ज्याने जन्माला घातले, त्याला काळजी असते की, याला कसं संभाळायचं! पण आपल्यालाही कष्ट करायला लागतातच. पण काहींना आपल्या कुंडलीतील ग्रहमानाचा दोष वाटतो. वास्तवात कोणताही ग्रह अथवा त्यांची युती या दोष तयार करतच नाहीत, ते त्या व्यक्तीला प्रपंच करण्यासाठी जे कौशल्य लागते ते देण्यासाठी एकत्र आलेले असतात. पत्रिकेत चंद्र-शनी युती असो अथवा चंद्र-राहू… काहीही झाले की, त्यावर खापर फोडणे म्हणजे पळवाट झाली. हे ग्रह बरे-वाईट फळ देत असले तरी, त्यावर विसंबून न राहता कर्म करत राहणे आवश्यक आहे. स्वामींनीही सांगितले आहे – “शेत पिकवून खा. तुम्ही कष्ट करा. धडधाकट आहात, कुठलेही काम करा आणि स्वाभिमानाने पोट भर.” There is no free lunch here. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे म्हणजे किती दीन जगणे. इतकी लाजिरवाणी अवस्था शनी किंवा कुठल्याही ग्रहाने केलेली नाही आपली… तर ती आपणच आपली करून घेतली आहे!
आपले शरीर एक यंत्रच आहे, ते कधीतरी बिघडणार; पण म्हणून लगेच कुठला ग्रह त्यास कारणीभूत ठरवता येत नाही. शनी आपल्या आत आहे आणि तो आपल्याला काय सांगतोय? कष्ट करा तर आणि तरच मी तुमच्या पाठीशी उभा राहीन.
पत्रिकेतील ग्रह आपल्या पूर्वकर्मानुसार आले आहेत. त्यांचा संदेश ऐकायला शिकले पाहिजे. हे सर्व ग्रह एकमेकांच्या साथीनेच आपली पत्रिका संतुलित करत असतात, देवाने सर्वांना सगळे दिले असते, तर त्याची किंमत राहिली नसती, नाही का? त्यामुळे आळस झटका आणि कामाला लागा. कुठलेही काम कमी समजू नका.
हेही वाचा –
आपल्या पत्रिकेतील ग्रह कायम आहेत, ते बदलणार नाहीत आणि आपले जीवनही त्यानुसार आहे. निसर्गाने प्रत्येकाला एक स्किल देऊन, शस्त्र देऊन, पाठवलंय… त्याला आपण दोष समजतो. जे काही निसर्ग देतो आपणास, ते आपल्या कल्याणासाठीच असते. त्याला दोष म्हणणे कितपत योग्य?
- शनी-चंद्र विष दोष नाही – अधिकार योग
- मंगळ-राहू अंगारक योग नाही – धाडसी योग
- राहू-केतू कालसर्प नाही – जीवन आणि मोक्ष योग
- शनी-केतू / शनी-राहू प्रेत दोष नाही – अध्यात्मिक योग
- चंद्र-राहू / चंद्र-केतु – ग्रहण दोष नाही – अतिंद्रिय योग
कशाला यांना सारखे दोष दोष म्हणत राहायचे? त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण खरंच बदलू शकत नाही का? पत्रिकेचे ग्रह एकत्र असले म्हणजे दोष नाही, जीवन जगण्याची कला आहे.
शनीच्या द्वितीयात राहू असेल तर उद्योगधंदा खालच्या पायरीवरून सुरू होईल आणि केतू असल्यास अध्यात्मिक उपासना वाढीस लागेल.
- चंद्राच्या द्वितीयातील शनी बरा असतो.
- दशमस्थान कितीही चांगले असले तरी, पत्रिकेतील शनी बघितल्याशिवाय निदान करू नये.
- शनी-मंगळ, शनी-राहू 1 – 2 – 7 स्थानात असता जातकाला प्रथम हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. अशावेळी नोकरीत सुख मिळणार नाही, व्यक्ती निराशावादी असते. शनी जेव्हा चांगला आहे, असे म्हणतो म्हणजे तुमची सुप्त बुद्धी चांगली आहे.
जेव्हा तुम्हाला वाटते की, आपली सगळी कामे होत आहेत, तेव्हा तुमचे मन शिस्तबद्ध झाले आहे आणि चांगल्या गोष्टी आणि विचारांकडे धाव घेत आहे, असे समजायला हरकत नाही.
दुर्बल शनी सगळ्या ठिकाणी पीछेहाट दाखवतो, दु:ख देतो. प्रत्येक अपयश, तोटा आणि दु:ख काहीतरी धडा शिकवते. त्यातून तुम्ही शिकता आणि पराकोटीच्या प्रयत्नांनी यश मिळवता. इथे शनी भेटतो! मनुष्याच्या हाडाचा सांगाडा, ताठरपणावर शनीचा अंमल आहे. क्षमा न करणे, खुनशीपणा, उद्धटपणा, संशय, हलक्या स्तराचे विचार, वैचारिक दारिद्र्य, मनात द्वेष-मत्सर, मानहानी सोसणारा, अस्वच्छ, निंदा करणारा, कुरूप चेहऱ्याचा असा शनीचा अंमल आहे.
