भाग – 50
सुमित्रा आजींनी आराध्याकडे पाहिलं. मनातच त्या म्हणाल्या, “शाब्बास! माझ्या शर्वायची बायको शोभतेस” आणि गालातच हसल्या त्या. तेवढ्यात, दरवाज्याबाहेर एक गाडी थांबल्याचा आवाज आला. आनंदी पटकन उठली. “तेच आले असतील!” ती म्हणाली. सगळ्यांच्या नजरा मुख्य दाराकडे वळल्या. आनंदीने पुढे होऊन दरवाजा उघडला, आणि निशा व अन्वी आत आल्या.
निशा हातात एक छोटं बास्केट घेऊन हसत पुढे आली, “कशा आहात आनंदी? बऱ्याच दिवसांनी येणं झालं.” आनंदी हसून म्हणाली, “या, या. फार दिवसांनी भेट झाली. आराध्या, अन्वीला घेऊन आत जा.” अन्वीने थोडा रुक्ष चेहरा करत घरात पाऊल टाकलं, तिच्या डोळ्यांनी वाड्याच निरीक्षण सुरू केलं होतं; वाड्याच्या भव्यतेनी डोळे दिपलेच होते तिचे.
आराध्या तिच्यापर्यंत गेली, चेहऱ्यावर सौम्य हसू ठेवून म्हणाली,”वेलकम अन्वी.” अन्वीने हलकीच मान हलवली अन् नाक उडवत म्हणाली,”आहेसच का तू इथे?” अन्वीने आराध्याला टाळलं. वाड्याच्या प्रशस्त व्हरांड्यातून आत जाताना तिने मुद्दामच आराध्याकडे दुर्लक्ष केलं.
आराध्या काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिली. मनात एक क्षणभर वेदनेची कळ उमटली, पण चेहऱ्यावर मात्र काहीच दर्शवू दिल नाही तिने. तिच्या मनात मात्र विचारांचं वादळ उसळलं, “पूर्वीही कधी माझं हिच्याशी काही वाकडं नव्हतं. तरीही ही सतत माझ्या विरोधात का आहे? शर्वाय करता आली आहे पण त्यांच्याशी असलेलं माझं नातं तिला कळेल तेव्हा. ह्या माय लेकींचा अजून काही डाव तर नाही आहे ना?”
आपल्या विचारांना काबू करत असताना आजींनी आपल्याला बोलवलं आहे हे तिला आठवलं. आजींनी तिला देवघरात बोलावलं होतं, म्हणून ती तिथे गेली.
निशा आणि अन्वी अंगणातून आत आल्यानंतर, माधव त्यांना समोरून येताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर एक नेहमीचं बनावटी, पण व्यवस्थित सजवलेलं हास्य होतं. “या, या, आमच्या वाड्यात आपलं स्वागत असो,” अन्वीच्या डोळ्यात थेट बघत तो म्हणाला.
हेही वाचा – माधवसोबतची ती अज्ञात व्यक्ती कोण?
“काय ग अन्वी, शहरामधला झगमगाट सोडून इथे येणं जमलं का, बरं वाटतंय?” त्याच्या आवाजात एक गूढपणा होता. निशा सौजन्याने हसत म्हणाली, “माधवजी, वाडा जरी जुना असला, तरी स्वागत नवीन आणि आपुलकीचं आहे हे दिसतंय. आनंदींचं निमंत्रण म्हणजे आपुलकीचं बंधन.”
अन्वीने फक्त मान हलवली. तिची नजर मात्र आता माधवच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती – एकीकडे उत्सुकता, दुसरीकडे अस्वस्थता. माधवने पुढे होऊन दोघींना आतल्या बैठकीत नेलं. “आपण इथेच बसूया थोडा वेळ. आनंदी आणि दिवाकर येतीलच,” म्हणत त्याने सोफ्याकडे इशारा केला. अन्वी सावधपणे बसली. तिचं लक्ष अजूनही आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूवर, भिंतींवर टांगलेल्या चित्रांवर आणि गूढ वातावरणावर होतं.
