त्यादिवशी खुशबू माझ्याकडे आली तेव्हा तिच्याबरोबर एक लहान चणीची मुलगी होती. चेहरा ओढणीने झाकलेला होता. त्यामुळे ती कोण मला समजले नाही. खुशबू बंगाली. इथे देहविक्रय करते. दिसायला ठीकठाक. पण स्वभाव मनमोकळा. गप्पा मारायला लागली की आवरावे लागायचे. बरेचदा इथे नव्या मुली येतात. त्यांना घेऊन या ओळखीच्या बाया येतात. त्यामुळे हीसुद्धा कोणी नवी मुलगी असेल असे वाटले. (नवी मुलगी म्हणजे धंद्यातली नवी नाही तर गावातली नवी.)
“क्या हुआ? कौन है ये?”
“सर्दीखासी हुआ है, बैद बाबू… ये तुम्हारी पोती है.”
“पोती?”
“मेरी लडकी है.”
आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. खुशबू स्वतःला माझी मुलगी म्हणवून घेते किंवा तसे नाते मानते. म्हणजे ही खरोखरच खुशबूची मुलगी असावी. मी थोडा हादरलोच. कारण खुशबू जिथे धंदा करते, तो भाग माझ्या माहितीतला आहे. अरुंद बोळ… दहा बाय दहाच्या खोल्या… येणारे जाणारे गिर्हाईक… दारुडे, गर्दूले… त्यात गिऱ्हाईकावरून बायांच्यात होणारी भांडणे… अधूनमधून पडणारा पोलिसांचा छापा… एकंदर भयंकरच वातावरण! त्यात ही कशाला मुलीला घेऊन आली?
मी मुलीला चेहऱ्यावरून बांधलेला रुमाल काढायला लावला. मुलगी लहान होती. चेहरा बांधलेला असल्याने लक्षात आले नव्हते. निरागस चेहरा, नुकतीच यौवनात पाऊल टाकत असलेली. मी तिला उपचाराचा भाग म्हणून वय विचारले. तिला फारसे हिंदी येत नसावे. तिच्याऐवजी खुशबूनेच उत्तर दिले –
“चौदह साल की है. पढती है अभी. नववी में है…”
हेही वाचा – गोष्ट कैकेयी आणि मंथराची… अमोल आणि सुशीलाची सुद्धा!
मी तपासून उपचार केले. पण माझा अस्वस्थपणा मी विसरू शकलो नाही. शेवटी जाताना मी तिला विचारलेच…
“क्यों लेके आयी लाडकी को?”
“उसको ये गांव देखने का था ना डाक्टरबाबू, इसलिए लाये…”
हे उत्तर मला अजिबात पटले नाही. आमचे गाव काय मुंबई – दिल्ली नाही, की इथे दाखवण्यासारखे काही आहे. शिवाय, आपली आई इथे देहविक्रय करते हे तिला माहीत होईल त्याचे काय? (बहुतेक बायांच्या नातेवाईकांना या बाया धंदा करतात, हे माहीत असते, पण त्या पैसे देत असल्याने ते बोलत नाहीत. बहुतेकांचे नातेवाईक दूरच्या राज्यात अथवा दूर असलेल्या गावी राहतात.)
काही का असेना, पण एवढ्या कोवळ्या मुलीला खुशबूने या ठिकाणी आणावे, हे मला काही पटेना. पण आपण काय करू शकतो? माझ्या हातात काय आहे?
त्याच दिवशी संध्याकाळी सकिंना आली. हीही त्याच गल्लीतली. निघताना मला म्हणाली,
“खुशबू आयी थी क्या, लडकी को लेके?”
“हां,” मी मान डोलावली.
“बेवकूफ औरत. इतनी छोटी लाडकी को लेके आयी है.”
मी काहीच बोललो नाही. मुलगी तिची, मर्जी तिची.
“मैं भोत बोला उसको… बोली लडकी को गावं दिखाने लाई… पागल…” ती तणतण करतच गेली.
दोन-चार दिवस गेले असतील, आज पुन्हा सकिंना आली. तिच्याबरोबर बेबी आणि कमला पण होती.
“मेरे को एक इंजेक्शन देना तो. भोत सिर दुख राहा. खुशबू के साथ झगडा कर के आयी. बोली लडकी को गावं छोडके आ. उसकी नानी है उदर… ये माहोल में क्या बच्ची को रखना?”
