चंद्रकांत पाटील
सकाळी उठल्या उठल्या ब्रश करीत परसदाराला जायाचं आणि आजूबाजूला चाललेली बाया माणसांची गडबड बघत बसायचं, ही रमेशची सवय. आजही तो नेहमीप्रमाणे ब्रश घाशीत मागच्या कट्ट्यावर बसून फेसाळल्या पिचकार्या मारत होता, तेवढ्यात पलीकडच्या बनूकाकीनं कोंबड्याचं खुराडं आणून रस्त्यावर उपडं केलं तसं… पक्, पssक करीत दहाबारा तलंगा बाहेर पडल्या की, त्याच्यांबरोबर एक तरूण कोंबडापण बाहेर पडला. बाहेर पडल्या पडल्या त्याने अंगाला झिंझाडा दिला आणि मान उंच करून कुकु…कुss अशी आरोळी ठोकली. लगेच त्याच्या भोवती चारपाच तरुण कोंबड्या गोळा झाल्या आणि त्यातल्या एका तरतरीत तलंगेच्या मागे तो लागला… दुसर्या खुराड्यातून बाहेर पडणार्या जुन्या कोंबड्याने ते पाहिले… त्याला ते सहन झाले नाही… तो ऐंशीच्या वेगाने पळत आला आणि त्याच्या अंगावर गेला… आणि सगळा डाव ओमफस् झाला…
जुना कोंबडा चांगला दीड- दोन फूट उंचीचा होता. चालायला लागला म्हणजे ऐटीत राजासारखा हलत डुलत चालायचा. त्याच्या लांबलचक तुर्यामुळे तो रुबाबदार दिसायचा आजुबाजूला तरूण कोंबड्याचा घोळका बरोबर असल्यामुळे तो सेलेब्रिटी वाटायचा. एकाही कोंबडीला तो नवीन कोंबड्याशी सलगी करून द्यायचा नाही.
बनूकाकीनं अंडी वाढावित म्हणून नवीन कोंबडा बाजारातून आणला होता. तो गवळणींच्या गोकुळात नुसताच हिंडत होता. हे सगळं बघून रमेश मनातल्या मनात म्हणाला… “बायला! या तरण्या कोबड्याची गत आपल्यावाणीच झाल्या म्हणायची. आपलं सुद्धा लगीन झालंया, पण अजून बायकूच्या अंगाला हात लावायला मिळाला नाही. आज बरोबर तीन वर्षं झाली आपल्या लग्नाला… पाच दिवसांनी ती जी माह्यारली गेली, ती परत आलीच नाही!” लग्नानंतर गोंधळ, पूजा, देव देव करताना तिचा सहवास लाभला होता. नुसती हसायची मोठ्या मोठ्या डोळ्यानं बघायची आणि लाजायची. तशी रुपाली मला लई आवडायची… पण कुठं माशी शिंकली देवाला ठावं… आमच्या वैनीनं काय बघितलं कुणास ठाऊक आणि सगळा इस्कोट झाला…
रम्या इस्लामपूरच्या कॉलेजतून बी कॉम झाला होता आणि जवळच्या कारखान्यात क्लार्क म्हणून नोकरीला लागला होता. पोरगा कामाला लागला म्हणून माईनं आणि आप्पाने स्थळे बघायला सुरवात केली होती. दरवर्षी पाचपंचवीस पोरी बघायच्या… कधी मुलगी पसंत पडायची तर, त्यास्नी मुलगा पसंद पडायचा नाही, कधी दोघांची सहमती व्हायची तर पत्रिका जुळायची नाही, सगळं जुळलं तर नातेसबंध जुळायचं नाहीत… असं करीत पाच वर्ष गेली. शेवटी माय-आप्पा कंटाळले. सीझन संपत आला आणि शेवटा-शेवटाला एक स्थळ जुळले, कशीतरी मुलगी पसंत पडली… अर्थात, सगळ्यांना लग्नाची घाई झाली होती, त्यामुळे “यादी पे शादी” लग्न झाले. रम्याच्या पसंतीचा कुणी विचार केलाच नाही!
