दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 12 जून 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 22 ज्येष्ठ 1948; तिथि : द्वादशी 19:37; नक्षत्र : अश्विनी 06:28, भरणी 28:05;
- योग : अतिगंड 21:26; करण : कौलव 09:10, गरज 29:55;
- सूर्य : वृषभ; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:15;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
प्रदोष
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषाकोविद पुरुषोत्तम बापट
टीम अवांतर
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषाकोविद, बौद्ध धर्मग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म 12 जून 1894 रोजी सांगली येथे झाला. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पालीचा अभ्यास करून बी.ए. आणि एम्.ए. या पदव्या त्यांनी मिळवल्या. या महाविद्यालयात बौद्ध धर्माचे जगद्विख्यात पंडित धर्मानंद कोसंबी त्यांना गुरू म्हणून लाभले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सिंहली, ब्रह्मी आणि थाय लिपिंचा त्यांनी अभ्यास केला होता.
एम्.ए. झाल्यानंतर ते फर्ग्युसन महाविद्यालयात पालीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून त्यांनी जवळपास 22 वर्षे काम केले. 1929 मध्ये बौद्ध ग्रंथांच्या इंग्रजी अनुवादांसाठी सहाय्यक म्हणून येण्याचे निमंत्रण त्यांना अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाकडून मिळाले. तेथे असताना वॉल्टर क्लार्क यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इंडिक फिलॉलॉजी’ ह्या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पीएच्.डी मिळवली. पुढे दिल्ली विद्यापीठात ‘बुद्धिस्ट स्टडीज’ या विभागाचे ते संघटक आणि प्रमुख बनले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे ते एक विश्वस्त देखील होते. चिनी, तिबेटी, फ्रेंच, बंगाली या भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या.
हेही वाचा – संवाद… पती अन् पत्नीमधला…
बापट यांनी संपादिलेल्या ग्रंथापैकी ‘2500 ईअर्स ऑफ बुद्धिझम’ हा विशेष उल्लेखनीय ठरला. बुद्धाचे जीवन आणि शिकवण, बौद्ध धर्माचा उद्गम आणि विस्तार, त्या धर्मातील प्रमुख पंथ, बौद्ध साहित्य, विद्या आणि कला, बौद्ध धर्म आणि आधुनिक जग, बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन अशा अनेक महत्वपूर्ण विषयांसंबंधीचे व्यासंगी विद्वानांचे लेख या ग्रंथात अंतर्भूत असून स्वत: बापट यांच्या लेखनाने या ग्रंथास मोठा हातभार लागला.
त्यानंतर शान् च्येन् फिफोषा या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतरही त्यांनी केले. पुण्याच्या प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे हे भाषांतर 1970 साली प्रसिद्ध झाले. या ग्रंथांशिवाय बापटांनी संपादिलेले किंवा अनुवादिलेले ग्रंथ म्हणजे – सुत्तनिपात, विमुत्तिमग्ग अँड विसुद्धिमग्ग, धम्मसंगणि, अट्ठसालिनी, अर्थपदसूत्र (यी-च्यु-किंग या चिनी ग्रंथाचे 2 भागांमध्ये इंग्रजी भाषांतर) विमुक्तिमार्ग-धुतगण निर्देश (एका तिबेटी ग्रंथाचे संपादन आणि इंग्रजी भाषांतर). बापट यांनी सुमारे 140 शोधनिबंध लिहिले असून त्यांतील ‘आग्नेय आशियातील भारतीय संस्कृती’, ‘काँट्रिब्यूशन ऑफ बुद्धिझम टू इंडियन कल्चर’, ‘करण-संपत्ति’, ‘श्ली-पद (हत्तीरोग) अँड ए रेमेडी फाउंड इन ए पाली कॉमेंटरी’ हे विशेष उल्लेखनीय होत. दे. द. वाडेकर संपादित मराठी तत्त्वज्ञान-महाकोश तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोशात महत्त्वपूर्ण नोंदी लिहून त्यांनी महाराष्ट्रातील कोशकार्यासही आपल्या विद्वत्तेचा लाभ करून दिला.
अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या 1943 आणि 1961 साली झालेल्या अधिवेशनांमध्ये पाली-प्राकृत विभागाचे अध्यक्ष, 1946 च्या अधिवेशनात पाली बुद्धिझम विभागाचे अध्यक्ष आणि या परिषदेच्या 1974 च्या कुरुक्षेत्र अधिवेशनाचे ते प्रमुख अध्यक्ष होते. बौद्ध ग्रंथांसंबंधीचे त्यांचे कार्य लक्षात घेऊन ‘नवनालंदा विद्याविहारा’ने ‘विद्यावारिधि’ ही सर्वोच्च पदवी देऊन त्यांचा गौरव केला. 4 नोव्हेंबर 1991 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – सकारात्मक दृष्टिकोनामुळे कठीण परिस्थितीवर मात करणे सोपे जाईल. मत्सर किंवा नकारात्मकता मनात बाळगणे टाळा. आरोग्य समस्येकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. जोडीदारासोबतचे जुने मतभेद मिटतील. कौटुंबिक नातेसंबंध अधिक सलोख्याचे होतील आणि पावसाळी सहलीचे बेत आखले जातील.
वृषभ – पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. उत्पन्न वाढण्याचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. एखाद्या न्यायालयीन खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. सुसंवादामुळे नात्यातील तणाव दूर होण्यास मदत होईल. भावंडांचा पाठिंबा उपयुक्त ठरेल. सामाजिक जीवन अधिक आनंददायी होईल.
मिथुन – आजचा दिवस संतुलन आणि शांतता घेऊन येईल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने मनःशांती लाभेल. राजकारण किंवा सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत जातकांनी घाईत निर्णय घेणे टाळावे. जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील जुने वाद मिटवण्यासाठी पुढाकार घ्याल.
कर्क – एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेवू नका. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नाते अधिक घट्ट होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी मित्रांकडून वेळेवर मदत मिळेल. वडिलांच्या एखाद्या शेऱ्यामुळे थोडे दुःख होईल. मात्र त्यामागचा चांगला उद्देश लक्षात घ्या.
सिंह – कुटुंबात आणि नातेसंबंधांमध्ये सलोखा राखणे महत्त्वाचे ठरेल. विरोधक सक्रिय असतील, परंतु त्यांचे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडाल. संततीच्या संगतीवर लक्ष ठेवा. प्रवासाचे नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. नोकरीसंबंधी समस्या असतील, तर नवीन पर्यायांचा विचार करणे फायदेशीर ठरेल.
कन्या – एखादी इच्छा पूर्ण झाल्याने मन आनंदी असेल. जोडीदारासाठी एखादी खास भेटवस्तू खरेदी करू शकता. आई-वडिलांसोबत वेळ घालवल्याने मनःशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी समस्यांबाबत मोकळेपणाने चर्चा करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय पुढे नेण्याचे प्रयत्न अधिक तीव्र होतील.
तुळ – खर्चाचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे बजेटचे काळजीपूर्वक नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल. कामाचा ताण जास्त असेल. दुसरीकडे कुटुंबाबद्दलही चिंता वाढेल. संततीच्या आरोग्याबद्दल काळजी निर्माण होईल. नोकरी, व्यवसायात बदल करण्याचा काही जातक विचार करू शकतात.
वृश्चिक – मन एखाद्या निर्णयामध्ये गुंतलेले असू शकते, परंतु आत्मविश्वास टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. सामाजिक कार्यांत सहभाग वाढेल. अशावेळी रागावर नियंत्रण ठेवणे हा मौल्यवान सल्ला ठरेल. व्यवसायाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. अनोळखी लोकांपासून अंतर राखणे उत्तम.
हेही वाचा – …म्हणून मनासारखं जगावं!
धनु – महत्त्वाची कामे पुढे ढकलणे हानिकारक ठरू शकते. कौटुंबिक बाबी एकत्रितपणे सोडवल्याने सलोख्याचे संबंध टिकून राहतील. जोडीदारासोबत काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. वडिलांचा सल्ला घेतल्याने तुमची चिंता कमी होईल. एखादे प्रलंबित काम पूर्ण केल्याने दिलासा मिळेल.
मकर – जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणाने पार पाडाव्या लागतील. नवीन प्रकल्पांमुळे आत्मविश्वास वाढेल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. आहारात बदल केल्याने आरोग्य सुधारेल. एखादी इच्छा पूर्ण झाल्याने आनंद मिळेल. वैवाहिक सलोखा चांगला राहील, मात्र बिझी वेळापत्रकामुळे कुटुंबाला वेळ देता येणार नाही.
कुंभ – आव्हानांना कुटुंब आणि मित्रांच्या पाठिंब्यामुळे खंबीरपणे तोंड द्याल. इतरांच्या कामात ढवळाढवळ करणे टाळा. आध्यात्मिक कार्यात रस वाटेल. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. दूर राहणाऱ्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीने भावुक होऊ शकता. विद्यार्थी करिअर-संबंधित कामांमध्ये व्यग्र राहतील.
मीन – सामाजिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आर्थिक स्तरावर केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. पालकांशी मालमत्तेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.


