दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 04 ऑगस्ट 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 13 श्रावण शके 1948; तिथि : षष्ठी 22:03; नक्षत्र : रेवती 21:53;
- योग : धृति 19:32; करण : गरज 10:32;
- सूर्य : कर्क; चंद्र : मीन 21:53; सूर्योदय : 06:15; सूर्यास्त : 19:13;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
मुंबई महानगरपालिकेचे जनक फिरोजशहा मेहता
टीम अवांतर
फिरोजशहा मेहता यांचा जन्म 4 ऑगस्ट 1845 रोजी मुंबईत एका सुखवस्तू पारशी कुटुंबात झाला. 1864मध्ये ते पदवीधर झाले. 1865मध्ये रुस्तमजी जमशेदजी जिजिभॉय यांनी पाच भारतीयांना इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर होण्यासाठी दीड लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. या पाच जणांत फिरोजशहा एक होते. मात्र या मदतीचा त्यांना फार काळ फायदा मिळाला नाही, कारण रुस्तमजी यांना व्यापारात मोठी खोट आली आणि फिरोजशहा यांना मिळणारी मदत बंद झाली. तरीही इंग्लंडमध्ये फिरोजशहा चार वर्षे राहिले. त्याच सुमारास, दादाभाई नौरोजी यांच्याबरोबरचा परिचय त्यांना फार उपयुक्त ठरला.
दादाभाईंच्या प्रेरणेमुळे फिरोजशहांनी ‘द एज्युकेशनल सिस्टीम्स ऑफ इंडिया’ या विषयावर आपला प्रबंध सादर करून भारतात प्राथमिक शिक्षणापासून तांत्रिक आणि विद्यापीठातील शिक्षण यांची सूत्रबद्ध व्यवस्था अमलात आणावी, अशी मागणी केली. 1868मध्ये ते बॅरिस्टर झाले आणि भारतात परतले. मुंबईत त्यांनी वकिली सुरू केली. मात्र केवळ कायद्यापुरतेच आपले कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता फिरोजशहांनी तत्कालीन राजकारण आणि समाजकारणाकडेही आपला मोर्चा वळविला. भारतातील तरुणांना लष्करी शिक्षण दिले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते.
हेही वाचा – वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गुंतवणूक, विवाह, सुसंवाद
साधारणपणे 1870पासून फिरोजशहांनी मुंबई महापालिकेच्या कामात रस घ्यायला सुरुवात केली. 1872मध्ये पहिल्यांदा ते सभासद म्हणून पालिकेवर निवडून गेले. पुढे ‘फिरोजशहा मेहता म्हणजे मुंबई महापालिका’ हे समीकरण तयार झाले. पुढे 1888मध्ये त्यांनी मुंबई महापालिकेच्या घटनेत काही बदल सुचविणाऱ्या विधेयकाच्या मसुद्यात महत्त्वाची दुरुस्ती सुचवली. हे विधेयक म्हणजे महापालिकांची ‘हक्कसनद’ (मॅग्नाकार्टा) समजली जाते. याने मुंबई महापालिकेला आपला कारभार स्वायत्तपणे करण्याचा हक्क आहे, हे तत्त्वत: प्रस्थापित झाले. वृत्तपत्रांची गळचेपी करणारा व्हरॅ्नक्युलर प्रेस ॲक्ट आणि ब्रिटिश कापडासाठी हुकमी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी आयातकरातून देण्यात आलेली सूट, या दोन प्रश्नांवर फिरोझशहांनी सनदशीर मार्गांचा अवलंब केला.
1890 साली झालेल्या काँग्रेसच्या सहाव्या अधिवेशनासाठी फिरोझशहा मेहतांची अध्यक्षपदी निवड झाली. तत्पूर्वी, मुंबईच्या कायदेमंडळाचे ते सदस्य झाले होते. 1892 साली ते इम्पीरियल कौन्सिलचे सदस्य म्हणून निवडले गेले. तिथे त्यांनी शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्तता करण्यासाठी विविध उपाय सुचविले. याशिवाय, लष्करी तसेच शासकीय खर्चात कपात करावी, यासाठी आग्रह धरला. कर्झनच्या युनिव्हर्सिटी बिलाला त्यांनी कडाडून विरोध केला. विश्वविद्यालये स्वायत्तच असावीत, त्यांच्यावर शासकीय दडपण असू नये, अशाही त्यांनी मागण्या केल्या.
