दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 16 जून 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 26 ज्येष्ठ शके 1948; तिथि : द्वितिया 24:53 ; नक्षत्र : आर्द्रा 16:12;
- योग : वृद्धि 24:35 ; करण : बालव 14:40;
- सूर्य : मिथुन; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:16;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
गायक, संगीतकार, निर्माता हेमंत कुमार
टीम अवांतर
गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा जन्म 16 जून 1920 रोजी वाराणसी येथे झाला. त्यांचे मूळ नाव हेमंतकुमार मुखोपाध्याय. त्यांचे बालपण बंगालमधील एका खेड्यात गेले. त्याकाळी खेड्यात होत असलेली नाटके पहात आणि लोकसंगीत ऐकत हेमंतदा मोठे झाले, पण संगीताचे औपचारिक शिक्षण हेमंतदांना मिळाले नाही. त्यांचा कुटुंबाचा आणि संगीतक्षेत्राचा काहीही संबंध नव्हता. कलकत्त्याला महाविद्यालयात शिकताना 1935 साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परिक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला लागले.
गायनात गती असणाऱ्या हेमंतदांना साहित्यक्षेत्रात देखील रस होता. 1937 साली त्यांनी लिहिलेली एक लघुकथा आणि गायलेले गाणे या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध झाल्या आणि हेमंतदांमधील कलाकार जन्मास आला. त्यामुळे विद्युत अभियांत्रिकीचे पहिले वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा – राखेतून उरलेला श्वास…
‘निमोई संन्यासी’ या बंगाली तर ‘इरादा’ या हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन करून हेमंतदांची चित्रपटातील कारकीर्द सुरु झाली. बंगाली चित्रपटासाठी संगीतकार हरि प्रसन्नो दास ह्यांच्या हाताखाली सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणूनही हेमंतदांनी काम केले. स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांनी पूर्बोरंग या बंगाली तर आनंदमठ या हिंदी चित्रपटाला संगीत दिले. 1954 सालच्या नागिन चित्रपटाला त्यांचेच संगीत होते. या चित्रपटाची सगळीच गाणी खूप गाजली. शिवाय याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कार देखील मिळाला.
1959 साली हेमंतदांनी मृणाल सेन दिग्दर्शित नील आकाशेर नीचे या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या गीतांजली प्रॉडक्शन्स या चित्रपट कंपनीने निर्माण केलेले बीस साल बाद, कोहरा, खामोशी यांसारखे हिंदी चित्रपट त्यांतील गाण्य़ांसकट लोकप्रिय झाले. या सर्व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी देखील हेमंतदांनी यशस्वीपणे संभाळली होती.
मराठी चित्रपटांसाठी देखील हेमंतदांनी गायलेली मोजकी मराठी गाणी लोकप्रिय झाली. ’हा खेळ सावल्यांचा’ चित्रपटातील ’गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, तर लता मंगेशकर यांच्याबरोबरचे ’मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ ही गाणी रसिकप्रिय झाली.
हेमंतकुमार यांना 1954 साली फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीतकार, 1970 साली ‘निमंत्रण’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (चित्रपट निर्माता), 1984 मध्ये ‘ललान फकिर’ चित्रपटासाठी उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1985 साली रविंद्र भारती विश्वविद्यालयाची डि. लिट. ही पदवी असे पुरस्कार मिळाले. 26 सप्टेंबर 1989 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – तुमच्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक असेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढेल. एखादी चांगली बातमी चेहऱ्यावर आनंद आणू शकते. त्यामुळे पुढे जाण्यासाठी तुम्हाला नवी प्रेरणा मिळेल. या सगळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः तुमच्या आहाराकडे आणि झोपेकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत चांगले संबंध राहतील, पण अहंकार दूर ठेवा.
वृषभ- शांतता आणि समाधानाने भरलेला दिवस असेल. जे नोकरी किंवा नवीन संधीच्या शोधात आहेत, त्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. पैशांच्या व्यवहारात प्रामाणिकपणा आणि योग्य मार्ग निवडणे महत्त्वाचे ठरेल. अन्यथा भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. अनोळखी लोकांना पैसे उधार देणे टाळा. सासरच्या मंडळींशी छोट्या-छोट्या गोष्टींवरून मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संयम आणि शांतता राखा.
मिथुन – आर्थिक निर्णय घेताना आज अत्यंत सावधगिरी बाळगा. घाईने घेतलेले निर्णय नंतर समस्या निर्माण करू शकतात. प्रवासादरम्यान किंवा बैठकीदरम्यान, तुम्हाला अशी माहिती मिळू शकते जी फायदेशीर ठरेल. वरिष्ठांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास वाढेल. भूतकाळातील चुकांमधून शिकल्याने तुम्हाला योग्य दिशा मिळेल. व्यावसायिक भागीदारीचा काळजीपूर्वक विचार करा. फक्त विश्वासू व्यक्तींवरच विश्वास ठेवा.
