दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 03 जून 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 13 ज्येष्ठ शके 1948; तिथि : तृतीया 21:20; नक्षत्र : पूर्वाषाढा 24:59;
- योग : शुभ 08:11; करण : वणिज 08:11;
- सूर्य : वृषभ; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:12;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 09:52)
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
बालसाहित्यकार आनंदीबाई शिर्के
टीम अवांतर
बालसाहित्यकार तसेच कथाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंदीबाई शिर्के यांचा जन्म 3 जून 1892 रोजी मुंबईतील चिंचपोकळी येथे झाला. त्या पूर्वाश्रमीच्या अनसूया गोविंदराव शिंदे. आनंदीबाईंचे वडील बडोद्याला गायकवाड सरकारच्या सेवेत असल्यामुळे आनंदीबाईंचे बालपण गुजरातमध्ये गेले. परंतु, कौटुंबिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडला.
वयाच्या अवघ्या 18व्या वर्षापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली. प्रारंभी त्या ‘कुमारी आनंदी’ या टोपणनावाने लिहित असत. 1910मध्ये ‘मासिक मनोरंजन’मध्ये त्यांची ‘शारदाबाईंचे संसारशिल्प’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यांच्या लेखनशैलीने त्या काळातील साहित्यिकांचे लक्ष वेधून घेतले. त्याच वर्षी ‘मासिक मनोरंजन’मध्येच त्यांचा ‘स्वच्छता’ हा निबंध प्रसिद्ध झाला.
हेही वाचा – Bookshelf : तुंबाडचे खोत… काळ कोणताही असो माणूस तोच!
विवाहानंतर पती शिवरामपंत शिर्के यांच्या साहित्यक्षेत्रातील वावरामुळे आनंदीबाईंचा अनेक नामवंत साहित्यिकांशी परिचय होऊन मैत्री झाली. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांना आपली मुलगीच मानत असत. आनंदीबाई शिर्के या मराठी बालसाहित्याच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण लेखिका म्हणून ओळखल्या जातात. बालसाहित्यातील त्यांच्या योगदानामुळे त्यांचे नाव मराठी साहित्यविश्वात आदराने घेतले जाते.
त्यांनी आपल्या साहित्याद्वारे बालसाहित्याला एक नवा आयाम दिला आहे. लहान मुलांचे जग, त्यांच्या कल्पनाशक्तीचा गोडवा, तसेच त्यांच्या नैसर्गिक कुतूहलाची पूर्तता करणारे विविध लेखनप्रकार त्यांनी साकारले. त्यांच्या लेखनशैलीत साधेपणा आणि निरागसता असून, ती बालवाचकांना अगदी जवळची वाटायची. आनंदीबाईंच्या बालकथा, कविता, गोष्टी, आणि अन्य साहित्य मुलांच्या भावविश्वाला भिडणारे होते.
1938 सालच्या अखिल भारतीय मराठी महिला परिषदेच्या त्या अध्यक्ष होत्या. जुन्या काळातील स्त्रीजीवनाचे वास्तव मांडणारे त्यांचे ‘सांजवात’ हे आत्मचरित्र विशेष गाजले. या त्यांच्या आत्मचरित्रात तत्कालीन एकत्र कुटुंब पद्धती, स्त्रियांवरील बंधने आणि समाजातील रूढी-परंपरांचे अत्यंत प्रांजळ आणि वास्तव चित्रण पाहायला मिळते。
31 ऑक्टोबर 1986 रोजी या लेखिकेचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ मराठी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी उत्तम कथासंग्रहासाठी ‘आनंदीबाई शिर्के’ पारितोषिक दिले जाते.
आजचे राशीभविष्य
मेष – दिवसाची सुरुवात सकारात्मक उर्जेने होईल. कार्यालयात वरिष्ठांची विशेष मर्जी राहील. कामाचा आवाका पाहून पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासूनच्या आर्थिक चिंता हळूहळू संपुष्टात येत असल्याचे दिसते. संततीवर सोपवलेली जबाबदारी मोठ्या कौशल्याने पार पाडली जाईल, ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तब्येतीची काळजी घ्या, दुर्लक्ष करू नका.
