दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 26 एप्रिल 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 06 वैशाख शके 1948; तिथि : दशमी 18:06; नक्षत्र : मघा 20:26;
- योग : वृद्धि 22:27; करण : वणिज 30:07;
- सूर्य : मेष; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:15; सूर्यास्त : 18:58;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128.
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
समाजसेविका रमाबाई रानडे
टीम अवांतर
स्वातंत्र्यपूर्व भारतातील सर्वात महत्त्वाच्या समाजसुधारकांपैकी एक असलेल्या रमाबाई रानडे यांचा जन्म 25 जानेवारी 1863 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या छोट्या गावात राहणाऱ्या कुर्लेकर कुटुंबात झाला. त्यावेळच्या रूढी परंपरेनुसार वयाच्या 11 व्या वर्षी त्यांचे लग्न न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याशी झाले. ज्या काळात स्त्रियांच्या शिक्षणाला महत्त्व दिले जात नव्हते, त्या काळातही रमाबाईंनी आपले पती महादेव रानडे यांच्या सक्रिय पाठिंब्याने आणि प्रोत्साहनाने शिक्षण घेतले.
हेही वाचा – एकीकडे जमदग्नी नाना तर, दुसरीकडे आदिनाथ… गौरीसमोर पेच!
रमाबाईंचा सर्वात महत्त्वाचा वारसा महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात आहे. रमाबाईंच्या सामाजिक कार्याची सुरुवात प्रार्थना समाजाच्या माध्यमातून झाली. ज्यामुळे त्यांना सामाजिक सुधारणेच्या कल्पना आणि त्यातील उदारमतवादी विचारांची प्रथम ओळख झाली. प्रार्थना समाज ही एक सामाजिक सुधारणेची चळवळ होती आणि ती महिला सक्षमीकरणासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सभा आणि व्याख्याने आयोजित करत असे. रमाबाई रानडे या सभांना उपस्थित राहत आणि सामाजिक मेळाव्यांमध्ये या कल्पना इतर महिलांपर्यंत पोहोचवत असत.
रमाबाईंनी हळूहळू सक्रियपणे नेतृत्वाची भूमिकाही स्वीकारायला सुरुवात केली. मुंबईत आर्य महिला समाजाची एक शाखा त्यांनी स्थापन केली. त्यानंतर त्यांनी शहरात ‘हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब’ची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश महिलांना भाषा, विणकाम आणि शिलाई यासारख्या कला, सार्वजनिक भाषण आणि इतर मूलभूत कौशल्यांचे प्रशिक्षण देणे हा होता.
पुण्यात ‘सेवा सदन’ या महिला संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी यशस्वीपणे भूषविले. पुढे ‘सेवा सदन’च्या अनेक शाखा रमाबाईंच्या मार्गदर्शनाखाली स्थापित झाल्या. अनेक रुग्णसेविका या सेवा सदनच्या माध्यमातून तयार झाल्या. मुलींची प्रशिक्षण केंद्रे, वसतिगृह असे उपक्रम सेवा सदनच्या माध्यमातून त्यावेळेस राबविले गेले. 1901 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्या निधनानंतर रमाबाईंनी स्वतःला भारतातील महिलांच्या प्रश्नांशी पूर्णपणे जोडून घेतले.
हेही वाचा – योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
1904 मध्ये मुंबईत झालेल्या भारत महिला परिषदेच्या पहिल्या सत्राचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. तुरुंगातील कैद्यांमध्ये आत्मसन्मान जागृत करण्यासाठी त्या मध्यवर्ती कारागृहाला, विशेषतः महिला विभागाला, नियमितपणे भेट देऊ लागल्या. दुष्काळग्रस्त लोकांसाठी मदत आयोजित करण्यासाठी 1913 मध्ये गुजरात आणि काठियावाडलाही त्यांनी भेट दिली होती. अशा या महान समाजसेविकेचे 26 एप्रिल 1924 रोजी निधन झाले.
रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे आत्मचरित्र आहे. यात त्यांनी न्या. महादेव गोविंद रानडे यांच्यासोबतचा आपला सहजीवन प्रवास, स्त्री शिक्षण आणि सामाजिक कार्याचा अनुभव मांडला आहे. याशिवाय, न्यायमूर्ती रानडे यांच्या निधनानंतर त्यांची ‘धर्मपर व्याख्याने’ आणि ‘व्यापारविषयक व्याख्याने’ ही पुस्तके रमाबाईंनी प्रकाशित केली. भारतीय समाजासाठी दिलेल्या त्यांच्या महान योगदानाबद्दल, इंडो-ऑस्ट्रेलियन पोस्टने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात, 14 ऑगस्ट 1962 रोजी रमाबाईंचे चित्र असलेले टपाल तिकीट जारी केले.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


