दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 19 जून 2026; वार : शुक्रवार
भारतीय सौर : 29 ज्येष्ठ 1948; तिथि : पंचमी 16:59; नक्षत्र : आश्लेषा 10:06;
योग : हर्षण 14:52; करण : कौलव 28:17;
सूर्य : मिथुन; चंद्र : कर्क 10:06; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:17;
पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
ख्यातनाम कृषितज्ज्ञ पांडुरंग चिमणाजी पाटील
टीम अवांतर
ख्यातनाम कृषितज्ज्ञ, जुन्या मुंबई राज्याचे पहिले भारतीय कृषी संचालक आणि पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य म्हणून ओळख असलेल्या पांडुरंग चिमणाजी पाटील यांचा जन्म 19 जून 1877 रोजी कोल्हापूर संस्थानातील वडगाव येथे झाला. 1905 साली शेतकीची एल्.एजी. ही पदवी परीक्षा ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुण्याच्या कृषी महाविद्यालयात त्यांची कृषिक्षेत्र अधीक्षक म्हणून नेमणूक झाली.
1912मध्ये इंग्लंड, डेन्मार्क इत्यादी देशांतील शेतीची पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी त्यांना सरकारतर्फे पाठविण्यात आले. त्यानंतर अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात कृषी अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करून त्यांनी 1922मध्ये एमएससी पदवी मिळविली. 1925 साली पुण्याच्या कृषी महाविद्यालयात कृषी अर्थशास्त्र या विषयाची स्वतंत्र शाखा सुरू करण्यात येऊन पाटील यांची या विषयाचे पहिले प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच वेळी ते कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही काम करीत होते आणि या महविद्यालयाला कृषी संशोधन संस्थेचे स्वरूप देण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली.
हेही वाचा – हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!
पाटील यांनी 1908मध्ये शेतीच्या नव्या अवजारांच्या आणि शेतीविषयक नव्या संशोधनाच्या प्रचारकार्यास प्रारंभ केला. त्यांनी नव्या अवजारांच्या बरोबरच नव्या खतांचा आणि बियाणांचाही प्रचार केला. लोखंडी नांगर तसेच इतर औतांच्या प्रत्यक्ष चाचण्या घेऊन त्यांत आवश्यक त्या सुधारणा सुचवून किर्लोस्करसारख्या कारखान्यांकडून सुधारित औते तयार करवून घेऊन त्यांचा शेतकऱ्यांमध्ये त्यांनी प्रसार केला. त्यांनी ‘रुंद सरीची मांजरी पद्धत’ ही उसाच्या लागवडीची नवीन पद्धत शोधून काढली. आज जवळजवळ सर्व महाराष्ट्रात हीच पद्धत वापरात आहे.
किफायतशीरपणे मोठ्या प्रमाणावर गूळ तयार करण्यासाठी यांत्रिक चरकांचा आणि एकत्रित असलेल्या अनेक चुलाणांचा वापर त्यांनी सुरू केला. अहमदनगर जिल्ह्यात बेलापूर येथे उभारण्यात आलेल्या साखर कारखान्याच्या उभारणीत पाटील यांच्या उसविषयक संशोधनाचा मोठा वाटा होता.
कृषी अर्थशास्त्रीय संशोधनावर आधारित अशा 4-5 पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केल्या. याशिवाय त्यांनी क्रॉप्स ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी वुइथ देअर जिऑग्राफी अँड स्टॅटिस्टिक्स, फूड प्रॉब्लेम ऑफ इंडिया इन जनरल अँड कोल्हापूर स्टेट इन पर्टिक्युलर, रिजनल सर्व्हे ऑफ इकॉनॉमिक रिसोर्सेस, इंडिया, कोल्हापूर यासारखे ग्रंथही त्यांनी लिहिले. विविध क्षेत्रांतील आपले अनुभव त्यांनी ‘माझ्या आठवणी’ या आत्मचरित्रपर ग्रंथात विषद केले आहेत.
7 ऑगस्ट 1978 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या शताब्दी वर्षात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कोल्हापूर येथे त्यांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ सन्माननीय डी. लिट्. ही पदवी खास समारंभपूर्वक अर्पण केली.
आजचे राशीभविष्य
मेष – आनंद आणि शुभ संकेतांनी भरलेला दिवस असेल. नोकरी किंवा करिअरशी संबंधित कामामुळे प्रवासाला जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी किरकोळ अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु तुम्ही प्रत्येक परिस्थिती व्यवस्थित हाताळाल. अनेक कामे सहजपणे पूर्ण होतील, फक्त निष्काळजीपणा टाळा.