हेही वाचा – दोन बायकांचा दादला… रंगा कारभारी
रम्याचं बी वय झालं होतं, त्यामुळे कधी एकदा लगीन होतंय, असं त्याला झालं होतं अखेर घाईगडबडीनं का होईना, गंगेत घोडं न्हालं आणि तो ‘चर्तुभुज’ झाला. देव देव होईपर्यत समधं व्यवस्थित पार पडलं होतं, पण पाचव्या दिवशी मुलगी परत जाताना थोरल्या वहिनीला तिच्या पायावर काहीतरी दिसून आलं. मग नवरी घराबाहेर जाईपर्यत ती काही बोलली नाही, नंतर तिने ती गोष्ट आपल्या नवर्याला सांगितली… त्यानं माईला आणि आप्पाला सांगितली… त्यामुळे नवर्या मुलीच्या पायावर पांढरा डाग असल्याचे सर्वाना समजले आप्पासह सर्व कुटुंबीय नाराज झाले. ‘मुलगी आपल्या गळ्यात मारली आहे,’ असा त्यांचा समज झाला.
खूप चर्चा झाली दंगा झाला. आप्पाला खूप राग आला. काही दिवसांनी आप्पा चार माणसे घेऊन पाहुण्यांना जाब विचारायला त्यांच्या दारात पोहचला. पाहुणा म्हणाला “अहो चार आण्याएवढा डाग आहे आणि त्याची कल्पना आम्ही वधूवर सूचकाला दिली होती. त्यांनी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं…” वगैरे वगैरे. त्यावर त्यांनी वधूवर सूचकाशी संपर्क केला, तो म्हणाला “हो, हो, मला ते बोलले होते; पण मुलगी पाहता ही गोष्ट मला किरकोळ वाटली आणि तुम्ही इतके दिवस स्थळ हुडकताय म्हणून तुम्हाला दाखवलं… त्याचं एवढं काय घेऊन बसलाय? सध्या असलीपण पुरगी भेटत नाय! पुढ बोला!” त्याची ही गोष्ट खरी होती पण आप्पा कुटुंबीयांचा अहंभाव दुखावला होता.
मग त्यावर गावातल्या लोकांनी आप्पाची समजूत घातली. “झाले गेले विसरून जावा. मुलगी चांगली आहे आणि छोटा-मोठा डाग असला तर, त्याचा एवढा मोठा बाऊ कशाला करताय. आधीच रमेशच्या लग्नाला वेळ झालाय… तवा आल्याली लक्ष्मी लाथाडू नगा, पोरगीला नांदवा जावा आणि संसार सुरू करा…” पण घरच्या बायकां ऐकायच्या मूडमध्ये नव्हत्या…
“आम्ही काय फालतू माणसं हाय का? चांगलं शहाण्णव कुळी खानदानी भोसले पाटील आहोत, ही गेली तर जाऊ दे, असल्या छप्पन पोरी उभ्या करू…” अशा घमेंडीत सर्वजण बोलत होते. रमेशची अवस्था तर ‘न घर का, ना घाट का’ अशी झाली होती…
या सगळ्यात भांडणं लावणारी म्हणजे आप्पाची थोरली सून होती, तिला दीराचं चांगलं झालेलं बघवत नव्हते… शिवाय, नवीन आलेली सून सगळ्या बाजूनी तिच्यापेक्षा जरा सरस होती, मग तिचं वर्चस्व घरात होईल म्हणून तिला कायमचं कटविण्याची नामी संधी येताच तिने हा बॉम्बगोळा टाकला होता आणि ‘राईचा पर्वत’ केला होता. बोलता बोलता ती सासूबाईना म्हणाली….
