दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 03 ऑगस्ट 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 12 श्रावण शके 1948; तिथि : पंचमी 22:54; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 21:59;
- योग : सुकर्मा 21:12; करण : कौलव 11:08;
- सूर्य : कर्क; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:15; सूर्यास्त : 19:14;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
हिंदी साहित्याचे शिल्पकार मैथिली शरण गुप्त
टीम अवांतर
हिंदी साहित्याचे शिल्पकार आणि राष्ट्रकवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मैथिली शरण गुप्त यांचा जन्म 3 ऑगस्ट 1886 रोजी उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील चिरगाँव येथे झाला. त्यांचे वडील सेठ रामचरण गुप्त हेदेखील एक कवी होते. त्यामुळे लहानपणापासूनच मैथिली शरण गुप्त यांना कविता आणि साहित्याची आवड निर्माण झाली. औपचारिक शिक्षण फारसे झालेले नसतानाही, त्यांनी प्रयत्नपूर्वक अनेक भाषांचा अभ्यास तर केलाच शिवाय विविध विषयांचे ज्ञानही प्राप्त केले. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी कनकलता या नावाने ब्रजभाषेत काव्य रचण्यास सुरुवात केली. याच काळात ते आचार्य महावीरप्रसाद द्विवेदी यांच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांच्या साहित्यिक विकासावर द्विवेदी यांचा मोठा प्रभाव होता. खडीबोलीच्या ‘सरस्वती’ मासिकात त्यांच्या कविता प्रकाशित होऊ लागल्या.
त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘रंग में भंग’ प्रसिद्ध झाला. त्यानंतर लगेचच ‘जयद्रथ वध’ हा संग्रहही प्रकाशित झाला. पुढे त्यांनी बंगालीतून “मेघनाथ वध”, “ब्रजांगना” या काव्यग्रंथांचा अनुवादही केला. मात्र खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळाली ती 1912-13 मध्ये राष्ट्रीय भावनांनी परिपूर्ण “भारत भारती” प्रकाशित झाल्यानंतर. याशिवाय “स्वप्नवासवदत्त” या प्रसिद्ध संस्कृत ग्रंथाचा अनुवाद प्रकाशित केला. 1916-17 मध्ये त्यांनी ‘ साकेत ‘ महाकाव्याची रचना सुरू केली. रामायणातील लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिच्यावर आधारित हे महाकाव्य निर्माण झाले. त्यांची दुसरी रचना ‘यशोधरा’ ही गौतम बुद्धांची पत्नी यशोधरा हिच्यावर आधारित आहे.
हेही वाचा – फ्रेंडशिप डे
स्वतः छापखाना उभारून त्याद्वारे आपली पुस्तके छापण्यास त्यांनी सुरुवात केली. साकेत आणि पंचवटी ही त्यांची पुस्तके 1931 मध्ये पूर्ण झाली. त्याच वेळी ते महात्मा गांधी यांच्या निकट संपर्कात आले. त्यांचे शब्द प्रभुत्व बघून गांधीजींनी त्यांना ‘राष्ट्रीय कवी’ ही पदवी दिली.
पुढे 1941 रोजी सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. प्रथम त्यांना झाशी आणि नंतर आग्रा तुरुंगात नेण्यात आले. मात्र आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची सात महिन्यांनी सुटका झाली. 1948 मध्ये त्यांनी आग्रा विद्यापीठातून डी.लिट. ची पदवी बहाल केली 1952-64 या काळात ते राज्यसभेचे सदस्य म्हणून नामनिर्देशित झाले.
याशिवाय हिंदू विद्यापीठाने डी.लिट. ने त्यांना सन्मानित केले. तिथेच त्यांची मानद प्राध्यापक म्हणून नियुक्तीही झाली. 1954 मध्ये त्यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वयाच्या 78 व्या वर्षापर्यंत त्यांच्या नावे दोन महाकाव्ये, 19 खंडकाव्य, कविता, नाटके अशी साहित्य संपदा होती. 12 डिसेंबर 1964 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची जयंती दरवर्षी ‘कवी दिन’ म्हणून साजरी केली जाते.
आजचे राशिभविष्य
मेष – नियतीकडून तुम्हाला आज एक महत्त्वाचा संकेत मिळणार आहे. आतापर्यंत रखडलेले मालमत्तेचे प्रकरण अचानक सुटू शकते. तुमच्या सामाजिक दर्जात वाढ होईल. मात्र आपल्या जोडीदाराकडे दुर्लक्ष केल्यास दुरावा वाढू शकतो. आईच्या आजारपणामुळे तुमचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात, पण तरीही तुमचे मन अपूर्ण इच्छांमध्येच अडकलेले असेल.
वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी संधी घेऊन आला आहे. नवीन खरेदीमुळे तुम्हाला आनंद होईल. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. घर खरेदी, वाहन खरेदी किंवा घराची दुरुस्ती करण्याचा विचार कराल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले व्यवहार अंतिम टप्प्यात येऊ शकतात. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर समस्या वाढू शकतात.