निशा आणि अन्वी वाड्यात शिरल्या तेव्हा सभोवतलची भव्य सजावट, अंगणात फुलांची सजावट, आणि हवेत दरवळणारा चंदनाचा गंध, सर्व काही राजेशाही वाटत होतं. पण त्यांचं पाऊल पडलं होतं एका खेळाच्या पटावर – जिथे प्रत्येकाची आपल्यावर नजर आहे, आणि आपल्या प्रत्येक हासचालीचा अर्थ लावला जातोय असच काहीस वाटल त्यांना. निशा थोडीशी आत्मविश्वासाने आणि ताठ होत सोफ्यावर बसली. अन्वी तिच्याबरोबर होती, पण नजर सतत घरभर भिरभिरत होती. तिचं लक्ष एकाच गोष्टीकडे होतं – आराध्या कुठे आहे?
“आलेच म्हणत,” आनंदी एक औपचारिक हास्य करत बैठकीतून बाहेर आली. तिचा स्वर सौम्य होता, पण प्रत्येक शब्दामधून एक अस्वस्थ भावना दिसून येत होती. “मी दिवाकरना बोलवते,” असं म्हणत ती आत वळली. अन्वीने नजर चोरून संपूर्ण हॉल स्कॅन केला.
“आई, हे घर जरा खूपच क्लासिक आहे, पण फार जुना वास येतो,” तिनं कुजबुजत निशाच्या कानात म्हटलं. निशा हसली. “हा वास नाही अन्वी, ही परंपरा आहे. आणि आपण इथं पाहुणे म्हणून आलोय, लक्षात ठेव.” तेवढ्यात, आतून दिवाकर बाहेर आला. हसतमुख चेहऱ्याने, त्यांनी निशाच्या “नमस्कार” ला उलट नमस्कार केला आणि अन्वीकडे वळत म्हणाले, “हाय अन्वी, कशी आहेस?”
अन्वीने औपचारिक हसत, फक्त मान हलवली.
तेवढ्यात मागून हलक्याच पावलांनी आराध्या हॉलमध्ये आली. तिची उपस्थिती जाणवताच अन्वीचा चेहरा बदलला. एक विचित्र शांतता दोघींनाही जाणवली. कोणी काही बोललं नाही, पण वातावरणात एक ‘अघोषित संघर्ष’ स्पष्टपणे दिसत होता.
आराध्या, आनंदी सर्व पाहुण्यांचं स्वागत करत असतानाच नकळत आजींचा आवाज तिच्या कानावर पडला होता, “आराध्या, थोडा वेळ देवखोलीत येशील का?” ती शांतपणे उठली आणि वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या छोट्याशा पण पवित्र अशा देवखोलीकडे गेली….
हेही वाचा – शर्वाय आणि आराध्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात…
दार थोडंसं उघडंच होतं, आतून दिव्यांचा मंद प्रकाश, धूपाचा सुगंध आणि सुमित्रा आजींचा हळुवार आवाजातील जप ऐकू येत होता. आराध्या अलगद पावलांनी आत गेली. थोडीशी गोंधळून जाऊन तिने विचारलं “आत येऊ आजी?”
सुमित्रा आजी उठल्या आणि आराध्याच्या कपाळावर गंध लावत म्हणाल्या, “कधी कधी आपल्या मनात शंका येते, नात्यांचं ओझं वाटत तर कधी तेच आशीर्वाद बनतात. पण तुझ्या नशिबात जे आहे, त्यातून तुझं बळच वाढणार आहे.”
आराध्याने डोकं किंचित झुकवत आजींना विचारलं, “आज अचानक असं का बोलावलं?”
“कारण सध्या तुझ्यावर कोणाचंच लक्ष नाहीये, सगळेजण निशा आणि अन्वी मध्ये गुंतले आहेत.” म्हणत आजींनी तिला आपल्या खोलीत नेलं. आपल्या जुनाट कपाटाच्या एका कोपऱ्यात असलेल्या छोट्या कप्प्यातून ठेवलेली आत ठेवलेली एक छोटी जुनाट लाकडी पेटी काढली, ती उघडली, आत एक अत्यंत जुना कागद होता.
