भाग – 11
अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे
उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
जशी ओली हूर हूर तरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर
सरीवर सर… सरीवर सर…
संदीपचं गाणं सुरू होतं… पावसाच्या सुया नुसत्या मी मी म्हणून समोर गाडीच्या काचेवर आदळत होत्या… आणि श्री जुईलीचा हात गिअरवर ठेवून, आपला हात तिच्या हातावर ठेवून अटल सेतूवरून जात होता… जुईलीचा आनंद त्याच्या एकूण असण्यावरूनच जाणवत होता. ती नेहमीची गंभीर, विचारात असणारी जुईली आज जणू फुलपाखरू झाली होती… आज अगदी मनमोकळेपणाने बोलत होती, हसत होती…
“या सेतूवर अगदी आकाशातून उडत जातोय, असं वाटतं नाही रे?”
“होय ना, आणि हा असा पाऊस सुरू असताना, तुझा हात हातात असताना, तू अशी सोबत असताना मला अटल सेतूच कशाला, अगदी ओहोळाच्या बांधावरून जरी चालायला सांगितलं ना, तरी मी हवेतच उडत उडत चाललेला असेन बघ.”
“ए! अति हा अति… म्हणे उडत उडत चाललेला असेन. ए, तुला आठवतेय का आपली पहिली भेट? त्या दिवशी मी, तू भेटल्यापासून स्माइल घेऊन घरी गेलेले वेड्यासारखी. त्यानंतर तू जेव्हा जेव्हा भेटलास तेव्हा हेच अनुभवलं मी! माझ्या चेहऱ्यावर स्माइल… तू असलास ना की, माझं हे असं होतं. कायम रहा बघू माझ्याजवळ… अस्साच!”
“हं… बाईसाहेब… तुम्ही हसत रहा… हसत रहा… आम्ही सोबत आहोतच!”
“अरे, श्री तुझं वेड म्हणजे एकेक भलतंच असतंय बघ. या अटल सेतूवरून पणजीत येताना आणि पणजीतून निघताना तुला जायचंच असतंय म्हणून तू एवढा मोठा वळसा घेतोस, येता-जाता. किती ट्रॅफिक बघ ना आता खाली लागणार आपल्याला… माझा स्टॉप मात्र चुकवायचा नाहीस हा तू खाली नदीकिनारचा… मला पाच मिनिटं का होईना तिथे बसायचंय. मग म्हणू नकोस उशीर होतोय! मागच्या वेळी फक्त दोन मिनिटांसाठी थांबलेलास… कुजक्या.”
हेही वाचा – किती फाटतो जीव सगळ्यात यात…
“अगं नाही होणारं उशीर… आणि झाला तरी आज आपण सांगू काका-काकूंना! काही नको काळजी करू तू. आता सांग बघू कुठे जायचंय? आपला नेहमीचा स्पॉट की, अजून कुठे जाऊयात? आधी पोटाला काहीतरी घाल… नाहीतर पार्सल तरी घेऊयात आणि आपल्या स्पॉटवर जाऊन खाऊयात… काय करूयात सांग?”
“पार्सल घेऊयात. स्पॉटवर जाऊन खाऊयात. नाहीतर मग काळोख होईल तिथे. वाटेत ते बर्गर हाऊस मिळेल, तिथे घेते तुला काहीतरी. तू नको उतरूस. तुला ठरवायलाच अर्धा तास लागेल काय घ्यायचं ते! मी जाऊन येते पटकन.”
“बरं बाई… जा तूच. मी थांबतो गाडीत. काय रस्ते यार गोव्यात पोहोचेपर्यंत… नको झालंय ड्राइव्ह करून. मी थांबतोच गाडीत. मोडून आलंय अंग. मला मसाज दे हा चांगला खांद्याला…”
“ओ ग्गं माझं गुंडूलं… दमलं माझं गुंडूलं”
“हं, गप्प! खरंच यार… पार वाट लागलीय या रस्त्यांची… आणि हे गं काय पर्वरीत! मला सगळं नवीनच वाटलं गं… आधीची नाही ना गं राहिली ही पर्वरी, अनोळखी एकदम. खूप वर्षांनी बघितल्यासारखी! एवढा बदल होतो काहीच महिन्यांत?”
“अरे मग काय… मी बसने येते, तेव्हा अरे पाठ, कंबर एक होते. म्हणून मी टाळते इकडे यायचं. पण ड्युटी लागली की यावंच लागतं ना रे…”
“किती दिवस आता तुझं हे येणं जाणं मग? टीचर असतात का नेहमीच?”
“अरे, हे कोण जाणे किती दिवस चालणार आहे? रोज नवीन काही ना काही असतंय. बदल आणि बदल… आज हे बदल, उद्या ते बदल. यातच जातायत दिवस. अरे पुढे बघ हां… ते बर्गर हाऊस लागेल. थांबव तिथे गाडी…”
“हं… ते ना? ग्रीन लाइटवालं?”