त्रयोदशी तिथी ही शनीला प्रिय आहे. दात, नखे, उजवा कान, केस, हाडे, spinal cord, पोटाचा वरचा भाग, बरगड्या यावर शनी आहे.
वातावरणामुळे होणारे आजार, संधिवात, पक्षाघात, क्षय, खोकला, अस्थमा, मलविसर्जन बरोबर न होणे, मुतखडा, पोटातील गाठी, मलेरिया, विलंबाने बरे होणारे आजार… शनी आणि गुरू हे अपचनाचे कारक आहेत. द्वितीय किंवा पंचमात धनु, मीन, मकर, कुंभेत असता तीव्रता अधिक असते.
शनीमहाराज मनुष्याचे शिक्षक आहेत. ते मनुष्याला संकटात घालतात, दु:खाचे चटके सोसायला लावतात आणि मार्गस्थ करतात. जन्मोजन्मी हे चालू असते आणि अखेर मोक्षाचा मार्ग खुला होतो.
गुरू पत्रिकेचा समतोलपणा टिकवतो आणि शनी बिघडवतो. कुठल्याही स्थानात शनी शुभ असेल तर त्या स्थानाहून बोध होणाऱ्या गोष्टींची फळे स्थिर असतात. सप्तमातील शुभ शनी वैवाहिक जीवनात स्थिरता देतो.
विलंब करणे, हा शनीचा मुख्य दोष आहे. पण शनी स्वगृही किंवा स्वतःच्या घराला पाहात असेल किंवा गुरुच्या दृष्टीत असेल किंवा गुरुच्या राशीत असेल तर फळे चांगली मिळतात. दूषित शनी फळे विलंबाने देतो. अष्टम व्ययात बिघडला नसेल तर चांगली फळे देईल. पण जर तो पापग्रहांनी युक्त असेल तर वाईट फळेच मिळतात.
शनी जितका शुभ तितके आयुष्य सुखकारक आणि जितका अनिष्ट तितका वाईट. जेव्हा शनी स्तंभी असतो, तेव्हा माणसाला स्थिरता देतो. अशा वेळी जातक कुठल्याही स्थितीत बदल करण्यास उत्सुक नसतो. जन्मस्थ चंद्रावरून शनीचे भ्रमण हे अनिश्चितता दर्शवते. अर्थात, हे जन्म शनीच्या स्थितीवर अवलंबून असते. जन्म शनीच्या सप्तमातून शनी जातो तेव्हा तो आयुष्यातला संक्रमण काळ असतो.
शनी जेव्हा वक्री असतो तेव्हा त्याच्या कारक गोष्टीना चालना देत नाही त्यामुळे मनुष्याला असुरक्षित वाटते. अशावेळी मनुष्य चुकीच्या मार्गाने जातो आणि त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात.
गुरू आणि शनी हे मोठे ग्रह जेव्हा निर्बली असतात आणि जातकावर प्रभाव टाकतात, तेव्हा व्यक्ती समाजात दुर्लक्षित असते. ते चांगले असतात, तेव्हा समाजात मान असतो.
- शुभ गुरुचा प्रभाव व्यक्तीला लहान वयातच पुढे आणते.
- शुभ शनीचा प्रभाव व्यक्तीला उत्तर आयुष्यात फळ देतो.
- शनी हा लोकशाहीचा आणि समाजवादाचा कारक असल्याने त्याचा समता आणि कष्ट यावर विश्वास आहे.
- लग्न शनी तुळ, मकर, कुंभ, धनु, मीन राशीत असता शुभ फलदायी होतो.
- बिघडलेला शनी जातकाला जुलमी, अविचारी, अनैतिक आणि विचाराने विकृत करतो.
- सप्तमातून पापग्रह लग्नी बघत असता, ते अधिक वाईट फळे देईल.
- धनस्थानातील दूषित शनी खंडित शिक्षण, कुटुंबात असमाधान देईल.
- तृतीयात शनी दूषित असेल तर, बंधूसौख्य नसणे, मानसिक निराशावाद देतो.
- चतुर्थात दूषित शनी मातृसुखाला पारखा करतो, चंद्रासोबत असेल तर नक्कीच करतो. वारसा हक्क चांगला मिळत नाही आणि स्थावर पैसा जातो.
- शनी जर राहू-मंगळा सोबत असेल तर दर्जा घसरणे, फिट्स येणे, शिक्षण खंडित होणे असे होते. शनी पंचमात नवम स्थानात दुर्बल असताना समाजात मान मिळत नाही. दु:खी, धार्मिक नसतो, मानसिक विकृती देतो.
- पंचम स्थानात शनी मंगळाने दृष्ट असेल तर संतती जाण्याचा योग असतो.
- षष्ठात, लाभात शनी दूषित असता बहिरेपणा आणि आजार देतो, मंगळाने दृष्ट असता ऑपरेशन होऊ शकते.
- सप्तमात दूषित शनी विलंबाने विवाह आणि असमाधान देतो.
- स्त्री कुंडलीत निर्बल शनी, चंद्राच्या किंवा लग्नाच्या सप्तमात राहू, मंगळ, केतू वैधव्य योग देतो.
- दुर्बल शनी हा अष्टम किंवा व्यय स्थानात असता आणि मंगळाने दृष्ट असता दारिद्र, कष्ट, हाल, अपघाती किंवा अचानक मृत्यू देतो.


