Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026

    मुंबईची भेळपुरी अन् कोलकात्याची झालमुरी!

    May 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » एव्हरग्रीन… ‘सारे प्रवासी घडीचे’!
    ललित

    एव्हरग्रीन… ‘सारे प्रवासी घडीचे’!

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारNovember 25, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, पुस्तक वाचन, पुस्तकसंग्रह, सारे प्रवासी घडीचे, जयवंत दळवी, कोकणदर्शन, कोकण वर्णन, कोकणी माणसं, कोकणी व्यक्तिरेखा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ‘बॅरिस्टर’, ‘पुरुष’, ‘नातीगोती’ यासारखी नाटके, ‘चक्र’ सारखी कादंबरी आणि चित्रपट , ‘ठणठणपाळ’ सारखे खुशखुशीत सदर आणि बरंच काही लेखन प्रसिद्ध असलेल्या जयवंत दळवींचे 1964 साली प्रकाशित झालेले हे पुस्तक ‘सारे प्रवासी घडीचे’! आपू नावाच्या मुलाची ही कथा आहे. लेखकाने इतकं जिवंत वर्णन केले आहे की, हे काल्पनिक आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कोकणातले एक गाव आपल्या कल्पनाशक्तीने त्यांनी आपल्यासमोर उभे केले आहे. त्यात मोजता न येण्याइतकी पात्रे बारीकसारीक तपशीलांसकट आली आहेत. लेखकाच्या खुमासदार शैलीमुळे वाचताना गालातल्या गालात हसू, ते पुढची अक्षर दिसू नयेत इतकं डोळ्यांत पाणी येईपर्यंतचे हसू… येते. सगळा विनोद निर्मळ, निरागस आहे. जसे हसू तसे काही वेळा खिन्नताही दाटून येते. परंतु सगळे कथन प्रांजळ आहे असे वाटत राहते. त्यांनी लिहिले आहे, इथली माणसे परिस्थितीमुळे जशी वागावी तशी वागली. आत एक बाहेर एक असा प्रकार नाही. वागण्यात सांगड नव्हती. स्वभावावर बेगड नव्हती.

    उशाशी डोंगर, पायाशी समुद्र आणि पायाखाली लाल माती असे वर्णन ते करतात. कोकणच्या किनारपट्टीवर असलेले नकाशात स्थान नसलेले हे लहानसे गाव. एकोणीस लेखांत गावातल्या वेगवेगळ्या माणसांचे, त्यांच्या व्यवसायांचे, भौगोलिक परिस्थितीचे वर्णन यात येते. त्यांची ठसकेबाज भाषा येते. या भाषेचा स्वादच वेगळा. आपू शिक्षण झाल्यावर गाव सोडून मुंबईत स्थायिक झाला आहे. तो गावातल्या घरात एकटाच येतो, तेव्हा रिकाम्या घरात त्याच्या आठवणी उचंबळून येतात. त्याच तो सांगतो आहे…

    आपूला शाळेत घालण्यासाठी मुहूर्त पाहायला भटजी घरी येतात, तेव्हा आजोबांच्या सारखा ‘माझ्याही तेराव्याचा मुहूर्त’ पाहत आहेत का? असे त्याला वाटते. मग त्याची उचलबांगडी, आई-आबांनी जबरदस्तीने शाळेत पाठवणे, आजीचा क्षीण विरोध, तोही आता तिला चोरून विडया कोण आणून देईल, म्हणून! अशा प्रकारे हा प्रसंग रंगवला आहे. शाळेतले मास्तर, पावटे मास्तरांची काढलेली खोड, वर्गातली मुले.. अशा शाळेतल्या गमतीजमती आहेत. त्यातले स्नेहसमेलनातले अंगविक्षेपासह सादर केलेल्या ‘देवाजीने करुणा केली भाते पिकुनी पिवळी झाली…’ गाण्याच्या वेळी उडालेली धमाल वाचताना हसून हसून डोळ्यांत पाणी येतं.

