बऱ्याच दिवसांत एका मित्राशी फोनवर बोलणं झालं नव्हतं, म्हणून विचार केला आज वेळ आहे तर फोन करावा. पलीकडे रिंग वाजली आणि लेडीज आवाज आला –
“हॅलो, कोण बोलतायं आपण…”
मी : नमस्कार, मी करंदीकर बोलतोय. शर्माजी कुठे बाहेर गेलेत का?
तिकडून : नाही, ते घरीच आहेत, पण सध्या ते फेसबुकवर आहेत.
मी : म्हणजे! मग फोन तुम्ही कसा काय घेतला?
तिकडून : रोज सकाळचा नाश्ता झाला की, ते दोन तास फेसबुकवर असतात आणि त्यावेळेत कोणाचाही फोन घ्यायचा नाही म्हणून कॉल फॉरवर्डिंगकरिता माझा नंबर दिलेला असतो. म्हणून कॉल माझ्या फोनवर येतो… ते फेसबुकवरून उठले की, तुमचा फोन येऊन गेल्याचे त्यांना सांगते.
मी ठीक आहे म्हटले, बाय-बाय केले आणि फोन बंद झाला.
आणखीन एका मित्राला फोन लावला आणि तो पण सोशल मीडियावरच होता.
विचार केला, एका मैत्रिणीला फोन लावावा, ती नक्कीच फेसबुकवर नसणार… फोन लावला आणि तिकडून पुरुषी आवाज आला…
हेही वाचा – अगं अगं म्हशी… सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना!
तिकडून : हॅलो, कोण बोलताय आपण?
मी : नमस्कार, मी करंदीकर बोलतोय. छाया मॅडम आहेत का?
तिकडून : आहेत, पण आता त्या फेसबुकवर आहेत. अजून दोन एक तास तरी त्या फेसबुकवरून बाहेर येणार नाहीत. हे त्यांचं रोजचं शेड्युल असते. बाहेर आल्या की त्यांना तुमचा फोन आल्याचे सांगतो?
मी थोडे बोललो आणि धन्यवाद म्हणून फोन बंद केला.
विचार केला की, आता अशा मित्राला फोन लावावा की जो स्वतः सोशल मीडियावर असला आणि कॉल फॉरवर्ड त्याच्या बायकोकडे गेला, तर त्याच्या बायकोशी पण बोलता येईल, कारण त्या पण चांगल्या ओळखीच्या आहेत!
मी फोन लावला रिंग वाजली आणि तिकडून एकदम तरुण माणसाचा आवाज आला –
हॅलो, कोण बोलताय आपण?
मी : मी करंदीकर बोलतोय, सुरेशजी आहेत का?
तिकडून : आहेत पण आता ते फेसबुकवर आहेत आणि या वेळेत ते कोणाचाही कॉल घेत नाहीत.
मी : त्यांच्या मिसेसना फोन देता येईल का?
तिकडून : सॉरी सर, त्या म्हणजे आई पण आता सोशल मीडियावर आहे. ती पण यावेळी कोणाचे फोन घेत नाही… मी सुरेशजींचा मुलगा बोलतोय. माझं वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे मी घरीच आहे. दोघांनी त्यांचे फोन कॉल फॉरवर्डवर माझा नंबर दिला आहे.
मी : दोघंही दोन-तीन तास फेसबुकवर म्हणजे सकाळच्या वेळी घरात कामाचा खोळंबा होत असेल?
तिकडून : नाही नाही, सगळ्या कामांना मावशी आहेत आणि ते दोघं सोशल मीडियावर असले की, घरात तेवढीच शांती असते. माझी बायको पण रिलॅक्स असते!
हेही वाचा – फोनवर पुणेरी उत्तरे…
मी दोघांनाही तुमचा फोन आल्याचे सांगतो.
मी मुलाशी त्याच्या ऑफिसबद्दल, कामाबद्दल थोडी चौकशी केली, हॅव अ नाइस डे असे म्हणून फोन बंद केला.
विचार केला, अरे सगळे सोशल मीडियावर आहेत आणि आपण फेसबुकच्या बाहेर आहोत, हे काही बरोबर नाही… मी लगेच माझ्या मोबाईलवर कॉल फॉरवर्ड करता बायकोचा नंबर टाकला आणि फेसबुकमय झालो.
“ओम सोशल मीडियाय नमः”


