दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 08 सप्टेंबर 2025; वार : सोमवार
- भारतीय सौर : 17 भाद्रपद शके 1947; तिथि : प्रतिपदा 21:12; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 20:02
- योग : धृती 06:29, शूल 27:19; करण : बालव 10:27
- सूर्य : सिंह; चंद्र : कुंभ 14:29; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:47
- पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
प्रतिपदा श्राद्ध
ग्रहण करी दिन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आर्थिक व्यवस्थेचे अधिक काटेकोरपणे नियमन करा. फायदेशीर संधी वाढतील. विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय व्हाल आणि वेगाने पुढे जाल. हा काळ आर्थिक लाभाचे संकेत देत आहे. कुटुंबाकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते.
वृषभ – राजकारणाशी संबंधित जातकांचे सुरू असणारे प्रयत्न यशस्वी होतील. वित्तपुरवठ्यावर लक्ष केंद्रित कराल, ज्यामुळे आर्थिक घडामोडींना चालना मिळेल. प्रलंबित कामांना गती मिळेल, नफा वाढेल. पद आणि प्रतिष्ठा देखील वाढेल. एखाद्या अधिकारी व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे.
मिथुन – आर्थिक नफा मिळण्याची शक्यता मर्यादित असेल. मात्र स्वतःच्या व्यवस्थापन व्यवस्थेवर विश्वास ठेवा. आर्थिक कौशल्य वाढवणे फायदेशीर ठरेल. सोप्या संधी उपलब्ध होतील. दीर्घकालीन योजनांसाठी, स्मार्टपणे काम करण्यावर लक्ष केंद्रित करा. संयमाने काम करणे फायदेशीर ठरेल.
कर्क – लबाड लोकांची संगत टाळा. व्यवहार करताना काळजी घ्या. आर्थिक स्थिती विचारात घेऊन त्यानुसार खर्च करा. व्यवस्थापनाशी संबंधित सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. व्यावसायिक पातळीवरील घडामोडी काही दिवसांसाठी पुढे ढकलाव्या लागतील. सध्या लक्ष ध्येयावर केंद्रित करा. आज कामाचा उरक चांगला असेल.
सिंह – आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक ठरेल. या राशीचे जातक जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडतील. मात्र कामे उरकण्याची घाई करू नका. आज उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राहील. मात्र येत्या काही दिवसांमध्ये कोणालातरी उदार हस्ते आर्थिक मदत करावी लागेल.
कन्या – खर्चात वाढ होऊन त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडेल. त्यामुळे आर्थिक बाबतीत नियम आणि शिस्त पाळावी लागेल. फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा. लोभ, प्रलोभने किंवा फसव्या जाहिरातींना बळी पडू नका. कामाशी संबंधित चर्चा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलावी लागेल.
हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची…
तुळ – वरिष्ठ सहकारी आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यातूनच तुम्हाला नव्या संधींचा लाभ घेता येईल. व्यावसायिकांनी नियमांचे पालन अवश्य करावे, अन्यथा कोर्टाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. स्मार्ट पद्धतीने काम करा.
वृश्चिक – संपूर्ण दिवसाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन कसे होईल, याकडे लक्ष द्या. तुमच्या प्रतिभेने सगळी कामे मनाजोगती पूर्ण करू शकाल. सहकाऱ्यांशी तुलना किंवा स्पर्धा करणे टाळा. भौतिक वस्तूंची खरेदी शक्य असल्यास पुढे ढकला. इतर व्यावसायिकांशी संबंध सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करा.
धनु – आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न योग्य दिशेने पुढे जातील. प्रत्येक कामात यश मिळेल. सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील. आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. संवाद साधण्याच्या हातोटीमुळे भविष्यात मोठी प्रगती होईल. आपल्या सोयीसुविधांकडे देखील विशेष लक्ष द्या.
मकर – कामे सावधगिरीने आणि काळजीपूर्वक पूर्ण करा. आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. व्यावसायिकांची आजच्या दिवसातील कामे सामान्य गतीने पुढे जातील. नफ्यातही फार वाढ होणार नाही. कौटुंबिक स्तरावर सगळ्यांचा पाठिंबा मिळेल.