    आपूचे वडील आबा गावातले मोठे प्रस्थ. त्यांच्या शब्दाला मान होता. त्यांचा शत्रू बाबुली. त्या दोघांचे वैर इतके जुने की कधी सुरू झाले, हे दोघांना माहीत नाही. दोन माडांच्या मालकी हक्कावरून दोघे कोर्टात जाऊन इतके भांडले की माड सुकले तरी दाव्याचा निकाल लागला नाही. या दोघांनी एकमेकांवर कुरघोडी करायचे जे प्रयत्न केले, तेही विनोदी पद्धतीने रंगवले आहेत. चुगलखोर शांतू न्हावी, दारूबाज मुंगी हवालदार, झिलू, नरूच्या आईचे पैसे खाणारे वामन दाजी, त्यांनी गायलेले अभंग, आबांची हरवलेली सोन्याची अंगठी मिळाल्यावर आणून देणारा रंगल्या या व्यक्तिरेखा येतात. बालमित्र नरु, त्याची आई यांची करूण कहाणी येते…

    हेही वाचा – स्मृतिचित्रे… लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मवृत्त!

    रवळनाथ हे गावाचे दैवत. आबांची रवळनाथावर श्रद्धा इतकी की, त्याला कौल लावल्याशिवाय कुठलेही काम करायचे नाही. रवळनाथ स्वप्नात येऊन कामे करवून घेतो यावरही त्यांचा विश्वास होता. गावातल्या सर्वांची श्रद्धा असल्याने सर्वांमध्येच त्याची भीती होती. तिथे भूत काढणे वगैरे प्रकार व्हायचे. तसेच बाबुली आणि आबा दोघांनी एकमेकांविरुद्ध एकच वेळी त्याला नवस बोललेले असायचे. एकदा पिकांवर कीड पडलेली असताना आबा त्याला गाऱ्हाणे घालतात आणि नंतर पाखरांची टोळी येऊन सर्व कीड टिपून खाते. अशा प्रसंगांमुळे सर्वांचा विश्वास असतो की, तो त्यांचे रक्षण करतो!

    दशावतारी जीवा, त्याची मंडळी, नाटकं, त्याची नाटकाच्या कपड्यांची पेटी, दादूने लिहिलेले द्रौपदी वस्त्रहरण नाटक, द्रौपदीची लुगडी मोजताना दु:शासनाची झालेली चूक, लुगडी ओढल्यामुळे गोल गोल फिरून आपटल्याने आलेली टेगळे इत्यादी वाचताना हसून पुरेवाट होते. डॉ. रामदासी सहभोजनाच्या वेळी पूर्णान्न करतात, तेव्हा ढवळायला काही न मिळाल्याने अख्खा हात पातेल्यात घालतात. ते बघितल्यावर कोणी पूर्णान्न खात नाही आणि नरू, कुत्रे तरी खातंय का पाहतो, असे म्हणतो.

    तात्या रेडकर निसर्गावर प्रेम करत असतो म्हणून त्याला ‘हाफम्याड तात्या’ असे टोपण नाव असते. त्याचा मुलगा पुढे कम्युनिस्ट होतो तेव्हा ‘आमका वाटला तुझ्या घराण्यात फक्त एकच हाफम्याड असा’ असे म्हणून खिल्ली उडवतात.

    चरखो फिरवून स्वराज्य गावला असता तर, नांगर फिरवून शेतात पीक आयला नसता?… गांधीला मारले ते वाईट झाले. वैर होते तर मरेपर्यंत शिव्या नसत्या का देता आल्या? नेहरूंनी पाठवलेले आंबे इंग्लंडच्या राणीला आवडले, हे वाचताच फुकट गावले तर वायट कित्याक? हे त्यांचे तत्वज्ञान! बर्नार्ड शॉने दाढीवर रस सांडीत रत्नागिरीचे हापूस आंबे खाल्ले हे वाचताच ‘म्हातारो आंब्याचा बाटो गळ्यात अडकून मेलो नाय ह्या खूप झाला…’ असे लोक म्हणाले. गावातल्या लोकांचे असे बोलणे वारंवार वाचायला मिळते.

    पेस्तवच्या दुकानात सगळे भेदभाव विसरून दारू पिणारे गावकरी, त्याचे खोपटे जाळल्यावर लगेच उभारून देणारे लोक, गांधी हत्येनंतर जाळपोळ न होणारे गाव ही माणसांची चांगली बाजू लेखक सांगतो.

