामागे दृढ निर्धार आणि दूरदृष्टी होती.
त्या क्षणी आराध्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आलं. शर्वायने तिचा हात हातात घेतला आणि दोघेही जणू गूढ, गुंतागुंतीच्या खेळात उतरण्यापूर्वी, एकमेकांच्या डोळ्यांत विश्वासाची आणि साथीची गाठ घट्ट करत होते…
“आता… आपण एक आहोत. कायदेशीर, सामाजिक, आणि आत्मिक!” शर्वाय म्हणाला…


