दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 02 जून 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 12 ज्येष्ठ शके 1948; तिथि : द्वितीया 19:00; नक्षत्र : मूळ 22:05;
- योग : साध्य 07:15; करण : वणिज अहोरात्र;
- सूर्य : वृषभ; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:11;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
विख्यात इंग्रजी कादंबरीकार आणि कवी थॉमस हार्डी
टीम अवांतर
विख्यात इंग्रजी कादंबरीकार आणि कवी थॉमस हार्डी यांचा जन्म बॉकहॅम्पटन (डॉर्सेट) येथे 2 जून 1840 रोजी झाला. लहानपणापासून हार्डी यांना वाचनाची आवड होती. त्यांनी तरुणपणीच बायबल, ग्रीक आणि रोमन अभिजात वाङ्मय, शेक्सपिअरच्या शोकांतिका, वॉल्टर स्कॉट आणि आलेक्सांद्र द्यूमा यांच्या कादंबऱ्या यांचे वाचन केले होते. शेक्सपिअरच्या नाटकांचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला. जर्मन तत्ववेत्ता आर्थर शोपेन हौअर यांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर होता. हार्डी यांनी जी काव्य आणि कादंबरी वाङ्मयाची निर्मिती केली, त्यामध्ये त्यांनी मानवी दुःख, क्रूर नियती, मानवी एकाकीपण आणि योगायोग या आशयसूत्रांची पेरणी केल्याचे दिसते.
हार्डी जुलै 1867 मध्ये लंडनहून आपल्या गावी परत आले. तिथे ते ट्रायफिना स्पार्क्स या 16 वर्षीय मुलीच्या प्रेमात पडले. त्यांच्या कितीतरी कादंबऱ्या तसेच कवितांमध्ये ही मुलगी वेगवेगळ्या स्वरूपांत प्रकट झालेली दिसते. तिच्या मृत्यूनंतर हार्डी यांनी ‘थॉट्स ऑफ फिना’ नावाची एक स्वतंत्र कविता त्यांच्या प्रेमसंबंधावर लिहिली.
हेही वाचा – अधिक मासाचं अनोखं वाण… जावयाकडून!
हार्डी यांच्या डेस्परेट् रेमिडिज्, अंडर द ग्रीनवुड ट्री या कादंबऱ्यांना फारशी प्रसिद्धी लाभली नाही, परंतु फार फ्रॉम द मॅडिंग क्राऊड आणि द रिटर्न ऑफ द नेटिव्ह या त्यांच्या दोन कादंबऱ्यांना विशेष लोकप्रियता लाभली. कवी म्हणून हार्डी ओळखले जात असले, तरी त्यांची प्रसिद्धी झाली ती कादंबरीलेखनामुळे. त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्यांमध्ये द मेअर ऑफ कास्टर ब्रिज, टेस ऑफ द डर्बरविलिस आणि ज्यूड द ऑबस्क्यूअर यांचा समावेश होतो.
गंभीर लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या हार्डी यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून एकीकडे स्वतःच्या तीव्र भावना आणि दुसरीकडे विपरीत सामाजिक परिस्थिती यांच्याशी संघर्ष करणारी व्यक्तिचित्रे रंगविली आहेत. तसेच औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यांमुळे ख्रिस्ती समाजजीवन तसेच लोकपरंपरा यांच्या पडझडीचा शोधही त्यांनी घेतला आहे.
हार्डी यांच्या दोन कादंबऱ्या वादग्रस्त ठरल्यानंतर त्यांनी कादंबरीलेखन बंद करून काव्यलेखनाला सुरुवात केली. त्यांनी आपल्या कविता एकत्रित करून वेसेक्स पोएम्स अँड अदरव्हर्सेस हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध केला. हार्डी यांनी 14 कादंबऱ्या, 40 लघुकथा, 900 कविता आणि दोन नाटके लिहिली.
ॲबर्डिन विद्यापीठाची सन्माननीय पदवी, इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज यांच्याकडून ‘ऑर्डर ऑफ मेरिट’, ‘दी रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर’तर्फे सुवर्णपदक तसेच केंब्रिज विद्यापीठाची सन्माननीय डी. लिट्. यासारखे मानसन्मान त्यांना लाभले. 11 जानेवारी 1928 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – आज एका खास पाहुण्यांचे आगमन घरात आनंद आणणारे ठरेल. त्यांच्या आदरातिथ्यात व्यग्र असाल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ नात्यांमध्ये नवीन गोडवा आणेल. जुने गैरसमज हळूहळू दूर होतील. कामे पुढे ढकलण्याची सवय हानिकारक ठरू शकते, म्हणून महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करा. कामाच्या व्यापातून जोडीदारासाठी वेळ काढणे महत्त्वाचे ठरेल.