“‘तेरी बात सही है सकिंना… पर वो सुनने को होना. लडकी उसकी. कोन बोलेगा उसको?”
“डॉक्टर बाबू आप बोलके देखना. आपकी सुनेगी वो.”
मी एकदम गडबडलो. मी तिला काय सांगणार? आणि कोणत्या अधिकाराने? फक्त रुग्ण आणि डॉक्टर एवढेच संबंध आमचे. ती स्वतःच माझी मुलगी असे म्हणून घ्यायची… पण असे नाते बरेच जण जोडतात डॉक्टरांशी. काका, मामा, आजोबा, भाऊ. त्यात आपलेपणा असतो, पण अधिकार नसतो. अधिकार असतो तो पथ्याविषयी, वाईट सवयी सोडण्याविषयी. तोही रुग्ण ऐकेल याची शाश्वती नसते. इथे तर खुशबूच्या मुलीविषयी तिला सांगायचंय. ती ऐकेल?
मी दुविधेत पडलो. पण सकिंना ठाम होती.
“फोन लगाओ सर.”
“तू लगाना. मैं बात करता.”
“नहीं. आपही लगाओ. मै लगाऊंगी तो बोलेगी तूने ही डॉक्टर बाबू को बोला…”
“मेरे पास नंबर नहीं हैं.”
“मैं देती हूं.”
तिने झटक्यात मोबाइलमधून एक नंबर काढून माझ्यापुढे केला. आता माझ्याकडे पर्याय राहिला नाही.
मी तिला फोन लावला. कोणजाणे उचलते की नाही? की ग्राहकांबरोबर असेल?
‘है इश्क तो है इश्क, तो गलेसे लगाले…’
रिंगटोन वाजत होती. माझी छाती उगाच धडधडत होती. ती काही उलटे तर बोलणार नाही ना? तुमचा काय संबंध, अशी बोलली तर?
समोरून फोन उचलला गेला.
“हॅलो कौन?”
“खुशबू, मैं डॉक्टर बैद बोल रहा हूं.”
“अरे आप. क्या हुआ सर? आज लडकी को कैसे याद किया?”
“बेटा वो तेरी लडकी को तू लेके आयी है… उसको वापस कब ले जायेगी?”
“क्यूं सर?”
“अरे अपने एरिया में माहोल कितना खराब हैं. बच्ची है डर जायेगी. तू जल्दी से जल्दी घर भेज उसको.”
“किसके साथ भेजू? अभी तो देश जानेवाले भी कोई नहीं.”
“तो तू खुद चली जा. ऐसे माहोल में मत रख उसको. कल परसों चली जाना.”
“देखती हूं सर. टिकट भी मिलने को होना…” तिने फोन बंद केला. फोन मी स्पीकरवर टाकला असल्याने सगळ्यांना ऐकू येत होते.
“थँक यू सरजी.” एवढे म्हणून त्या सगळ्या गेल्या.
त्यानंतर तिसऱ्याच दिवशी सकिंना घाईघाईत दवाखान्यात आली. मी रुग्ण तपासत होतो. ती आत येताच, मी म्हणालो –
“रुक जा पांच मिनट. नंबर है…”
“नई. मैं दवा लेने नही आयी. बोलनेको आयी. खुशबू ले गयी बच्ची को वापस गांव…”
“चलो अच्छा हुआ,” मी म्हणालो. ती आली तशी निघून गेली.
खुशबू नंतर परत आली. सकिनाने मुलगी तिच्या नानीकडे व्यवस्थित गावी पोहोचल्याची खात्री करून घेतली.
हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?
आज तरी हे प्रकरण संपले. माझ्या एका फोनने हे झाले असेल, असे मला अजिबात वाटत नाही. त्या सगळ्या बायांनी तिच्यावर दबाव टाकला असेल त्यात माझाही एक रोल होता. मी समजलो नाही, पण त्या सगळ्या समजल्या होत्या की, खुशबूने मुलीला धंदा करायलाच इथे आणले असावे. पण एवढ्या कोवळ्या मुलीला यात टाकू नये, असे वाटल्याने त्यांनी जोरदार विरोध केला.
आजतरी ती मुलगी तिच्या आजीकडे सुखरूप शाळा शिकत आहे. भविष्याचे माहीत नाही. पण सकिना, कमला, बेबी आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या पोरींचे, बायांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. त्या बायांची हीही एक वेगळी चांगली बाजू त्यानिमित्ताने पुढे आली.