“हो, हो, तेच. थांब बाजूला.”
जुईलीने बाहेर बघितलं तर, पाऊस आता पूर्ण थांबला होता. “बरं झालं बाई, पाऊस थांबला. छत्री न्यायला नको.” जुईली स्वतःलाच म्हणाली.
श्रीने गाडी बाजूला घेऊन थांबवली. जुईली दार उघडलं आणि “आलेच हां, थांब…” म्हणून गेली.
“जल्दी आओ…” – श्री.
“आलेच्च…” हसत हसत जुईली म्हणाली आणि गेली सुद्धा. श्रीने मान हलविली, दोन्ही हातांची बोटं एकमेकांत गुंफली आणि मस्त आळोखेपिळोखे देऊन त्याने स्टेअरिंगवर डोकं टेकवलं.
गाडीच्या खिडकीवरची टकटक ऐकून श्रीला जागं आली. जुईली बाहेर त्याला तोंड वेडावून हातातलं पार्सल दाखवत होती. त्याने गाडी अनलॉक केली. दार उघडून जुईली आत बसली… “तुम्हारा फेव्हरेट फेव्हरेट… डबल क्रिस्पी चिकन बर्गर… आणि माझं व्हेज मखनी बर्स्ट… आणि सोबत चोको लाव्हा पण आणलाय.”
“आहाहा… वास वास वास… घमघमतोय नुसता… झालं ना? अजून काही घ्यायचंय का?”
“तुला काही हवंय का?
“तू!”
“हां, खा मला.”
“हं… हं… हं… बघ हा काय सांगतेयस ते. नंतर नको म्हणायचं नाही.”
“गप्प! पुरे तुझं! चल आता निघुयात… ”
“हं… बघ, आताच मुकरलीस अपने जुबान से…”
“लई तू… चल आता. मार हवाय तुला.”
“हाय रे गालिब! म्हणून बिचारा शेरोशायरी करायला लागला… या मेहबूबा अशा मारायच्या, चेचायच्या गोष्टी करतात बेरेहेम… प्यार में ये हाल होते हैं!”
“किती किती नौटंकी नुसती!”
बोलता बोलता श्रीने गाडी पुन्हा रस्त्यावर घेतली. आता गाडी तालीगाव पठाराच्या दिशेने त्यांच्या आवडीच्या स्पॉटवर चालली होती… त्यांच्या आवडीच्या समुद्रावर… सरळसोट रस्त्यावरून गाडी डावीकडे वळली. पुढे वळणं घेत उताराला लागली आणि जरा खाली येताच समोर दिसू लागला मावळत्या सूर्याच्या सोन्याने चमचमणारा विस्तीर्ण सागर… दोघांचेही डोळे ते दृश्य बघून दिपून गेले…
श्रीने उतारावरच गाडी काही क्षण थांबवली…
“काय गं हे जुईली! कसलं भारी दिसतंय ना… बघ तरी काय सीन आहे यार… ”
“हो ना रे… डोळ्यांत साठवून घ्यावा…”
श्रीने पटकन मोबाइलवर समोरचं दृश्य त्यात टिपून घेतलं आणि पुन्हा गाडी सुरू केली. समोर उजवीकडे आणि डावीकडे असे दोन रस्ते जाऊन इंग्रजी T आकाराचा रस्ता होता. डावीकडचा इंडिकेटर देऊन श्रीने गाडी डावीकडे वळवली. काहीशी पुढे गेल्यावर डांबरी रस्ता संपला. तिथेच त्याने गाडी थांबवली. दोघंही गाडीतून उतरली.
हेही वाचा – पाऊस असा रुणझुणता…
“चल लवकर, तो बुडतोय…”
म्हणून श्रीने जुईलीचा हात पकडला आणि दोघंही पळत पळत रेतीत आले… रेतीतून धावत किनाऱ्यावर आले… समोर फेसळता समुद्र आडवा पसरला होता… लालबुंद सूर्य आता त्यात बुडतच होता… पाऊस पडून गेल्यामुळे गार वारा अंगावर शिरशिरी आणत होता… यावेळी समुद्रावर कुणीच नव्हतं. दूर दूरवर फक्त फेसळणारा समुद्र आणि अधूनमधून त्यात समुद्रपक्षी सूर मारून जात होते. आकाशात चार-पाच पक्षी कुठूनतरी कुठेसे जात होते… पायाखालची रेती पायाला हळुवारपणे हुळहुळ करत होती. धावत आल्यामुळे धपापलेल्या जुईलीला श्रीने हळूच जवळ घेतलं… मावळत्या सूर्याला साक्षी ठेऊन श्रीने जुईलीच्या ओठांवर आपल्या प्रेमाची मोहर उमटवली…