“आमच्या मावस भावाला अशीच डाग असलेली बायको मिळाली, पुढं पोरं बी तसलीच झाली आणि शेवटाला ती पण पांढरीफटक पडली! आता पांढऱ्या पायाची म्हणून कोण घरात येऊन देत नाही आणि असली ‘सोन्याची सुरी’ काय कामाची? याच्या परीस गरीबाची काळी सावळी पुरगी भाऊजींस्नी कुठंबी मिळंल… तवा तिला आता आणायची नाय!”
हे सगळं ऐकून आप्पाला खूप पश्चाताप झाला. आपल्याला कुठल्या मुहूर्तावर वधूवर सूचक भेटला आणि निष्कारण खर्चाला डुबलो. शिवाय, सगळा तमाशा झाला आणि पदरात काहीच पडलं नाही, असे त्यांना वाटू लागले.
चर्चा करता करता पावसाळा आला. सगळीकडे शेतीची कामे सुरू झाली… दसरा झाला, दिवाळी झाली आणि तुळशी पोर्णिमेनंतर पुन्हा रमेशच्या लग्नाची चर्चा घरात होऊ लागली. रमेशला मुली बघण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन होऊ लागले.
रुपालीच्या पायावर डाग आहे म्हणून ती पाचव्या दिवशी जी माहेरला गेली, ती परत आली नाही. गेली दोन-तीन वर्स रम्या नुसतं तळमाळतंय… “आपलं लगीन झालंय, पण बायकू जवळ नाय! बरं, दुसरं लगीन करावं म्हटलं तर, घटस्फोट मिळत नव्हता आणि झालं गेलं इसरून बायकू आणूया म्हटलं तर घरचे लोक तयार नव्हते!!” काय करावं, न काय नको, हे समजत नव्हतं. बरोबरच्या मित्रांची लग्नं होऊन दोन दोन लेकरं झालेली होती…
गावात चाळिशीला आलेली, पण लग्न न झालेली पाचपंचवीस जण होती. आजकाल एखाद्याचं लग्न ठरलेलं कळाले की, गावभर चर्चा व्हायची. कुठली मुलगी, किती शिकल्या, कुठल्या गावची, मध्यस्थ कोन हाय, हुंडा किती दिलाय… या ना त्या अनेक चर्चा व्हायच्या.
हेही वाचा – सिंधू मॅडम अन् कलेक्टर शिल्पा…
सध्याकाळचं जेवाण झाल्यावर पारावर गप्पा मारायला सगळी खालची गल्ली जमायची, तशी आजबी सगळी जमली होती. रम्या आपल्या सखाराम गावकर या खास दोस्ताबरोबर गप्पा मारत होता… तोवर हणमा मेहरबान दात टोकरात आणि धोतराचा सोगा वर धरून पारावर आले. त्यांना बघून सखाराम म्हणाला…
“मेहरबान, आज जेवायला लई टाइम केलासा”
त्यावर मेहरबान म्हणाले,
“सखाराम, आज दिवसभर गडबडच चालली… आता आलो बघ खालतीकडंन् म्हंजी पार पंढरपूराच्या म्होरनं”
“तिकडं काय काम काडलं हुत!”
“तिकडं भावकीचं काम… मग जायाला नको?”
“भावकीचं म्हजी… आण्णाच्या सुरश्याचं लगीन ठरवून आलो.”
“काय म्हणता? बरं झालं की! गडी पारच किंरवाजला हुता, तरणाबांड गडी, पण लगीन ठरता ठरना म्हणून जरा नाराजच हुता हो… बरं झालं! पण कसं ठरलं?”
“ठरवायचं काय त्यात? नुसती मुलगी आणि नारळ त्यांनी घेऊन याचं… बाकी काय नाय!”
“मेहरबान, अवं हे असं कसं? एवढ्या मोठ्या स्थळाला हुंडा नाई म्हजी…” सखाराम म्हणाला.