कर्क – नात्यांमधील गोडवा वाढेल. जोडीदाराला त्यांच्या करिअरसंबंधी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरातील वातावरण अधिक सुखद होईल. कुटुंबातील विवाहोत्सुकांच्या लग्नाबाबत निर्माण झालेले अडथळे जवळच्या मित्राच्या मदतीने दूर होऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवणे आज शहाणपणाचे ठरणार नाही. जीवनावश्यक वस्तू आणि सुखसोयींवरील खर्च वाढेल.
सिंह – तुमची सामाजिक प्रतिमा अधिक मजबूत होईल. तुमच्या कामाचे आणि वागणुकीचे कौतुक होईल. एखादा मोठा व्यवहार शेवटच्या क्षणी अडकला तरी, धीर धरा. लवकरच त्यावर तोडगा निघेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्या, खात्री करा आणि मगच पुढे जा. इतरांच्या भावनांची कदर करा.
कन्या – नशीबाची मोठी साथ तुम्हाला मिळेल. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे भावनिक बळ आणि मनःशांती मिळेल. संततीच्या भविष्याबद्दल थोडी चिंता वाटू शकते, परंतु योग्य नियोजन आणि समजूतदारपणाने परिस्थिती हाताळण्यास मदत होईल. कोणत्याही संघर्षापासून दूर राहणे उत्तम. सरकारी योजना किंवा सुविधांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज बचत किंवा गुंतवणूक केल्यास तुमचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत होईल.
तुळ – अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल असेल. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पोटाच्या समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यास थोडा आव्हानात्मक वाटू शकतो, मात्र सातत्यपूर्ण मेहनतीने त्यांना यश मिळेल. जुनी देणी फेडल्याने मन हलके होईल. जोडीदारासाठी आणलेले छोटेसे सरप्राईज नात्यात नवीन गोडवा आणू शकते. उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबासोबत प्रवासाची संधी मिळाल्याने आनंद मिळेल.
वृश्चिक – आर्थिक बाबी आणि खर्चाबाबत आज थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. खर्च अचानक वाढू शकतो. घराचे नूतनीकरण किंवा सजावट करण्याचाही विचार करू शकता. आज आईच्या आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते, म्हणून तिची विशेष काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी, तुम्हाला प्रशंसा, बढती किंवा तुमच्या वरिष्ठांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल.
हेही वाचा – अधिकाचं देणं
धनु – प्रत्येक कामात संयम राखत समजूतदारपणाने पुढे जाणे फायदेशीर ठरेल. वडिलांचा सल्ला मार्गदर्शक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. दीर्घकाळापासूनची एखादी इच्छा पूर्ण झाल्याने तुमचा आनंद द्विगुणित होईल. घरातील धार्मिक विधी किंवा धार्मिक वातावरणामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहील.
मकर – नव्याने सुरुवात करण्याचा आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आजचा दिवस आहे. विवेकबुद्धी आणि सारासार विचार तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. लहान जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्याच पुढे मोठ्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. बेरोजगार जातकांना चांगली नोकरी मिळाल्याने त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल.
कुंभ – आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता प्रबळ राहील. सर्व कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल. गरजू लोकांना मदत केल्याने तुम्हाला एक विलक्षण मनःशांती मिळेल. संवाद आणि सामंजस्याने कौटुंबिक समस्या सोडवण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावाल. मालमत्तेसंबंधी एक चांगली संधी निर्माण होऊ शकते. संततीला दिलेले एखादे आश्वासन पूर्ण करणे महत्त्वाचे ठरेल. व्यवसायात थोडे चढ-उतार होतील, मात्र परिस्थिती नियंत्रणात राहील.
मीन – स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे आज महत्त्वाचे आहे. अगदी लहान समस्येकडे दुर्लक्ष करणेही महागात पडू शकते. कोणीतरी गोड शब्दांनी तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू शकते, म्हणून कोणावरही लगेच विश्वास ठेवणे टाळा. मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना काही सकारात्मक कायदेशीर किंवा सरकारी बातमी मिळू शकते. कोणतीही वचनबद्धता स्वीकारण्यापूर्वी आपल्या क्षमतांचे मूल्यांकन करा. आज, संयम आणि सतर्कता यामुळे प्रत्येकवेळी संतुलन राखता येईल.


