Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    April 13, 2026

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » स्मृतिचित्रे… लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मवृत्त!
    ललित

    स्मृतिचित्रे… लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मवृत्त!

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारNovember 18, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, पुस्तक वाचन, पुस्तकसंग्रह, स्मृतिचित्रे, ना वा टिळक, लक्ष्मीबाई टिळक, रेव्हरंड टिळक,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ‘तू तर माझ्याही पुढे गेलीस’ या नावाचा ‘स्मृतिचित्रे’मधला एक धडा शाळेत असताना होता. गंमत म्हणून एकमेकांना चिडवताना धड्याचं नाव वापरत होतो, त्यामुळे लक्षात राहिलं… ना. वा. टिळकांची एक कविता सुद्धा होती – ‘बोला हवे ते, मला काय त्याचे? पुरे जाणतो मीच माझे बळ…’ या ओळी मला फारच आवडल्या होत्या. कवितेचा अर्थ नीट कळला नव्हता, पण असे बाणेदार उत्तर कोणाला देता यायला हवे, असं त्यावेळी शाळेत असताना बोलणी खायच्या वयात वाटलं होतं.

    ‘स्मृतीचित्रे’ पुस्तक वाचलं ते या कारणांसाठी! पुन्हा वाचायला घेतलं तेव्हा सतत माझ्याशी, या काळातल्या माझ्या आसपासच्या स्त्रियांशी लक्ष्मीबाईंची नकळत तुलना व्हायला लागली आणि अपार कृतज्ञता दाटून आली. त्या काळातल्या स्त्रियांनी किती हालअपेष्टा सहन केल्या! त्यांनी समाज बदलण्यासाठी प्रयत्न केले, स्वतःला बदलून दाखवलं, कर्तृत्व गाजवून दाखवलं म्हणून आज आम्ही स्त्रीस्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्यांच्याशी मनाने जोडून घेता यावं म्हणून मी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून पाहायचा प्रयत्न केला आणि थोड्या पानांनंतर सोडून दिला इतकं दडपण मला आलं. केवळ अशक्य असंच वाटू लागलं.

    लक्ष्मीबाई सोडून इतर कोणी हे आत्मचरित्र लिहिलं असतं तर, अश्रूंचे पूर वाहिले असते… एक करूण चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं असतं. पण त्यांच्या विनोदबुद्धीमुळे, सकस दृष्टीकोनामुळे आणि अर्थातच, असामान्य बुद्धीमत्तेमुळे मराठी साहित्याला अभिमानास्पद ठरलेलं लेखन लिहिलं गेलं. आचार्य अत्रे त्यांना ‘साहित्यलक्ष्मी’ म्हणत… किती सार्थ नाव आहे!

    लक्ष्मीबाई टिळक या ना. वा. टिळकांच्या पत्नी. त्यांना त्या ‘टिळक’ असे संबोधत असत. टिळक त्यावेळी कवी, समाजसुधारक, विचारवंत म्हणून प्रसिद्ध होते. टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे अधिक प्रसिद्धी मिळाली असली तरी, लोकांच्या टीकेला तोंड द्यावे लागले. धर्मपरिवर्तन करायला आजही समाजमान्यता नाही, तेव्हाही नव्हती! त्यांच्या अशा विक्षिप्त वागण्याचा अतोनात त्रास त्यांच्या पत्नीने सहन केला. माहेरची मनकर्णिका गोखले वयाच्या अकराव्या वर्षी लग्न होऊन नारायण वामन टिळकांची पत्नी झाली. सासूबाई नव्हत्या. लक्ष्मीबाई देशावर करतात तसा स्वयंपाक करायच्या ते कोकणस्थी स्वयंपाक आवडणाऱ्या सासऱ्यांना आवडायचं नाही. सासऱ्यांनी जो त्रास दिला, तो वाचवत नाही. पण लक्ष्मीबाई तक्रारीच्या सुरात न सांगता जे घडले ते हसत सांगतात.