“अरं सखाबापू, पुरगी कोन दिना म्हणून फाफलत तिकडं खालतं गेलोतो आणि हुंडा मागायचा? अरं, ही पुरगी बी हाताला लागत नव्हती! मधी एक एजंट घातला, त्येला लाख रुपये आणि पुरगीच्या बाला पाच लाख दिल्याती… अशी आतल्या अंगाची बातमी हाय! आता बोल…”
तवर मेहरबान यांच्या खिशातला फोन वाजला आणि ते फोनवर बोलत निघून गेले.
हे सगळं ऐकून सखाराम रम्याला म्हणाला…
“बायला आपून आता चाळीशीला आलो, कवा लगीन हुयाचं आणि कवा पोरं हुयाची. म्हंजी आपूण म्हातारं होईस्तुवर मिळवायला लागणार, मग पोरांची लग्न आणि मंग आपली सुटका… काय खरं नाय गड्या पन्नाशीला गडी लगीन करून! पोरास्नी शिकवून मोकळा हुयाला पाहिजे, पण ते काय घडंल असं वाटत नाय!”
सखारामाचं बोलणं ऐकून रमेश गंभीर होत म्हणाला.. “आमच्या घरात तर लई अवघड झालंया बापू… थोरला भाऊ आणि वैनी स्वतंत्र राहिल्यात, आप्पा थकल्यात, माईला जेवाणखाण, पै-पावनं, रानामाळातली काम झेपाना झाल्यात… सारखं काईतरी दुखताया, कवा गुडघा, कवा कंबार तर कवा अशक्तपणा डॉक्टरकडं नेलं की, तो म्हणतंय… ‘त्यास्नी आता विश्रांतीची गरज हाय!’ मग घरात कोणतरी मदतीला नको का? ईचार करून करून टक्कूरं फिरायची येळ आलीया गड्या. सकाळ-संध्याकाळ डोस्क्यात एकच ईचार चाललाय बघ, अवंदा लगीन हुयाला पाहिजे… हुतं पण घडलं नाय गा!” रमेश हताश झाला होता.
त्यावर सखाराम म्हणाला, “रमेश पुरगी मिळायच मायंदाळ अवघड झालंय गड्या… जिला ईचारशील ती नोकरदार हाय का म्हणून उलटं इचारते… म्हंजी आम्हासनी काय किंमत हाय का नाय? नोकरदाराच्या घरात जे हाय ते आमच्याकडं बी हाय… नोकरचाकर, गाडी, बंगला सगळं हाय! शिवाय, गावात बी सगळ्या सोई झाल्यात… नळाचं पाणी, टीव्ही, मोबाइल, सिनेमा, नाटक, मॉल सगळं हाय, तरीपण या पोरीस्नी पुण्यातलाच नवरा पाहिजे. वैताग आलाय ह्या समध्याचा! आता मी ठरविलयं बघ… कुठलीबी पुरगी होय म्हणंल, तिच्यासंग लगीन करून मोकळं हुयाचं… कारण आपुन ह्या वर्षी नको म्हणल्याली पुरगी पुढच्या वर्षी राहत नाही! यंदा जी होय म्हणंल ती काळी, जाडी, ठेंगणी अगदी डाग असलं तरी चालत्याल… डागानं काय संध्याकाळी अडचण हुत्यं का? आता मला थाबायचं नाय…”
हे सखाचं विचार ऐकून रम्याच्या डोस्क्यात प्रकाश पडला… “डाग असलेली पुरगी सुधा मिळणं कठीण हाय!” यावर रमेशने रात्रभर विचार केला आणि हाय ती बायकू बी हातातनं जायाला नको, या निर्णयापर्यंत तो आला.
दुसर्या दिवशी त्याने बुलेटला कीक मारली आणि सरळ सासुरवाडी गाठली. अचानक आलेल्या पावण्याला बघून सगळी मंडळी अचंबित झाली. चहापाणी झाल्यावर रमेशला सासर्याने विचारलं, “पावणं आज कसं काय येणं केलसा?” त्यावर रमेश सरळ म्हणाला “बायकोला न्यायला आलोय!”
