अलीकडेच अतरंगी डॉक्टरवरून चर्चा सुरू होती. त्याच कडीतला एक किस्सा… इथं एक डॉक्टर महाशय पहाटे 4 वाजता ओपीडी उघडायचे आणि सकाळी 10 वाजेपर्यंतच पेशंट्स बघायचे… कधी कधी पेशंट्स पहाटे एकतास आधी म्हणजे 3 वाजल्यापासून त्यांची वाट बघत…
डॉक्टरांनी शटर उघडलं की, पहिल्या पेशंटच्या एका हातात 1 आकडा टाकलेला कागद आणि दुसऱ्या हातात पुढचे आकडे टाकलेले कागदी तुकडे सोपवून आत जाऊन दुधी बल्बच्या उजेडात खुर्चीवर जाऊन बसायचे…
इकडे पहिला पेशंट पुढच्याकडं बाकीचे तुकडे सोपवायचा अन् बाकी लोकं आपसात क्रमवार ते वाटून घ्यायचे… तोपर्यंत इकडं डॉक्टर साहेबांनी भिंतभर लावलेल्या साईबाबांच्या प्रतिमेसमोर दहा-बारा अगरबत्त्या पेटवत पूजा केलेली असायची…
हेही वाचा – आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!
पेशंट आत जाऊन “अमुक त्रास आहे…”, “तमुक होतंय…” सांगायचा, तोपर्यंत आत मस्तपैकी धूर झालेला असायचा… पेशंटचं सगळं सांगून झालं की, डॉक्टर आदल्या दिवशीच्या अगरबत्तींची मुठभर राख त्याच्या कपाळावर फासायचे आणि पुढ्यातल्या चौकोनी कागदावर ड्रॉवरमधल्या गोळ्या अंदाजे टाकून पुडी बांधून द्यायचे!
एवढ्या पहाटे आलोय… डॅाक्टर इतक्या लवकर भेटलेत… डॅाक्टरांचा हात लागला… औषधंही मिळाली… मग आता मी बरा होणारच! हा विश्वास घेऊन, पैसे देत पेशंट औषधांची पुडी घेऊन रवाना व्हायचा आणि त्यानंतर पुढचा पेशंट यायचा…
…आणि हे वर्षानुवर्षे चाललं!
हे अजिबात कपोलकल्पित नाही. कोविडपर्यंत अस्तित्वात होतं… नंतर प्रोटोकॅाल, पोलीस, गाइडलाइन्स… आणि त्यात डॉक्टरांचं वय झाल्यानं बंद झालं…
हेही वाचा – लिओनिद रोगोजोव्ह… स्वत:वरच ऑपरेशन करणारा डॉक्टर
काय म्हणताय? काहीही? अजिबात नाही… याला इंग्रजीत perception management म्हणतात… आपल्या पद्धतीनं ठराविक वेळा बदलायच्या… काम तेच करायचं, पद्धत बदलायची… सकारात्मक प्रतिमा ठेवायची… भावनांना हात घालायचा… जाणीवपूर्वक वातावरणनिर्मिती करायची… बाकी रामभरोसे!!
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
https://whatsapp.com/channel/0029VbAtufJ65yDINAO9Ad2H
या लिंकला क्लिक करून WhatsApp Channel जॉइन करा.