    हेही वाचा – आठवणींचा एक कोपरा हळुवार उघडणारी… ‘शाळा’

    लक्ष्मीबाईना फार हसू यायचं. एकदा टिळकांबरोबर सोंगट्या खेळत असताना टिळक हरू लागले तसे त्यांना अनावर हसू येऊ लागले. टिळक चिडत गेले आणि या आणखी हसू लागल्या. शेवटी टिळकांनी त्यांना ढकलून दिले आणि पायऱ्यांवरून गडगडत खाली पडल्या. त्यावेळी त्या गर्भवती होत्या!

    टिळकांच्या पायावर चक्र पडलेले असल्यासारखे ते फिरत होते. अनेकदा गावे, घरे बदलली. पैसा, वस्तू सतत दुसर्‍याला दान करून टाकायचे, इतके की, घरात अन्नाचा कण नसायचा! यावरून पतीपत्नीची खडाजंगी व्हायची. घरात राहिलेले शेवटचे दोन रुपये धान्य आणायला दिल्यावर ते कागद, दौत घेऊन आले होते. त्यांची तीन मुले गेली फक्त एक मुलगा दत्तू वाचला.

    पहिला मुलगा झालेला असताना लक्ष्मीबाईंनी हौसेने बाहुलीचे लग्न केले, त्याची हकिकत वाचताना हसू येते, पण करपलेल्या बालपणाची जाणीव होते. लक्ष्मीबाईंचा स्वभाव विनोदी असल्याने कठीण प्रसंगही त्या हलक्याफुलक्या प्रकारे लिहितात. त्यांना टिळकांनी लिहावाचायला शिकवले तरी, जोडाक्षरे आणि काही अक्षरे अजूनही समजत नाहीत, असे त्या म्हणतात. त्या उत्तम कविता करू लागल्या, याचा टिळकांना अभिमान वाटत असे. त्यांची एक हृद्य कविता ’मी तुझी मावशी तुला न्यायला आले…’ या शेवटच्या ओळीमुळे माझ्या लक्षात राहिली.

    त्यांनी व्यासपीठे गाजवली, उत्स्फूर्त भाषणे दिली. पुढे टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यावेळी लक्ष्मीबाईंच्या मनस्थितीचे वर्णन करायला शब्द अपुरे आहेत. परंतु सर्व नातेवाईक मंडळीनी त्यांना खंबीर साथ दिली. भावजया, भाऊ, मामा, आत्या, बहिणी, दीर सगळे पाठीशी उभे राहिले. त्यावेळची नात्यांची ही पक्की वीण पाहिली की, आजची नाती ठिसूळ झाली आहेत का? असा प्रश्न पडतो. निष्कांचन लक्ष्मीबाईंच्या पाठी निरपेक्ष भावाने दोन्हीकडचे नातेवाईक, मित्रमंडळ उभे राहिलेले दिसते.

    टिळकांनी ‘दत्तूला घेऊन जाईन,’ अशी भीती घातली, त्यामुळे पाच वर्षे दूर राहिल्यावर त्या टिळकांबरोबर राहायला गेल्या. नंतर त्यांनीही ख्रिस्ती धर्म स्वीकारला. गरजू मुलांना दत्तक घेतले. घराची आणि हृदयाची दारे सर्वांसाठी खुली केली. पण त्यांनी जे निर्णय घेतले ते स्वतच्या बळावर, टिळकांनी सांगितले म्हणून नाही! दोघांनी प्लेगच्या काळात रुग्णांची खूप सेवा केली. त्यांच्या घरात वेगवेगळी माणसे येऊन राहात होती. एका माणसाचे कर्ज चुकवण्यासाठी टिळकांनी घर विकून पैसे दिले… तेही घरातल्या सामानासकट! लक्ष्मीबाई लिहितात, त्यांनी सालंकृत कन्यादान केले. पुढे एक बुवा त्यांच्या घरावर नजर ठेवून त्यांच्या घरी राहू लागला, टिळकांना ‘ही सगळी मोहमाया आहे’, असे सांगू लागला तेव्हा लक्ष्मीबाईनी त्याला अद्दल घडवली.