वृषभ – नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय होतील, पण त्यांचे सर्व डाव उधळून लावू शकता. कोणाशीही वैयक्तिक किंवा महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणे टाळा, कारण यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. कामाचा ताण थोडा जास्त असेल, ज्यामुळे थकवा येऊ शकतो. तथापि, वरिष्ठांसह सहकाऱ्यांचीही मदत होईल. नातेसंबंध अधिक दृढ होतील.
मिथुन – मेहनतीमुळे तुम्हाला नवीन ओळख मिळू शकेल. जोडीदाराला नवीन नोकरीसाठी पाचारण केले जाऊ शकते किंवा एखाद्या नव्या योजनेची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यासाठी त्यांना प्रवास करावा लागू शकतो. एखाद्या प्रकल्पात अचानक व्यत्यय आल्याने काही काळ चिंता वाढू शकते. अविवाहित जातकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरी आनंदाचे वातावरण असेल.
कर्क – खर्चाचे प्रमाण वाढेल, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेऊन खर्च करणे उत्तम. संततीचे शिक्षण आणि भविष्य याबाबत एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. भावंडांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचे मनोधैर्य टिकून राहील. थांबलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. वरिष्ठांकडून कामाशी संबंधित नवीन जबाबदाऱ्या सोपविल्या जातील.
सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी खास आणि अविस्मरणीय ठरण्याची शक्यता आहे. नवीन लोकांना भेटी भविष्यातील व्यवसाय आणि कारकिर्दीसाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या कौटुंबिक जीवनात नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात, त्यामुळे घाई किंवा राग टाळणे महत्त्वाचे आहे. मालमत्ता खरेदी करण्याच्या किंवा मालमत्तेत गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे.
कन्या – आजचा दिवस सकारात्मक परिणाम देणारा असेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा उरक चांगला राहील. त्यामुळे वरिष्ठ खूश होतील. व्यवसायात थोडे चढ-उतार होतील, ज्यामुळे काही प्रमाणात लक्ष विचलित होऊ शकते. पण संयम ठेवा. वाहन खरेदी करण्याची कल्पना सत्यात उतरू शकते. पालकांच्या आशीर्वादाने, प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तुळ – आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. तुमची निर्णयक्षमताही मजबूत असेल. कोणत्याही कामातील निष्काळजीपणा हानिकारक ठरू शकतो, म्हणून प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचला. हट्टी स्वभावामुळे कुटुंबात मतभेद निर्माण होऊ शकतात, म्हणून आपल्या वागणुकीत थोडा सौम्यपणा ठेवा. विद्यार्थी वर्गाने फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
वृश्चिक – नोकरीच्या ठिकाणी पुढे जाण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. स्वतःची कामे संयमाने आणि धैर्याने पूर्ण करा. स्थावर मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. मात्र गरज पडली तर अनुभवी वकील किंवा कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घेणे योग्य ठरेल. कुटुंबात नाराजी असेल तर, परिस्थिती शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा – ओम सोशल मीडियाय नमः
धनु – मान आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. नवीन वाहनासाठी आवश्यक असणारे कर्ज मंजूर होईल. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा एखाद्या लहानशा गोष्टीचे मोठ्या वादात रूपांतर होऊ शकते. कामाच्या ठिकाणी डावलले जात असल्याची भावना निर्माण होऊ शकते. ज्यामुळे नवीन नोकरी शोधण्याचा विचार करू शकता.
मकर – विद्यार्थ्यांसाठी खूप उत्साहवर्धक दिवस असेल. इतर जातकांना पूर्वीच्या आर्थिक समस्या किंवा अडचणींमधून दिलासा मिळू शकतो. पालकांच्या आशीर्वादाने रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्यांची प्रतिमा मजबूत होईल. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवून महत्त्वाच्या गोष्टी सांगणे टाळा.
कुंभ – इतरांच्या कामात जास्त लक्ष घातल्यास नंतर तणाव निर्माण होऊ शकतो. बऱ्याच काळापूर्वी कोणाला तरी उधार दिलेले पैसे परत मिळतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. अगदी किरकोळ निष्काळजीपणामुळेही नुकसान होऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी एखादा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
मीन – सावधगिरीने पावले उचलावी लागतील. नोकरी करणाऱ्यांनी, एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे टाळावे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आपल्या शब्दांनी कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. शासकीय कामांमध्ये अडचणी किंवा विलंब होऊ शकतो. एखादा विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो, पण संयम ठेवा.