    ‘सर्वांगाने उघडा राहून फक्त वितीची काष्टी कमरेला लावणारा आमचा शेतकरी, कुणाच्या समोर कमरेच्या आकड्याला अडकवलेल्या कोयत्याला हात घालणार नाही. हात घातला तर त्याला कुणी घाबरणार नाही. कोयता हातात धरला तरी तो उगारणार नाही… उगारला तरी मारणार नाही आणि तोल सुटून मारला तरी तो लागणार नाही.’ गावातल्या शेतकऱ्याबद्दल लेखकाने असे लिहिले आहे. अहिंसा वगैरे तत्व माहीत नसलेली ही अशिक्षित माणसे जीवनाचे साधे तत्वज्ञान जाणून होती. त्यांच्या जगण्यातला साधेपणा, त्यांच्या कमी गरजा… हे सर्व अनेक व्यक्तीरेखांतून दिसते. पाण्याचे दुर्भिक्ष आणि त्यामुळे झालेली गरिबीची, कमतरतेची सवय मन खिन्न करते.

    हेही वाचा – आठवणींचा एक कोपरा हळुवार उघडणारी… ‘शाळा’

    नाटकातली खोटी मिशी हरवण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून कोर्टात जाणाऱ्या माणसांबद्दल वाचून गंमत वाटते, पण वैषम्यही वाटते. मी गांधीजींची अनेकदा हजामत केली, अशी फुशारकी मारणाऱ्या न्हाव्याला खऱ्या-खोट्याची विचारपूस करण्याआधी, ‘त्यांनी उधारी ठेवली नाही ना?’ असा प्रश्न लोकांनी विचारला.

    कोकणातल्या माणसाच्या स्वभावाचे कंगोरे लेखकाने खास शैलीत लिहिले आहेत. कुठल्याही गोष्टीचे फारसे सुख किंवा दुख न मानणारी ही माणसे रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असतात. आपूचे गाव कोकणच्या त्या काळातल्या गावांचे प्रातिनिधिक रूप आहे. कोकणची संस्कृती गुणदोषांसकट लेखकाने मांडली आहे. अगदी इतिहास सांगावा, तशी पारदर्शकतेने. आता गावात तो परका झाला आहे. मुंबई त्याला परकी आणि तो गावाला परका हे त्याचे दु:ख आहे. आपू एकाकी झाला आहे… त्याच्या या जीवनाच्या प्रवासात त्याला भेटलेले प्रवासी घडीभर साथीपुरतेच होते. मग ते आबा, आई असोत की मास्तर असोत की, बालमित्र असोत.

    दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,

    एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ

    क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा

    गीतरामायणातल्या या ओळींत सार आले आहे.

    हे पुस्तक कधीही, कुठल्याही पानावरून, कितीही वेळा वाचावे असे आहे. प्रत्येक वेळी आसू आणि हसू येतातच. मी कितीदा तरी वाचले आहे तरी, पुन्हापुन्हा वाचावेसे वाटते. घडीभरात पुस्तक वाचून पूर्ण होते, पण जीभेवर गोड चव रेंगाळावी, तसे माधुर्य रेंगाळत राहते.

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026 ललित

    लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी

    May 17, 2026 ललित

    झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’

    May 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    By शोभा भडकेMay 17, 2026

    भाग – 26 “चला… चला… पटकन नाव घ्या दोघे आणि लवकरात लवकर प्रवेश करा घरात,”…

    लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी

    May 17, 2026

    झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’

    May 16, 2026

    सदाफुली… पण विरहात मलूल झालेली!

    May 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026

    मुंबईची भेळपुरी अन् कोलकात्याची झालमुरी!

    May 17, 2026

    लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी

    May 17, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 17 ते 23 मे 2026

    May 17, 2026

    Dnyaneshwari : या बोला म्हणे अनंतु, मी कोण हें आहासी पुसतु

    May 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 300
    • अवांतर 186
    • आरोग्य 111
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 423
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 209
    • मैत्रीण 19
    • ललित 631
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    शिव आणि दिनकरराव वाद पाहून आरू हादरली

    May 17, 2026

    मुंबईची भेळपुरी अन् कोलकात्याची झालमुरी!

    May 17, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 मे 2026

    May 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.