1894 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना सी. आय. ई. हा किताब दिला. तेव्हापासून ते सर फिरोझशहा म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वदेशीच्या प्रचारार्थ त्यांनी आणि न्यायमूर्ती तेलंग यांनी साबण कारखाना काढण्याचा उपक्रम केला. मात्र तो फसला. पुढे त्यांच्याच पुढाकाराने 1911 साली सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाची स्थापना झाली. 1913 मध्ये ‘बॉम्बे क्रॉनिकल’ हे इंग्रजी भाषेतील पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र त्यांनी मुंबईला सुरू केले. 1915 साली मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच वर्षी विद्यापीठाने त्यांना एल्एल्.डी ही मानद पदवी देण्याचे ठरविले. मात्र ती स्वीकारण्यास ते हयात नव्हते. 5 नोव्हेंबर 1915 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – संयम आणि संतुलन राखून पुढे जाण्याचा आजचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी आखण्यात आलेल्या योजनांना हळूहळू गती मिळेल, व्यावसायिक चर्चांमधून फायदा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बजेटपेक्षा जास्त खर्च टाळणे उत्तम राहील. परदेशातील व्यवहारांमध्ये रस वाढू शकतो. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. निर्णय घेण्यासाठी घाई टाळा. आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ – यश आणि आर्थिक प्रगतीचा असा आजचा दिवस ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक होईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आकर्षक प्रस्ताव मिळू शकतात, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
मिथुन – यश आणि व्यवस्थापन कौशल्ये मजबूत करण्याचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुमच्या नेतृत्व क्षमतेची आणि कार्यक्षमतेची प्रशंसा होऊ शकते. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी निर्माण होतील. व्यावसायिक घडामोडी वेगाने सुरू राहतील आणि महत्त्वाच्या योजना यशस्वी होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम दिसू शकतात. आत्मविश्वासाने पुढे वाटचाल केल्याने यशाची शक्यता वाढेल. त्यासाठी कोणतीही भीती किंवा संभ्रम टाळणे फायदेशीर ठरेल.
कर्क – बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामांना गती मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळेल. करिअर आणि व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, नफ्याच्या संधी वाढतील. तुमचे विचार स्पष्टपणे मांडू शकाल. एकूणच, आजचा दिवस प्रगती आणि समाधानाचा असेल. तोंडावर ताबा ठेवा, अन्यथा जवळचाचा कोणी दुखावला जाण्याची शक्यता आहे.
सिंह – सावधगिरी आणि विवेकबुद्धीने वागण्याचा दिवस आहे. तसे वागलात तर सकारात्मक परिणाम मिळतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, त्यामुळे प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या. कोणत्याही करारावर किंवा दस्तऐवजावर सही करण्यापूर्वी, ते पूर्णपणे वाचून, समजून घ्या. आर्थिक बाबींमध्ये संयम आवश्यक असेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात स्थिरता टिकून राहील, परंतु जोखीम टाळणे उत्तम ठरेल.
कन्या – भागीदारी आणि सांघिक कार्यात यश मिळेल. व्यावसायिकांना चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरदार जातकांना सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल ज्यामुळे महत्त्वाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. भागीदारीच्या कामातून सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी शिस्त आणि स्पष्टता राखणे फायदेशीर ठरेल. नवीन संधी ओळखणे आणि त्यांचा प्रभावीपणे उपयोग करणे, यामुळे भविष्यात मोठे यश मिळेल.
तुळ – दिवस कठोर परिश्रम आणि शिस्तीद्वारे प्रगतीचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. योजनांना हळूहळू गती मिळेल. वैयक्तिक यशावर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. व्यावसायिक बाबींमध्ये सकारात्मक प्रगती शक्य आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये संतुलन राखा. अनावश्यक जोखीम टाळा. कला, सर्जनशीलता आणि हस्तकला क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी दिवस शुभ ठरेल. संयमाने आणि नियमितपणे काम केल्यास यशाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात.
वृश्चिक – यश आणि सकारात्मक परिणामांचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना यशस्वी होतील, ध्येये वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा आणि विस्ताराचे संकेत आहेत. सहकारी आणि मित्रांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल आणि नवीन संधी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे. त्यांना शैक्षणिक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – सार्थक
धनु – कुटुंब आणि व्यावसायिक बाबींमध्ये संतुलन राखण्याचा दिवस आहे. कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा हट्टीपणा टाळा, कारण त्याचा नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल, आर्थिक व्यवहारांना गती मिळेल. घर आणि कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. मालमत्ता किंवा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी शक्य होऊ शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नम्रता आणि समजूतदारपणाने वागणे फायदेशीर ठरेल.
मकर – संवाद कौशल्य आणि संबंध वाढवण्यावर भर द्या. व्यवसाय आणि करिअर विस्तारासाठी संधी उपलब्ध होतील. नवीन लोकांना भेटणे भविष्यात फायदेशीर ठरू शकते. तुमच्या कल्पना आणि योजनांना कामाच्या ठिकाणी पाठिंबा मिळेल. आर्थिक प्रगतीची चिन्हे आहेत. नवीन सौद्यांमधून नफा मिळू शकतो. धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. ध्येयांवर लक्ष केंद्रित केल्यास महत्त्वपूर्ण यश मिळू शकते.
कुंभ – आजचा दिवस सकारात्मक आर्थिक परिणाम घेऊन येणारा असेल. बचत आणि गुंतवणुकीशी संबंधित प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. तुमच्या कामाच्या योजनांना गती मिळेल आणि तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. सामाजिक वर्तुळ विस्तारेल, नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतात. आनंद देणारी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक आणि कौटुंबिक स्तरावर समाधानकारक परिणाम दिसून येतील.
मीन – आजचा दिवस मीन राशीच्या जातकांसाठी सर्जनशीलता आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. नवीन प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये रस घ्याल. तुमची प्रतिभा इतरांना प्रभावित करू शकेल. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. त्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळेल. व्यावसायिक उपक्रम फायदेशीर ठरतील. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील आणि सुखसोयीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. स्वभाव आणि सकारात्मक विचार तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मदत करतील.


