दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 18 ऑक्टोबर 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 26 आश्विन शके 1948; तिथि : सप्तमी 08:27; नक्षत्र : पूर्वाषाढा 12:47;
- योग : सुकर्मा 23:54; करण : विष्टि 21:41;
- सूर्य : तुळ; चंद्र : धनु 19:31; सूर्योदय : 06:32; सूर्यास्त : 18:15;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
भानुसप्तमी
सरस्वती बलिदान
महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे)
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
भारतीय नाट्यक्षेत्राचे द्रोणाचार्य इब्राहिम अल्काझी
टीम अवांतर
भारतीय नाट्यक्षेत्राचे द्रोणाचार्य अशी ओळख असणाऱ्या इब्राहिम अल्काझी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1925 रोजी पुण्यात झाला. अल्काझी यांचे वडील सौदी अरेबियातील एक धनाढ्य व्यापारी होते, तर आई कुवेती होती. एकंदर नऊ भावंडांच्या गोतावळ्यात वाढलेल्या अल्काझी यांचे लहानपण पुण्यातील लाल देऊळ परिसरात गेलं. पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. लहानपणापासूनच अरबी, मराठी, गुजराती आणि इंग्रजी या भाषा त्यांना अवगत होत्या. शालेय शिक्षण पुण्यात आणि मराठीतून झाल्यामुळे शेवटपर्यंत त्यांना मराठी रंगभूमीबद्दल आणि कलाकारांबद्दल जिव्हाळा वाटत होता.
1947 मध्ये भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यावर अल्काझी यांचा संपूर्ण परिवार पाकिस्तानात निघून गेला. अल्काझी यांनी मात्र भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर सुलतान बॉबी पद्मसी यांच्या नाटक ग्रुपबरोबर काम सुरू केले. बीएची पदवी प्राप्त करून ते लंडन येथील ‘रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट’ या अग्रगण्य संस्थेमध्ये रंगभूमी विषयक रीतसर अव्वल शिक्षण घेण्यासाठी गेले.
हेही वाचा – दसरा, सरस्वती पूजन, रावणदहन आणि आपण…!
1940-50 च्या दशकात त्यांनी नाट्यसृष्टीत वेगवेगळे प्रयोग केले. यासाठी त्यांना प्रतिष्ठित ‘बीबीसी ब्रॉडकास्टिंग’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इब्राहीम अल्काझी यांनीच पहिल्यांदा भारतीय रंगभूमीला शेक्सपिअर आणि ग्रीक नाट्यकृतींशी ओळख करून दिली. या परदेशी कलाकृती त्यांनी भारतीय रंगमंचावर नुसत्या आणल्याच नाहीत, तर त्या इथे रुजवल्यासुद्धा! त्यांच्या या अनोख्या धाडसी प्रयोगांमुळे भारतीय रंगभूमीचा कायापालट झाला. ग्रीकमधील शोकांतिका, शेक्सपिअर, हेन्रिक इसबे, ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग या नाटककारांची नाटके त्यांनी भारतीय रंगभूमीवर आणली.
1962 साली ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या संचालकपदी त्यांची निवड झाली. पुढे सलग 15 वर्षे ते या पदावर कार्यरत होते. इतका प्रदीर्घ काळ या पदावर असणारे अल्काझी हे एकमेव संचालक ठरले. वयाच्या 50 व्या वर्षी अल्काझी यांनी ‘एनएसडी’च्या संचालक पदाचा राजीनामा दिला. ‘एनएसडी’चे संचालक असतानाच्या काळात त्यांनी जवळपास 50 पेक्षा अधिक अजरामर नाटकांचे प्रयोग केले. याशिवाय गिरीश कर्नाड यांचे ‘तुघलक’, मोहन राकेश यांचे ‘आषाढ का एक दिन’, धर्मवीर भारती यांचे ‘अंधायुग’ या लोकप्रिय नाटकांची निर्मिती देखील त्यांनी केली.
हेही वाचा – वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…
भारतीय रंगभूमीची व्याख्या बदलणारे नाटककार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यामध्ये नसिरुद्दीन शाह, ओम पुरी यांचा जसा समावेश आहे तसे ‘एनएसडी’मध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये विजया मेहता, ओम शिवपुरी, बलराज पंडित, मनोहर सिंह, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, सुहास जोशी, बी. जयश्री, जयदेव आणि रोहिणी हट्टंगडी यांसारख्या दिग्गज कलाकारांचा देखील समावेश होता. सुप्रसिद्ध नाट्य-चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता आपल्या जडणघडणीत अल्काझी यांचे मोठे योगदान असल्याचे कायम कृतज्ञतेने सांगायच्या.
रंगभूमीवरील आजीवन योगदानाबद्दल त्यांना रूपवेध प्रतिष्ठानचा पहिला तन्वीर पुरस्कार मिळाला. याशिवाय भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण यांसारखे पुरस्कार देऊन सन्मानित केले. संगीत नाटक अकादमी यांच्याकडून अल्काझी यांना दोनदा सन्मानित करण्यात आले आहे. 1962 साली त्यांना दिग्दर्शनासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. नंतर रंगभूमीवरील आजीवन योगदानासाठी अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार संगीत नाटक अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात आली. 4 ऑगस्ट 2020 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी नवी दिल्ली येथे निधन झाले.