वृषभ – एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाला किंवा शुभ प्रसंगाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल. बोलण्याने निकटवर्तीय व्यक्ती नाराज होऊ शकते, म्हणून शब्द काळजीपूर्वक निवडा. कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेअर बाजाराशी संबंधित असलेल्यांना दिवस फायदेशीर ठरू शकतो. संतती तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील.
मिथुन – कुटुंबातील एखादी व्यक्ती सुखद आश्चर्याचा धक्का देऊ शकते. वडीलधाऱ्यांचा आदर करणे आणि त्यांचा सल्ला मानणे अत्यंत फायदेशीर ठरेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याची कल्पना मनात रुजू शकते. मालमत्ता व्यवसायात गुंतलेल्यांसाठी दिवस उत्तम आहे; एखादा मोठा व्यवहार अंतिम होऊ शकतो. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन गुंतवणूक करणे टाळा.
कर्क – एक महत्त्वपूर्ण यश घेऊन येणारा दिवस आहे. घरात सुरू असलेल्या समस्या सोडवण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावाल. कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ होतील. नवीन लोकांना भेटणे फायदेशीर ठरेल. आर्थिक चिंतेमुळे तुम्हाला आंतरिक त्रास होऊ शकतो. कामाशी संबंधित किरकोळ समस्यांमुळे तणाव वाढू शकतो, म्हणून सावध रहा.
सिंह – आत्मविश्वास हीच तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी इतरांना प्रभावित करेल. मनातील एखादी इच्छा पूर्ण झाल्याने आनंद द्विगुणित होईल. नवीन लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. ऑनलाइन व्यवसायात गुंतलेल्यांना मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.
कन्या – घरी पाहुण्यांच्या आगमनाने वातावरण प्रफुल्लित होईल. एखाद्या प्रलंबित व्यवहाराला अंतिम रूप मिळू शकते. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात प्रगती करू इच्छिणाऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळणे दमवणारे असू शकते, म्हणून कामांना योग्य प्राधान्य द्या.
तुळ – प्रत्येक कामात तुमची कामगिरी प्रशंसनीय असेल. मात्र, निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते, म्हणून सावध रहा. करिअरच्या उत्तम संधी मिळू शकतात. नवीन नोकरी किंवा संधीची शक्यता तुम्हाला उत्साहित करेल. जोडीदारासोबत किरकोळ वाद होऊ शकतो, परंतु समंजसपणे परिस्थिती हाताळल्यास हा वाद मिटेल.
वृश्चिक – सामाजिक ओळख आणि आदर यांच्यात वाढ होईल. लोक तुमच्या बोलण्याने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतील. घाईने घेतलेले निर्णय हानिकारक ठरू शकतात, म्हणून प्रत्येक पाऊल उचलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. पैसे उधार घेणे टाळा कारण, यामुळे आर्थिक भार वाढू शकतो.
हेही वाचा – आंधळा मागतो एक डोळा…
धनु – दिवस नोकरी आणि करिअरसाठी खूप चांगला ठरू शकतो. बढती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. मेहनत आणि कार्यपद्धती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवेल. तुमचा प्रभाव वाढेल, पण यामुळे काही लोकांना मत्सरही वाटू शकतो. कोणाबद्दलही नकारात्मक भावना ठेवणे टाळा. व्यवसायात कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते.
मकर – आर्थिक बाबतीत नशीब तुमच्या बाजूने असल्याचे दिसते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्णत्वाच्या दिशेने जातील. आर्थिक समस्यांमुळे रखडलेल्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाला गती मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. जुने कौटुंबिक प्रश्न पुन्हा उफाळून येऊ शकतात, ज्यामुळे काहीशी अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
कुंभ – भागीदारीत केलेले काम फायदेशीर ठरू शकते. घरी एखादा शुभ प्रसंग घडू शकतो, ज्यामुळे आनंदी वातावरण निर्माण होईल. आरोग्याबाबत निष्काळजीपणा नको, वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या. इतरांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करणे टाळा. तसेच, इतरांवर अवलंबून राहण्याचे बंद करा, त्यामुळे आत्मविश्वास मजबूत होईल.
मीन – कोणतेही काम हाती घेताना नियम आणि कायद्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. घाईने घेतलेल्या निर्णयामुळे नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम बाळगा. आरोग्यात चढ-उतार होईल. अविवाहितांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास संभवतो, तथापि, प्रवासात सतर्क राहा.


