परिचितांपैकी एकाने त्यांचं यश साजरं करण्यासाठी ग्रँड पार्टी दिली होती. सर्व यजमानांच्या प्रतिष्ठेला साजेसेच होते. आम्ही पण निमंत्रितांपैकी एक होतो. परफ्युम्सचा घमघमाट, ऊंची कपड्यांची सळसळ, रंगवलेल्या ओठांच्या कमानी विस्कटणार नाहीत याची कसरत करत करत चालेलं खानपान! अदबशीर बोलणं नखरेल वागणं…!
असं म्हणतात की, हास्यमुख ठेवायला चेहऱ्यावरच्या कमीत कमी स्नायूंचा उपयोग होतो… खोटं आहे ते! थोड्याच वेळात माझी जिवणी आणि चेहऱ्यावरचे यच्ययावत स्नायू दुखायला लागले. पुरातन काळी भाल्याच्या टोकावर शिकार रोवून ती फिरवली जायची, त्याप्रमाणे टूथपिकला टोचलेला, पेपर नॅपकीनने लपेटलेला कोणतातरी एक पदार्थ घेऊन मी हळूहळू हॉलच्या सुरक्षित कोपऱ्याकडे सरकायला लागले.
इतक्यात माझं लक्ष दोन वयस्क स्त्रियांकडे गेलं. प्रत्येक घोळक्यात जाऊन त्या प्रत्येकाला काहीतरी विचारात होत्या! ऐकणारे ऐकत होते, स्माइल देत होते, मोठ्या स्मार्टली काही उत्तर देत होते… पुन्हा आपल्यातच मश्गुल होऊन जात होते.
हेही वाचा – असेच कानावर पडलेले संवाद…
दोघींनाही बहुतेक गुडघ्याचा विकार होता, त्यांच्या चालीवरून ते कळून येत होतं. त्यातल्या एकीच्या घशाला बोलून बोलून इतकी कोरड पडली होती की, ती मधे मधे फिरवले जाणारे प्लास्टिकचे पाण्याचे बंद पेले एकावर एक रिचवत होती. उत्सुकतेने मी हळूहळू त्यांच्या दिशेने मोहरा वळवला. इतक्यात कोणीतरी त्यांना जाणवून दिलं की, तिथे माइकची सोय आहे.
त्यातल्या एकीने माइकवरून सांगितलं, “फलाण्या नंबरची, अमुक मेकची पांढरी गाडी… ज्यांची असेल त्यांनी ती हलवावी…” ती विशिष्ट गाडी कोणीतरी त्यांच्या गाडीसमोर पार्क केली होती. त्यांना घरी जायचं होतं, पण गाडी बाहेर काढता येत नव्हती. त्यांनी तीनदा सांगितलं, पण कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्या दोघींनी पुन्हा प्रत्येकाला विचारायची मोहीम काढली. आता तर दोघीही पेल्यावर पेले पाणी पीत होत्या.
मला राहवेना, मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हटलं, “मॅडम, तुम्ही कशाला फिरता? तुम्ही बसा… तुमच्या ड्रायव्हरला विचारायला सांगा!”
त्या म्हणाल्या, “अहो, आधी ड्रायव्हरलाच पाठवलं होतं, त्याला तर कोणीच दाद दिली नाही; आम्ही पण अर्धा एक तास फिरतोय… अजून गाडीचा मालक सापडला नाही! गाडी लावून कुठे बाहेर गेला आहे की काय, कोण जाणे!”
त्यांचं म्हणणं खरं होतं. या वयस्क, शारीरिक पीडा असणाऱ्या स्त्रियांची कोणी दखल घेत नव्हतं… तर त्या सामान्य ड्रायव्हरकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नसणार!
इतक्यात माझा मुलगा आला. आम्हाला त्या हॉटेलसमोर सोडून तो पार्किंग शोधत गेला होता… तो आत्ता आला होता. त्याला मी सगळी घटना सांगितली. त्याने त्या दोघींना सांगितलं, “आंटी, तुम्ही दमल्या आहात… तुमच्या गाडीत जाऊन बसा… पंधरा मिनिटांच्या आत तुमची गाडी बाहेर निघेल.”
हेही वाचा – ट्युबलाइट… एलसी
दोघींचा आणि माझाही त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. इतक्या वेळात कोणीही त्या विशिष्ट गाडीची मालकी स्वीकारली नव्हती… तर आता हा कोणता अल्लाउद्दीनचा दिवा घासणार होता! त्या दोघी इतक्या दमल्या होत्या की, हताशपणे अन् थोड्या अविश्वासानेच त्या बाहेर गेल्या.
माझ्या मुलाने पाच एक मिनिटं वाट पाहिली, हातात माइक घेतला आणि म्हणाला, “फलाण्या नंबरची, अमुक मेकची पांढरी गाडी ट्रकने ठोकली आहे. ट्रक ड्रायव्हरला बाहेर थांबवून ठेवले आहे… ज्यांची ती गाडी…” त्याचं वाक्य संपायच्या आत तिथे एकच हलकल्लोळ माजला. हातातला घास प्लेटमध्ये टाकून चार-पाच जण, दरवाज्याकडे वळले. माझ्या समोरच्या टेबलावर बेफिकीरपणे, ‘आपण त्या गावचेच नाही’ असा आविर्भाव आणून स्वादिष्ट पदार्थ खात बसलेला चाळीशीतला माणूस तर, ताडकन उठला आणि बाहेर धावला…
मी चकित झाले होते! हीच का ती सगळी माणसं जी हास्यविनोद करीत निवांत बसली होती! हाडामासाच्या माणसांना होणाऱ्या त्रासाची ज्यांना पर्वा नव्हती… एक निर्जीव पत्र्याची कार ठोकल्यावर त्यांचे प्राण कंठाशी आले होते… बरोबर आहे, त्या गाडीची किंमत लाखांत होती! आणि माणसाची किंमत…
खरोखरच पंधरा मिनिटांच्या आत, त्या दोघींची अडकलेली गाडी बाहेर निघाली. मी भुवया उंचावून प्रश्नार्थक नजरेने मुलाकडे पाहिलं… मिश्किलपणे हसून तो कुजबुजला, “जब सीधी ऊंगली से घी नहीं निकलता…”
खुसूखुसू हसतच आम्ही ते टूथपिकला टोचलेले पदार्थ विजय चिन्हासारखे मिरवण्यासाठी वळलो… आता माझ्या चेहऱ्याचे स्नायू दुखत नव्हते…