    बालकवी ठोंबरे त्यांच्याकडे राहात होते, त्यांचे शिक्षण यांनी केले. बालकवींमधले बालक त्यांनी छान रंगवून सांगितले आहे आणि त्यांचा चटका लावणारा मृत्यू सांगताना त्या म्हणतात, ‘पाखरा, येशील कधी परतून…’

    त्यांचे धर्मपरिवर्तन केवळ पतीला साथ देण्यासाठी नव्हते, त्यांना पटले म्हणून होते. दत्तूचा विवाह, नवीन सून, नातवंडे असा त्यांचा वाढता संसार, मानस कन्यांचे विवाह, त्यांची मुले, विद्यार्थी, आश्रयाला असलेली मुले असा मोठा गोतावळा होता… सर्वांचे वर्णन येते तेव्हा या स्त्रीचे हृदय किती विशाल होते, हे समजते. निरपेक्ष भावनेने त्यांनी सर्वांची सेवा केली, तीही हसत हसत! टिळकांचे विक्षिप्त वागणे पचवले, कोलमडून पडल्या नाहीत… या पतीपत्नीचे एकमेकांवर असलेले प्रगाढ प्रेम वेळोवेळी जाणवत राहते.

    हेही वाचा – परतवारी… ही देखील ऐश्वर्यवारीच!

    टिळकांचा मृत्यू झाल्यावर त्यांना अक्षरशः घरातून बाहेर काढले गेले. नंतर त्यांना छोट्यामोठ्या नोकर्‍या करायला लागल्या. तिथेही अडचणी आल्या त्यावर त्यांनी युक्तीने मात केली. होस्टेलमधल्या मुलींनी चोऱ्या करण्याचे प्रकरण मजेशीर आहे. त्यांचे लेखन सुरूच राहिले. त्यांनी वर्णन केलेल्या असंख्य माणसांची मोजदाद करणे अशक्य आहे. त्यांच्या स्मरणशक्तीची दाद द्यायलाच हवी.

    पुस्तक वाचून पूर्ण झाल्यावर वाटलं, त्यांनी जितके कठीण प्रसंग झेलले त्याच्या शतांशानीही सहन करणे जमले नसते. ख्रिस्ती होऊनसुद्धा मूळचे हिंदुत्व त्या पूर्णपणे काढून टाकू शकल्या नाहीत, याचा वारंवार प्रत्यय येतो. त्यांनी एका ठिकाणी लिहिलंय, “मी पक्की भटीण!”

    कर्मठ वडिलांची मुलगी असूनही त्यांनी नंतर जातपात मानली नाही, धर्मसुद्धा मानवसेवेच्या आड आला नाही. पण टिळकांनी धर्मपरिवर्तन केले नसते तर, त्यांना (टिळकांना) अशीच देशसेवा करता आली नसती का? त्यांनी धर्मपरिवर्तन करून काय मिळवले? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही.

    जसे आठवले तसे त्या लिहित गेल्या. कुठेही उपदेश करण्याचा अभिनिवेश नाही की, आत्मस्तुती नाही. स्वतःच्या हातून जे घडलं, ते जसंच्या तसं कुठलाही आडपडदा न ठेवता लिहिलं आहे. त्यामुळे हे चरित्र आत्समर्थन न होता आत्मवृत्तच राहिले आहे. पत्नीने लिहिलेले आत्मचरित्र ‘पतीचे चरित्र’ अशा स्वरूपाचे असते, परंतु स्मृतीचित्रे लक्ष्मीबाईंचेच आत्मचरित्र झाले आहे.

    ‘किती हिंदकन्यका वेड्या या!’ म्हणा

    ह्या किती पावल्या थोड्या शिक्षणा

    जगी राहू वेड्या अशाच आम्ही बाई

    करू वेड्या इतरा! यात संशय नाही हिंदुस्तानी स्त्रियांबद्दल रचलेली ही त्यांची कविता वाचून हलकेच हसू उमटते पण मनोमन पटते सुद्धा! भारतीय स्त्रीने कुठपासून कुठपर्यंत झेप घेतली आहे, हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    April 13, 2026 ललित

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026 ललित

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    By शोभा भडकेApril 13, 2026

    भाग – 22 खूप वेळ आरू रडत होती. बऱ्याच वेळानंतर भावनाने तिला उठवून बेडवर बसवलं…

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    April 13, 2026

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026

    April 13, 2026

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    April 13, 2026

    IPL 2026 : परवानगी नसताना कोणी वापरला मोबाइल? कारवाई होणार का?

    April 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 266
    • अवांतर 181
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 383
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 550
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    April 13, 2026

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.