पराग गोडबोले
अलीकडेच जुने फोटो चाळत असताना, अचानक आमच्या जुन्या बुश टीव्हीचा फोटो मिळाला अवचित आणि खूप जुन्या आठवणी जागृत झाल्या… तसा आमच्याकडे टीव्ही बऱ्याच वर्षांपासून आहे. अगदी एकच वाहिनी असल्यापासून. काळा पांढरा ते रंगीत हे स्थित्यंतर पण ‘याची देही याची डोळा” बघितलं आणि अनुभवलंय मी!
Tele vista नावाच्या कंपनीचा पहिला टीव्ही होता आमचा, मग EC आला आणि मग बुशचा रंगीत टीव्ही. डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून त्या काळच्या कृष्णधवल टीव्हीवर निळ्या रंगाची काच लावली जायची. आमच्या घरी पण तशी काच होती. थोडी शीतलता यायची पडद्याला, त्या काचेमुळे!
बऱ्याच वेळा ते डबडं सुरूच नाही व्हायचं, मग बाबा त्याला दोन-चार थपडा लगावायचे, इकडून तिकडून आणि मग काही वेळाने पडदयावर हलके हलके चित्र उमटू लागायचं. दिवसाचे फक्त काही तासच कार्यक्रम असायचे… त्यामुळे ते संपले की, हुरहूर लागायची आणि दुसऱ्या दिवशीची अगदी आतुरतेने वाट बघितली जायची.
सोसायटीच्या गच्चीवर जाऊन अँटेना नामक एक उपकरण आणि त्याची वरळीच्या मनोऱ्याच्या दिशेने फिरवाफिरवी करणे हे एक वेगळंच प्रकरण असायचं. जरासा कोन चुकला की, चित्र गायब व्हायचं! शीव कोळीवाडा येथे रहात असताना, आमच्या इमारतीच्या गच्चीवरून टीव्हीचा मनोरा अगदी स्पष्ट दिसायचा, कारण त्यावेळी तीच सगळ्यात उंच रचना होती, पंचक्रोशीतली!
कधीकधी कावळा बसायला आणि अँटेना फिरायला एक गाठ असायची आणि परत मोर्चा गच्चीकडे वळायचा. ती फिरू नये म्हणून मग लाकडी खिट्ट्या चेपणे, सिमेंटचा गिलावा करणे, उभ्या पाइपच्या कडेने खिळे ठोकणे, आदी असंख्य उपद्व्याप केले जायचे. गंमत असायची त्यात सुद्धा… एकदा तर, झाड जसं उन्मळून पडतं मुळासकट, तशी संपूर्ण अँटेना मुळासकट उखडून खाली पडली होती आमची. नशीब रात्रीच्या वेळी पडली, नाहीतर कपाळमोक्ष निश्चित होता कोणाचा तरी! ती वेळ आमच्या नशिबाने टळली.
हेही वाचा – चेन्नई ते पुणे विमानप्रवास अन् तो तरुण…
पडद्यावरच्या मुंग्या, खरखर, घरघर… या सगळ्यांमधून छायागीत, चित्रहार, किलबिल, गजरा, आमची माती आमची माणसं, ज्ञानदीप, फूल खिले है गुलशन गुलशन, चार्ली चॅप्लिन, जाड्या रड्या… असे असंख्य कार्यक्रम अगदी आवर्जून बघितलेले स्मरतात. बहुतेक दर रविवारी सकाळी, साप्ताहिकी नामक कार्यक्रम लागत असे. त्यात पुढच्या आठवड्यात दाखविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची झलक असे. आम्ही हा कार्यक्रमही बघत असू. आई तिच्या छोट्याशा वहीत सगळे महत्त्वाचे कार्यक्रम वारानुसार टिपून ठेवायची, न चुकता बघायला. त्यावेळी दूरदर्शन आणि आकाशवाणीचे कार्यक्रम पेपरात सुद्धा छापून येत असत आणि ते तसे वाचल्याचं अगदी लख्ख आठवतंय मला!
दर शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी चित्रपट असायचा. सिनेमे बघणंच दुर्मीळ असणाऱ्या त्या काळात, हे कृष्ण-धवल सिनेमे म्हणजे मोठीच मेजवानी असायची आमच्यासाठी. बऱ्याचदा, आई भुईमुगाच्या पातेलंभर शेंगा उकडून ठेवायची आणि मग सिनेमा बघत बघत त्यांचा फन्ना उडायचा.
तेव्हा ‘व्यत्यय’ हा शब्द माझ्या शब्दकोषात नव्याने सामील झाला होता. कार्यक्रम सुरू असताना तो अचानक बंद व्हायचा आणि पडदयावर ‘व्यत्यय’ची पाटी झळकायची. काही वेळानंतर परत कार्यक्रम सुरू व्हायचा, पुन्हा व्यत्यय येईपर्यंत! त्या काळच्या माश्यांना, बातम्या सांगणाऱ्या निवेदिका खूप प्रिय असायच्या बहुतेक आणि मग एका हाताने माश्यांना उडवत, वृत्तनिवेदन पूर्ण व्हायचं. खूप हसू यायचं त्या वेळी.