वृषभ – दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊन गुंतवणूक करू नका. याबाबत जाणकारांचा सल्ला घेणे इष्ट. जोडीदार प्रत्येक परिस्थितीत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. संततीच्या हट्टी स्वभावामुळे तुमची चिंता वाढू शकते. प्रेम आणि समजूतदारपणाने वागून त्याचे मन वळवा. कर्ज घेणे टाळा, कारण यामुळे नंतर आर्थिक दबाव वाढू शकतो.
मिथुन – जुन्या गुंतवणुकीमुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. आर्थिक अडचणींमुळे रखडलेला एखादा प्रकल्प किंवा काम आता गती घेईल. सरकारी बाबींमध्ये निष्काळजीपणा टाळा. सुरक्षित भविष्यासाठी एखाद्या चांगल्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. दीर्घकाळ प्रलंबित सरकारी प्रकरणाचाही आज सोक्षमोक्ष लागण्याची चिन्हे आहेत.
कर्क – आज आर्थिक व्यवहारांमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पुढे जाण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची तीव्र इच्छा मनात ठेवून कामाचा झपाटा वाढवाल. व्यवसाय वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान तसेच उत्पादनाच्या जाहिरातीचा वापर करा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल, पदोन्नतीची शक्यता आहे.
सिंह – गोड शब्द आणि नम्र वागणूक तुम्हाला लोकांमध्ये विशेष ओळख मिळवून देईल. तुमच्या शब्दांमुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल कराल, जुनी देणी फेडण्यात यशस्वीही व्हाल. मात्र, दिखाव्यासाठी केलेला अतिरिक्त खर्च तुमच्या खिशावर भार ठरू शकतो. सरकारी काम पूर्ण करण्यासाठी एखाद्या मित्राची मदत घ्यावी लागू शकते.
कन्या – मालमत्तेचा एखादा जुना व्यवहार अखेर पूर्ण होऊन दिलासा मिळू शकतो. सहलीला जाण्याचा विचार करत असाल, तर निघण्यापूर्वी आई-वडिलांशी चर्चा करा. तुमच्या घाईच्या स्वभावामुळे समस्या निर्माण होऊ शकतात, म्हणून प्रत्येक काम शांत मनाने करा. तसेच, डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका, विशेषत: आर्थिकबाबतीत सतर्क रहा.
तुळ – प्रत्येक निर्णयाचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याबद्दलची चिंता वाढू शकते आणि आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतील. एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, जिथे तुमचा उत्साह आणि प्रामाणिकपणा इतरांना प्रभावित करेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनःशांती मिळेल.
वृश्चिक – सध्याच्या परिस्थितीत संयम आणि धीर धरण्याची गरज आहे. घाईने घेतलेला निर्णय हानिकारक ठरू शकतो. स्वतःसाठी एखादी वस्तू खरेदी करू शकता. मालमत्तेसंबंधी चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्नातील वाढ आनंद घेऊन येईल. मित्रांसोबत एखादी पार्टी किंवा विशेष कार्यक्रमाचे नियोजन करू शकता, मात्र यासाठी मोठा खर्च करावा लागेल.
धनु – आरोग्याबाबत थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पथ्यपाण्याकडे दुर्लक्ष केल्यास समस्या वाढू शकतात. बऱ्याच काळापासून खरेदी करण्याचा प्रयत्न करत असलेली स्थावर मालमत्ता मिळवण्यात यश मिळण्याची चिन्हे आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक ताण कमी होईल, घरात सकारात्मक वातावरण टिकून राहील.
मकर – नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण असू शकत; पण तुम्ही कल्पकतेने काम वेळेत पूर्ण कराल आणि त्याची दखल वरिष्ठांकडून घेतली जाईल. या दरम्यान विरोधकांच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. व्यवसायिकांचे नवीन सौदे होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे नियोजन करत असाल, तर खर्च नियंत्रणात ठेवण्याची खात्री करा. उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखा.
कुंभ – कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला दुखावू शकते, ज्यामुळे संबंधांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र वरिष्ठांचा सल्ला आणि सूचना गांभीर्याने घेणे, फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कौटुंबिक व्यवसायात सुधारणा होईल, ज्यामुळे समाधान आणि आनंद मिळेल.
मीन – दिवस संयम आणि समजूतदारपणा राखायला शिकवेल. एखाद्या दूरच्या नातेवाईकाकडून निराशाजनक बातमी मिळू शकते, अशावेळी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. घाईने घेतलेले निर्णय नुकसानास कारणीभूत ठरू शकतात. कौटुंबिक समस्या त्रासदायक असू शकतात, पण शांत राहून त्यावर तोडगा काढला, तर हळूहळू परिस्थितीत सुधारणा होईल.


