दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 05 नोव्हेंबर 2025; वार : बुधवार
- भारतीय सौर : 14 कार्तिक शके 1947; तिथि : पौर्णिमा 18:49; नक्षत्र : अश्विनी 09:40, भरणी 30:33
- योग : सिद्धी 11:28; करण : विष्टी 08:44, बालव 28:51
- सूर्य : तुळ; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:39; सूर्यास्त : 18:04
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
त्रिपुरारी पौर्णिमा
तुलसीविवाह समाप्ती
कार्तिक स्नान समाप्ती
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – अचानक पैसा आल्याने प्रलंबित बिले आणि तातडीने करावयाचे खर्च भागवता येतील. महत्त्वाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण केल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या भरघोस नफा मिळेल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च कराल, पण काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करू नका. आपल्या कुटुंबांच्या भावनांचा प्रामुख्याने विचार करा.
वृषभ – दीर्घकालीन गुंतवणूक करणे आज टाळा. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. खरेदी आणि अन्य कामकाज यातच दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. अनपेक्षित पाहुण्यांमुळे तुमचे प्लॅन कदाचित बदलावे लागतील, पण दिवस निश्चितच चांगला जाईल.
मिथुन – मानसिक आघातांमुळे प्रचंड धैर्य आणि शक्ती पणाला लावावी लागेल. मात्र सकारात्मक दृष्टिकोनामुळे यावर सहजपणे मात कराल. जवळच्या नातेवाइकाच्या मदतीने व्यवसायात उत्तम प्रगती करू शकाल, ज्यामुळे आर्थिक लाभही होईल. कामातील अवघड टप्पा सहकाऱ्यांच्या मदतीमुळे पार पडेल. त्यामुळे व्यावसायिक स्थान पुन्हा मिळविणे शक्य होईल.
कर्क – चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी सज्ज असाल. घरातील ज्येष्ठांकडून बचतीबाबत काही सल्ला घेऊ शकतात, तो सल्ला आयुष्यात महत्वाचा ठरेल. मित्रमंडळींबरोबरील आखलेला कार्यक्रम आनंद देणारा ठरेल. पण वायफळ खर्च करण्यासाठी पुढाकार घेऊ नका. नवीन उपक्रम, व्यवसाय हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल.
सिंह – शारीरिक व्याधींपासून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे. काही जातक अतिप्रवासाने थकून जातील. ताण वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. तुमचे व्यक्तिमत्व आणि आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. व्यवसायात आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे लागेल.
हेही वाचा – दूरदर्शन… कृष्ण-धवल आठवणींना उजाळा!
कन्या – तणावामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरामासोबत मित्रमंडळी, कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत वेळ घालवा. जे जातक जवळच्या नातेवाईकांसोबत बिझनेस करण्याचा विचार करत आहेत, त्यांनी खूप काळजीपूर्वक पाऊल उचलण्याची गरज आहे. ऑफिसमधील वातावरणही फारसे चांगले नसेल. कोणी खास सहकारी विश्वासघात करू शकतो.
तुळ – जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते, हे लक्षात घेऊन वागा. मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. जवळच्या एखाद्या मौल्यवान वस्तूची शक्य तितकी काळजी घ्या. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात सहभागी व्हा. आज प्रिय व्यक्तीकडे भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल.
वृश्चिक – नोकरदार जातक आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करू शकतात. आज केलेली गुंतवणूक समृद्ध आणि आर्थिक सुरक्षित भवितव्यासाठी पूरक ठरेल. ज्या जातकांचा परदेशात व्यापार आहे, त्यांना मनासारखा एखादा नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये संपत्तीवरून वाद होऊ शकतात. त्यामुळे याबाबतीत तुमची भूमिका स्पष्ट करा.
