पोहे हा प्रकार जवळपास सर्वांच्याच आवडीचा आहे! पोह्यांचे विविध प्रकार महाराष्ट्रात प्रचलित आहेत. अगदी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम तर कांदे पोह्यांशिवाय अपूर्णच आहे! हे समीकरण ठरलेलेच… बटाटे पोहे, मटकीची उसळ पोहे, चण्याचा रस्सा पोहे, दडपे पोहे, नारळाच्या दुधातील पोहे, कोळाते पोहे, चहा पोहे, दूध पोहे, तिखट-मिठाचे पोहे… याशिवाय गोपाळकाला, दिवाळीतील पोह्यांचा चिवडा असे सर्व पदार्थ जाड किंवा पातळ पोह्यांशिवाय अधुरेच नाही का? अशा या पोह्यांचा आज एक नवीन आणि टेस्टी प्रकार म्हणजेचं पोह्यांचे पराठे कसे करतात ते आपण पाहुयात.
साहित्य
- पोहे – दीड वाटी
- बटाटे – 3
- हिरवी मिरची – 2
- कोथिंबीर – चिरलेली मूठभर
- आलं – एक इंच तुकडा
- धणे पावडर – एक ते दीड टीस्पून
- जिरे पावडर – एक ते दीड टीस्पून
- तीळ – 2 टीस्पून
- ओवा – 2 टीस्पून
- लाल चिली फ्लेक्स – 2 चमचे
- हळद – अर्धा चमचा
- हिंग – चिमूटभर
- मीठ – चवीनुसार
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट लिटिल मिलेट्स कटलेट्स!
कृती
- प्रथम पोहे चाळणीने चाळून घ्यावे म्हणजे त्यातील कचरा निघून जाईल.
- चाळलेल्या पोह्यांचे मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घ्यावे.
- बटाटे सोलून त्याच्या बारीक फोडी कराव्यात आणि त्यामध्ये दोन मिरच्या आणि एक इंच आलं घालून त्याची पेस्ट करून घ्यावी.
- नंतर या बटाट्याच्या पेस्टमध्ये पोह्याचे पीठ मिक्स करावे.
- पोह्याचे पीठ मिक्स करण्याआधी त्यात धणे- जिरे पावडर, तीळ, लाल चिली फ्लेक्स, हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ तसेच मूठभर कोथिंबीर घालावी.
- बटाट्याची पेस्ट आणि पोह्याचे पीठ हे सर्व मिश्रण तेलाचा हात लावून छान मऊसर मळून घ्यावे आणि दहा मिनिटे मुरू द्यावे.
- दहा मिनिटांनंतर या पीठाला परत एकदा छान मळून मऊ करावे आणि तवा तापवून चवदार असे बटाटे-पोह्याचे पराठे करावेत.
- हिरव्या मिरचीच्या दह्यातील चटणीसोबत किंवा दही बुंदी रायत्यासोबत हे पराठी सर्व्ह करावेत.
हेही वाचा – Recipe : तुपातील तुरीचे दाणे आणि वाणीचा हुरडा!
टीप्स
- पोह्याचे पराठे करताना वेळोवेळी लागेल तसा पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घेतले तर हे पराठे छान मऊ होतात व पोळीसारखे टम्म फुगतात देखील.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