मिथुन – प्रचंड धावपळीचा असा आजचा दिवस आहे. मात्र काम आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक ती मदत मिळेल. आज खर्च नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे, अन्यथा तुमचे बजेट बिघडू शकते. स्वतःची कामे स्वतः करा; इतरांवर अवलंबून राहणे महागात पडू शकते. संततीवर लक्ष ठेवा; गरजेनुसार त्यांना मार्गदर्शन करा. सरकारी कामात घाई करू नका; विचारपूर्वक पुढे जा.
कर्क – आजचा दिवस कसोटीचा असू शकतो, पण तुम्ही त्यावर सहजपणे मात कराल. कामाकडे तुमचे लक्ष अधिक केंद्रित होईल, त्याचबरोबर तुमच्या वरिष्ठांचे महत्त्वही वाढेल. मनात सहकार्याची भावना निर्माण होईल, जी तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करेल. किरकोळ समस्यांमुळे तणाव निर्माण. त्यामुळे काळजी घ्या. तुमच्या जीवनशैलीत आज सकारात्मक बदल दिसून येतील.
सिंह – आत्मविश्वास हेच तुमचे आज सर्वात मोठे शस्त्र आहे. मात्र, मानसिक गोंधळामुळे तुम्हाला काहीसा त्रास होऊ शकतो. नियोजनाने काम केल्यास तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या आरोग्याकडे, विशेषतः साखर आणि रक्तदाब याकडे दुर्लक्ष करू नका. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी खास आहे; त्यांना अपेक्षित निकाल मिळू शकतील.
कन्या – स्वतःच्या आरोग्याकडे आज दुर्लक्ष करू नका. पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. ज्यामुळे नोकरीच्या शोधात व्यत्यय येऊ शकतो. कोणतेही काम घाईघाईने करणे हानिकारक ठरू शकते. तुमची गुपिते कोणालाही सांगू नका, अन्यथा कोणीतरी त्याचा गैरफायदा घेऊ शकते. कामावर लक्ष केंद्रित केल्यास, मार्ग अधिक स्पष्ट होईल.
तुळ – सकाळीच एखादी चांगली बातमी मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. घरातील वातावरण सुखद राहील. जुने वाद मिटतील आणि कामाला गती मिळेल. आपली जबाबदारी वेळेवर पूर्ण करून तुम्ही सर्वांची मने जिंकाल. पदोन्नतीच्या चर्चाही पुढे सरकू शकते
वृश्चिक – संयम हीच आज तुमची खरी ताकद आहे. गोड बोलणे तुमची कोणतीही अडचण दूर करू शकते. भावांसोबत मालमत्तेच्या संदर्भातील चर्चा पुढे जाईल. विद्यार्थ्यांसाठी यशाचे दरवाजे उघडू शकतात, अगदी शिष्यवृत्तीही मिळू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण यामुळे अडचण निर्माण होऊ शकते.
हेही वाचा – स्कूटी, बायको आणि मी…
धनु – आजच्या काळात नात्यांमध्ये पारदर्शकता आवश्यक आहे त्यामुळे आपल्या जोडीदारापासून काहीही लपवणे महागात पडू शकते. याआधी व्यवसायात जर तोटा झाला असेल तर तो भरून निघण्याची आशा आहे. राजकारण किंवा एखाद्या नवीन व्यवसायात नशीब आजमावण्याचा मोह होऊ शकतो. पण तो पुढे ढकलणे योग्य ठरेल. आताच्या व्यवसायात वाढ होईल, प्रलंबित कामे पूर्ण होतील.
मकर – नोकरदार जातांना आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. नवीन पदासाठी किंवा बढतीसाठी तुमच्या नावाची शिफारस होऊ शकते. आज ध्येयांवर लक्ष केंद्रित केल्यास, यश निश्चित आहे. नियोजन करून काम केल्यास, सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. मात्र त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होईल आणि नंतर ती एक मोठी समस्या बनू शकते. दैनंदिन दिनचर्या सुधारल्याने जीवनात संतुलन येईल.
कुंभ – आजचा दिवस तुम्हाला आनंदी राहण्याची अनेक कारणे देईल. तुमच्या आतापर्यंतच्या समस्या सुटतील, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या नोकरीचा शोध आज संपू शकतो. नोकरीच्या संदर्भात एखादी चांगली बातमी मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्नही साकार होऊ शकते. एकंदरीत, आजचा दिवस तुमच्यासाठी केवळ फायद्याचाच ठरेल.
मीन – आज तुम्हाला थोडे सावध राहावे लागेल. खर्च वाढू शकतो, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तुमचे काम तुम्हाला एक नवीन ओळख देईल. संततीची तुमच्याकडून बरीच अपेक्षा असेल. अनोळखी लोकांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेणे हानिकारक ठरू शकते. मात्र, एखादी चांगली बातमी तुमचा दिवस खास करून टाकेल.


