सुरेखा मोंडकर
ट्युबलाइट नावाचा एक सिनेमा होता म्हणे. तो जबरदस्त आपटून त्याचा चक्काचूर झाला, असं ऐकून आहे. मी त्या सिनेमाचं रसग्रहण लिहित नाहीये. (वैधानिक सूचना).
आमच्या लहानपणी ट्युबलाइट, साधा बल्ब आणि दूधी बल्ब इतकंच होतं. आता घरात विविध दिव्यांची विलक्षण नाविन्यपूर्ण, कल्पक आतषबाजी असते. आजच्या मुलांना ट्युबलाइट म्हणजे काय हे कदाचित माहिती पण नसेल. (आता एलईडी आहे.) तेव्हा ट्युबलाइट हे केवळ अंधार दूर करणारं साधन नव्हतं तर, त्याला एक गहन अर्थ होता. ज्याच्या डोक्यात उशिरा प्रकाश पडतो, त्याला ‘सन्मानाने’ ट्युबलाइट म्हटलं जायचं. त्यालाच ‘प्रेमाने’ एलसी (LC) म्हणजेच लेट करंट म्हटलं जायचं.
माझ्या बाबतीत हे ट्यूबलाइट प्रकरण सतत घडत असतं…
इथे साताऱ्यातील नायगावच्या घरी मुंबईचे काही पाहुणे आम्हाला भेटायला आले होते. गप्पा मारताना मी म्हणाले, “इथे डीमार्टमध्ये गेल्यावर पंचवीस-तीस हजारांची खरेदी होते. गाडीची डिकी भरून जाते!”
हेही वाचा – संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज
पाहुण्याबाई चटकन म्हणाल्या, “आम्ही पण डीमार्टमध्ये गाडी घेऊनच जातो आणि तीस-चाळीस हजारांची खरेदी करतो!”
हा संवाद काहीतरी वेगळा होतोय, हे मला कळलं पण वळलं नाही. मी विषय बदलला. पण निराळाच वास येणारं, हे वाक्य माझ्या मनात घोळत राहिलं. एकदम कठोर प्रतिक्रिया दिल्याप्रमाणे का बरं बोलल्या त्या बाई?
खूप दिवसांनी माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी जे वाक्य बोलले होते, त्यात अहंमन्यता, तोरा, मिजास, श्रीमंतीचं प्रदर्शन, अहंकार… असं बरंच काही काही व्यक्त होत होतं. त्यामुळे एखाद्याच्या आत्मभानाला भळभळणारी जखम होऊ शकत होती. ज्यांच्या तळहातावरच भावनाताई विराजमान झालेल्या आहेत, त्या दुखावणं तर, अगदी नैसर्गिक होतं!
मी ठाण्याला राहात असताना घरी काहीच साठवणूक करीत नव्हते. जेवढ्यास तेवढ्याच वस्तू आणायचे. खाली सगळी दुकानं होती आणि तिथे चांगल्या दर्जाच्या वस्तू विकत मिळत होत्या. मी रोज संध्याकाळी walk ला जायचेच, तेव्हा गरजेच्या वस्तू विकत घ्यायचे. पण इथे राहायला आल्यावर जवळपास दुकान नाही. सार्वजनिक वाहन व्यवस्था नाही. जी दुकानं आहेत, त्यात सुद्धा हव्या त्या वस्तू मिळतील, याची खात्री नाही. डीमार्ट आहे वाईला. एवढं पेट्रोल खर्च करून जायचं तर, आम्ही अव्वाच्या सव्वा वस्तू गरज नसताना विकत घेत होतो. म्हणजे हार्पिकच्या सहा बाटल्या, चहा पावडर एक दोन किलो, अंगाचे साबण डझनभर! असं बरंच काही… ही भारंभार खरेदी सहज काही हजारांची एकदम व्हायची! घरी आल्यावर त्याची नीट व्यवस्था लावणं, हे सगळं मला कंटाळवाणं आणि अनावश्यक वाटत होतं. पण इलाज नव्हता.
हेही वाचा – …असाही विचार करता येतो!
हे सगळं त्यावेळी त्या पाहुणीला सांगणं मला सुचलंच नाही. कारण माझ्या वाक्याचा अर्थ काय होऊ शकतो, हेच माझ्या लक्षात आलं नव्हतं. वाटत होता खरा माझ्या वाक्यात दंभ! पैशाची घमेंड! संधी गेली ती गेलीच. पुन्हा ते आमच्याकडे नाही आले. असल्या चमकोगिरी करणाऱ्या, बढाईखोर बाईकडे कोण कशाला पुन्हा येईल! ट्युबलाइट असल्याचा हा एक तोटा आहे आणि आपल्याबद्दल गैरसमज होण्याची खूप मोठी शक्यता!