कुंभ – या राशीच्या व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य असेल. अनावश्यक तडजोडी मात्र टाळा. नफ्याचे प्रमाण पूर्वीसारखेच राहील. नोकरीच्या दृष्टीने काही चांगले प्रस्ताव मिळतील. अनेक वर्षांपासून सुरू असणारे कोर्टाचे एखादे प्रकरण निकाली लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रातील आदर्श व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल.
मीन – या राशीच्या जातकांनी उद्योग, व्यवसायाची गती कशी वाढेल याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कामांमध्ये संयम ठेवणे आवश्यक आहे. संपर्क आणि संवाद याबाबत विशेष सावधगिरी बाळगा. फसवणूक करणाऱ्यांपासून तसेच गोड बोलून एखादी योजना गळ्यात पडणार नाही, यासाठी सावध रहा.
हेही वाचा – पालकांची जबाबदारी : शालेय सहली अन् स्नेहसंमेलन
दिनविशेष
पार्श्वगायिका आशा भोसले
टीम अवांतर
आपल्या हटके स्टाईलने, मधाळ आवाजात गाणं म्हणणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या हृदयावर गेल्या अनेक दशकांपासून राज्य करणाऱ्या गायिका म्हणजे आशा भोसले. आशाताईंचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीमध्ये झाला. वडील प्रसिद्ध गायक पंडित दीनानाथ मंगेशकर आणि माई मंगेशकर यांचे हे दुसरे अपत्य. लता मंगेशकर या आशाताईंची मोठी बहीण. तर उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि मीना खडीकर या भावंडांची त्या मोठी ताई. वडीलांच्या अकाली निधनानंतर लता दिदींना हातभार लावावा, या हेतूने वयाच्या दहाव्या वर्षांपासून गायनाला सुरुवात केलेल्या ताईंनी आजवर 12 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. ‘माझा बाळ’ या मराठी चित्रपटातील ‘चला चला वन बाळा’ हे त्यांचे पहिले गाणे होते. 1948 मध्ये ‘चुनरिया’ चित्रपटातील ‘सावन आया’ या गाण्याने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ताईंच्या वैयक्तिक आयुष्यात संघर्षाचे अनेक प्रसंग आले; पण त्याचा कोणताही परिणाम त्यांनी आपल्या गायकीवर होऊ दिला नाही. सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंग केल्याबद्दल त्यांचे नाव गिनीज बुकमध्येही नोंदवले गेले आहे. अत्यंत प्रयोगशील गायिका म्हणून ओळख असणाऱ्या आशाताईंनी खट्याळ, मादक, उडत्या चालीची गाणी जशी म्हटली तशीच भावगीते, भक्तिगीते, नाट्यगीते, भजन, कव्वाली, लावणी, डिस्को, गझल ते अगदी आताच्या काळातील रिमिक्सपर्यंत गाण्याचे सगळे प्रकार गाऊन आपला आवाका सिद्ध केला आहे. संगीतातील नवे प्रवाह, नवी संस्कृती, नवे गीतकार, संगीतकार, गायक यांच्याशीही त्यांनी सूरांचे नाते जोडले आणि प्रत्येक पिढीला त्या आपल्या जवळच्या गायिका वाटत राहिल्या. ओ.पी.नय्यर आणि आर. डी. बर्मन या संगीतकारांसोबत आशाताईंचे सूर विशेष जुळले आणि त्यांनीही आशाताईंना विविध जॉनरची गाणी गाण्याची संधी दिली. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत आशाताईंना 8 वेळा फिल्मफेअर, दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार, 2000 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार, 2015 सालचा पद्मविभूषण, 2021मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि अगणित इतर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ग्रॅमी अवॉर्डसाठी त्यांचे नामांकनही झाले होते. याशिवाय, त्या स्वयंपाकही उत्तम करतात. दुबई, कुवेत, अबुधाबी, दोहा, बहरीन या ठिकाणी ‘आशाज्’ नावाचे रेस्तराँ आहेत. याशिवाय, वयाच्या 80व्या वर्षी म्हणजे 2013 मध्ये ‘माई’ या मराठी चित्रपटात त्यांनी अभिनयही केला आहे.