“पर ते डागाचं… काय करायचं?” सासरा चाचरत म्हणाला.
“त्यो विषय आम्ही डोस्क्यातनं काढलाय बघा! आमच्या घरात आई थकल्या, भाऊ सवता राहिलाया आणि कोन बाई माणूस नाही म्हणून आम्ही समध्यानी रुपाला नांदवायची म्हणून ठरविलय बघा…”
“पण जावईबापू रुपाली येत्या का नाय? वाईच तिला विचारलं पाहिजे!”
“ईचारा की…” रमेश म्हणाला
मग मुलीचे वडील रुपाला विचारायला आत गेले. त्यांनी मुलीला सांगितले की, “तुला न्यायला आलेत…”
बाहेर येऊन ती म्हणाली, “मला जरा विचार करू द्या! आज तरी मी येत नाय!”
“जशी तुमची मर्जी,” असे म्हणून नाराज मनाने रमेश उठला आणि गावाकडे परत आला.
रात्रभर तो विचार करीत होता… “बायला! बायकूचं बरोबरच हाय म्हणा आजवर आपून कवा तिची आठवण काढली नाय का विचारपूस केली नाय आणि आज मातूर ‘बाजारातून म्हस सोडून आणावी तसं तिला आणायला गेलो…, ह्यो काय माणसांचा येव्हार नव्हं!”
“नाहीच, ती येणार नाही!” पण दुसर्या बाजूनं त्याला वाटायच… “किती झालं तरी बाईच्या जातीला नवर्याच्या घराशिवाय पर्याय नसतो!” असा उलटासुलटा विचार करीत त्यो आड्याकडं बघत बिछान्यावर पडून राहिला… अंधार वाढत गेला.
हिकडं रुपाली विचार करीत होती, “आपुन तरणताठं हाय, जग सुखानं जगू द्यायचं नाय, नवर्याच्या घराशिवाय आपला शेवट नाय लागायचा… किती झालं तरी मी सवाशिण आहे आणि आता माझी त्यास्नी गरज हाय तवा आपून रूसून माह्यारात राहणं योग्य नाही. आई-बापाच्या माघारी आपल्याला नवर्याशिवाय पर्याय नाही!”
शेवटी तिचं मनही नवर्याला भेटायला आसुसलेलं होतंच. मग तिने रात्रीच आईवडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि “मी जायला तयार आहे म्हणून सांगितले…” त्यांनाही आनंद झाला.
दुसऱ्या दिवशी रुपालीच्या आईने गल्लीतल्या बायका गोळा केल्या चांगल्या पांच दुरड्या पोळ्याची शिदोरी तयार केली. रुपालीला हिरवीगार साडी आणली, बांगड्या भरल्या आणि मुलगी सासरी निघाली. माहेर सोडताना आईच्या गळ्यात पडून ती रडू लागली आणि गाडी हलली तसं तिच्या वडिलांनी रमेशला फोन केला आणि “आम्ही मुलगीला घेऊन येतोय” म्हणून कळविले. त्याबरोबर रमेश कुटुंबीयही खूश झाली.
एखाद्या नव्या नवरीसारखी ती दिसत होती. आज ती तीन वर्षांनी पुन्हा एकदा सासरच्या पायर्या चढत होती. ती आत निघाली तर दारातच बायकांनी तिला थांबविली. रमेशच्या आईने भाकरीचा तुकडा ववाळून बाजूला टाकला…. पायावर पाणी वतलं टावेल पुसायला दिला आणि नवरी लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली…
आणि रमेशचा संसार सुरू झाला!
(सामाजिक समस्येवर प्रकाश टाकणारी, एका शेतकरी मुलाची अस्सल ग्रामीण कथा)
मोबाइल – 9881307856