“हे बघ, ही ह्या वंशाच्या मूळ खुणांपैकी एक आहे. मी वर्षानुवर्षे सांभाळत आलेय. तुझ्यावर विश्वास आहे, म्हणून देत्येय, पण योग्य वेळेपर्यंत याचा उपयोग करू नकोस.” हे पाहून आराध्या थक्क झाली. “हे म्हणजे…?” आजीनं तिच्या हातात ते दिलं आणि म्हणाल्या, “माधवचा खरा चेहरा आणि वंशाची खरी ओळख, दोन्हींचा धागा इथेच गुंतलेला आहे. तुलाही हे जबाबदारीने सांभाळायचं आहे.”
आराध्याचं मन थरथरलं. ती हलकेच म्हणाली, “मी वचन देते, आजी.” त्या दोघींच्या नजरेत त्याक्षणी समज आणि आजूबाडूला गंभीर शांतता पसरली होती. बाहेर आता पावसाचा शिडकावा सुरू झाला होता. वाड्यातल्या जुन्या कथांचा नवा अध्याय उलगडत होता…
आजींनी दिलेली ती जुनी, लाकडी पेटी–जिच्यात एका शतकापासूनचा वारसा दडलेला होता – ती आराध्याने अलगद उचलली. आजींच्या नजरेत अजूनही काळजी होती, पण त्याहून अधिक विश्वास. “सावध राहा, पोरी,” आजी फक्त एवढंच म्हणाल्या.
आराध्याने मान हलवली, आणि त्या गूढ पेटीकडे पाहत ती बाहेर पडली. पावसामुळे सुटलेला मंद वारा अंगाला जाणवत होता, पण आता तिच्यात एक वेगळंच बळ संचारलं होतं. आता तिचं मन अधिक स्थिर, पण काहीसं ओझं घेऊन पुढे जात होतं.
ती सरळ शर्वायच्या खोलीकडे वळली. जिन्यावरून जाताना अन्वी आणि माधवच्या हसण्याचा आवाज तिला स्पष्ट ऐकू आला. क्षणभर तिचं पाऊल थबकलं. पण मग, काहीच न बोलता ती चालत राहिली. खोलीत पोहोचताच, आराध्याने दरवाजा लावून घेतला. ती पेटी अजूनही छातीशी घट्ट धरलेली होती. तिनं आपल्या बॅगेची चेन उघडली आणि फार विचार न करता ती पेटी आत ठेवली. आणि वरून आपले कपडे सरकवले. जणू काही क्षणभर तरी ती हे सर्व विसरून जायचं असं ठरवत होती, पण ती आता तिचं सगळ्यात मोठं शस्त्र बनणार होती.
आराध्या स्वतःशीच म्हणाली “सत्य समोर आणावंच लागणार, पण योग्य वेळेला.”
तिने पुन्हा एकदा बॅग बंद केली. आणि खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. खाली बागेत माधव आणि अन्वी काहीतरी बोलत हसत होते. आता आराध्या तयार होती. प्रत्येक हास्यामागे लपलेला खरा हेतू शोधण्यासाठी. सत्य आणि सावली दोन्ही एकाच वाड्याच्या भिंतीत दडल्या होत्या आणि आराध्या त्या सत्याला उजेडात आणणार होती.
पुन्हा शर्वायच्या खोलीत जाता येईल न येईल या विचाराने तिने ती बॅग उचलून आजींच्या खोलीत आणून कपाटात ठेवली. आजींनी सांगितल्याप्रमाणे आराध्या देवघरात फुलांची आरास करत होती. तिचं मन शांत होतं पण सगळ्या जाणिवा जाग्या झाल्या होत्या. ती सावध होती,प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून होती.
तेवढ्यात मागून आवाज आला…
“किती चिपकू आहेस गं तू आराध्या!” माधवचा टोकदार आवाज हवेत उमटला. आराध्या थबकली. तिच्या हातातलं एक फूल खाली पडलं. पण तिनं मागे वळून पाहिलं नाही. “शर्वाय जिथं, तिथं ही. चिकटलेली असते, जणू काही त्याच्या सावलीपेक्षाही जवळची!”
माधव आता मुद्दामच उगाचच मोठ्याने बोलत होता, कारण त्याच्यासोबत तिथे अन्वीही उभी होती. अन्वी काहीच बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान दिसत होतं. आराध्या शांतपणे उभी राहिली. एक, दोन क्षण गेले…
मग ती हळूच वळली. तिच्या डोळ्यांमधून आग बरसत होती.