भक्ती बर्वे, अनंत भावे, वासंती वर्तक, प्रदीप भिडे, स्मिता पाटील आदी वृत्तनिवेदिका आणि निवेदक अगदी घराघरात पोहोचले होते. शांत, संयत स्वरात त्यांनी दिलेल्या बातम्या म्हणजे मेजवानी असायची कानाला आणि मनालासुद्धा! शुद्ध आणि सात्विक स्वर, स्वच्छ भाषा आणि कुठलाही अभिनिवेश न बाळगता केलेलं वृत्तनिवेदन म्हणजे एक मापदंड असायचा मराठी उच्चारांचा आणि अभिव्यक्तीचा.
त्यातच, क्रिकेटचे सामने थेट प्रक्षेपणाच्या स्वरूपात घराघरात दिसायला लागले आणि टीव्ही नामक यंत्राची लोकप्रियता अफाट वाढली. हळूहळू काळ बदलत गेला. 1982च्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान टीव्हीने कात टाकली आणि मनातले रंग पडद्यावर दिसू लागले. वाहिन्या अजूनही दोनच होत्या. राष्ट्रीय आणि प्रादेशिक (मुंबई).
हेही वाचा – केल्याने होत आहे रे!
आम्ही जेव्हा बुश कंपनीचा रंगीत टीव्ही घरी आणला, तेव्हा रिमोट कंट्रोल घ्यावा का न घ्यावा, यावर आमची खूप चर्चा झाली होती. रिमोट घ्यायचा झाल्यास हजार रुपये जास्त पडणार होते आणि ‘चॅनेल बदलायला असे कितीसे कष्ट पडतात? उगाचच आपला आळशीपणा,’ म्हणून आमच्या घरी रिमोट नव्हता आला. कोकणस्थी वृत्ती अगदी! आज आठवलं की, खूप हसू येतं…
1983 सालचा विश्वचषक विजय भारतीयांनी ‘याची देही याची डोळा’ त्यांच्या दिवाणखान्यात बसून बघितला आणि चषक उंचावणारा कपिलदेव सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत बनला. गारुड घातलं त्याने अवघ्या देशावर.
हमलोग, बुनियाद, नुक्कड, ये जो है जिंदगी यासारख्या मालिका उदयाला आल्या आणि लोकप्रिय झाल्या. त्यांची शीर्षकगीतं गाजायला लागली आणि मग छोट्या पडद्याने पुन्हा कात टाकली. रामायण आणि महाभारत यासारखी महाकाव्य पडदा गाजवू लागली अन् या माध्यमाची आर्थिक आणि सामाजिक ताकद अधोरेखित झाली.
मधेच एखादी ‘रजनी’ येऊन जनतेला नितीमत्तेचे धडे देऊन जाऊ लागली, तर मराठी पडद्यावर चिमणराव आणि गुंड्याभाऊ धुमाकूळ घालू लागले. ताम्हणकरांचा गोट्या, पुस्तकातली पात्र जिवंत करू लागला.
एकूणच सगळं जीवनच बदलायला लागलं… या ‘इडियट बॉक्स’भोवती फिरायला लागलं.
निवडणुकांच्या दरम्यान प्रणव रॉय आणि विनोद दुवा नामक जोडगोळी जुन्या निवडणुका आणि त्यांचे निकाल, नव्या आकर्षक ढंगात सादर करून, त्यांचे विश्लेषण करून रयतेच्या मनाला रिझवू लागले.
याच दरम्यान मग असंख्य खासगी मनोरंजन आणि वृत्तवाहिन्या उदयाला आल्या. चोवीस तास कार्यक्रमांचे रतीब घातले जाऊ लागले आणि कार्यक्रमांचा दर्जा खालावत गेला. शांत, संयत बातम्यांची जागा आक्रस्ताळ्या आरडाओरड्याने घेतली आणि अर्धशिक्षित वृत्तनिवेदकांची बिनडोक फौज डोकं उठवू लागली. निष्पक्ष बातम्यांची जागा निर्बुद्ध पत्रकारितेने घेतली. बेंबीच्या देठापासून ओरडलं तरच आपलं निवेदन लोक ऐकतील, अशी भाबडी कल्पना भिनवली गेली आणि सगळाच खेळखंडोबा झाला.
मालिका म्हणजे तर सासू, सुना, नणंदा, भावजया यांची कटकारस्थानं आणि विवाहबाह्य संबंध एवढंच असतं, अशी बिनडोक निर्मात्यांची कल्पना झाली आणि भरजरी साड्या, शालू नेसून घरात वावरणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या निर्बुद्ध बायका आणि त्यांचे नंदीबैल नवरे एवढंच मायबाप प्रेक्षकांच्या माथी मारलं जाऊ लागलं.
नाही म्हणायला, काही उत्तम reality shows उदयाला आले, त्यातून नवे, ताज्या दमाचे कलाकार लाभले… KBC सारखे कार्यक्रम मनोरंजनासोबतच ज्ञानात भर घालू लागले आणि सगळंच काही संपलेलं नाही, याची जाणीव मनाला आश्वस्त करू लागली.
टीव्ही आला तेव्हाचा पडदा आणि आजचा डिजिटल पडदा यात जमीन-अस्मानाचा फरक आहे, तरीही मन मागे मागेच धावतंय आणि कृष्ण-धवल युगाचे ते सोनेरी दिवस परत एकदा समरसून अनुभवावेत, असं मनापासून वाटतंय. कळतंय ते शक्य नाही आता, पण वळत नाहीये, हेच खरं!
मला ठाऊक आहे, माझ्या पिढीतल्या सगळ्यांचे हे असेच अनुभव असतील… थोडे कमी, थोडे जास्त, थोडे डावे, थोडे उजवे, पण निखळ आनंददायी!