धनु – आयुष्यातील सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय असेल. सर्वाधिक गरज असेल तेव्हा मित्र मदतीला धावून येणार नाहीत. इतरांना तुमच्याकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील, मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, तसेच आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जात नाही ना, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
मकर – आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला प्रलंबित देणी आणि बिले भरण्यासाठी उपयोगी पडेल. आपल्या जोडीदारासोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा. जोडीदार तुम्हाला पाठिंबा देईल आणि मदतही करेल. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. एखाद्याला मदत देऊ केलीत तर त्याचे कौतुक होईल किंवा लोक त्याची दखल घेतील.
कुंभ – भूतकाळातील घटनांचा विचार करीत बसलात तर, त्यातून नैराश्य वाढेल आणि त्याचा प्रकृतीवर परिणाम होईल. त्यामुळे शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. कामाच्या ठिकाणी गतिमान आणि प्रगतीशील बदलांसाठी सहकाऱ्यांचा पाठींबा मिळेल.
हेही वाचा – एका लग्नाची पुढची गोष्ट…
मीन – गेले काही दिवस अनेक प्रकारच्या मानसिक तणावात गेल्याने थोडी मौज मजा, करमणूक यातून विरंगुळा शोधाल. वाईट परिस्थितीत पैसाच कामी येतो, त्यामुळे आर्थिक बचतीचा विचार करा. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. काही जातकांना दूरचा प्रवास करावा लागू शकतो, परंतु खूप फायदाही होईल.
दिनविशेष
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली
टीम अवांतर
भारतीय पक्षीतज्ज्ञ आणि वृक्ष अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचा जन्म सोलापूर येथे 5 नोव्हेंबर 1932 रोजी झाला. वन्यजीव आणि आदिवासी जीवनावर ललितलेखन करणारे एक आघाडीचे लेखक म्हणून चितमपल्ली ओळखले जातात. 1958-60 या कालावधीत त्यांनी वनक्षेत्रपाल पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील वनविभागापासून त्यांच्या नोकरीस सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर, वडगाव (मावळ), नांदेड, इस्लामपूर, अहमदनगर वन विभागातील बोटा, अकोला तालुक्यातील राजूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या नवेगावबांध, पनवेल आणि पुणे इत्यादी ठिकाणच्या वन विभागांमध्ये कामे केली. कामाच्या संदर्भात त्यांनी परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले. तसेच, त्यांनी जर्मन आणि रशियन या भाषांचेही अध्ययन केले. निवृत्तीच्या वेळी ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उपसंचालक पदावर होते. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील विकासात त्यांनी भरीव कामगिरी बजावली. पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, रातवा, मृगपक्षिशास्त्र (संस्कृत-मराठी अनुवाद), घरट्यापलीकडे, पाखरमाया, निसर्गवाचन, सुवर्णगरुड, आपल्या भारतातील साप (इंग्रजी-मराठी अनुवाद), पक्षीकोश, आनंददायी बगळे, निळावंती, केशराचा पाऊस इत्यादी पुस्तके आणि चकवा चांदणं हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. चितमपल्ली यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना जंगलाचं देणं, रानवाटा, रातवा या त्यांच्या साहित्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना 1991 मध्ये विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला. रानवाटासाठी त्यांना १९९१मध्ये सोलापूरचा भैरूरतन दमाणी पुरस्कार आणि मृण्मयी साहित्य पुरस्कार असे दोन पुरस्कार प्रदान करण्यात आले. इचलकरंजी येथील फाय फाउंडेशन प्रतिष्ठानाकडून त्यांना 1991 साली राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य सेवेच्या सन्मानार्थ विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्याकडून ‘साहित्य वाचस्पती’ हा पुरस्कार प्राप्त झाला. सोलापूर येथे जानेवारी 2006 मध्ये भरलेल्या 79 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. 18 जून 2025 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
आज, 05 नोव्हेंबर 2025 चे पंचांग आणि दिनविशेष todays-panchang-and-dinvishesh-05- November-2025- by Darshan Kulkarni –Ved


