आण्णांचे दिवस कालच संपले. यथासांग विधीवत सगळं कार्य झाले. मला अटकळ होती तोच विषय माईने आज सकाळी सकाळी चहा पिताना काढला…
“एवढे दिवस पै-पाहुणे होते म्हणून घर भरलेले होते. काल त्यांची पांगापांग झाली. एक-दोन दिवसात तुम्ही सगळे निघाल आपापल्या रस्त्याने. परत सगळे कधी जमाल ते मला माहीत नाही. आज दुपारची जेवणं झाली की, उन्हं कलती व्हायच्या आधी घराचा सोक्षमोक्ष लावून टाका. यांच्या पाठीमागे मला हे सगळं हिशोबाचे एकटीला पेलवणार नाही. जमीन, कलमं, कष्टकरी वर्ग सगळ्यांना सांभाळायला मला जमणार नाही. ते असताना व्यावहारिक हिशोबापेक्षा माणुसकीचे हिशोब ठेवले गेले आणि संपत्ती जोडण्याऐवजी माणसं जोडली त्यांनी पंचक्रोशीत…”
माईला पुढे बोलवेना. डोळ्यांत दाटलेले अश्रू लपवत ती आत गेली. आम्ही भावंडं म्हणजे सुधाकरदादा, मी, सुमतीताई आणि कुसुम एकमेकांकडे सुन्न नजरेने पाहात राहिलो. मी खुणेनेच सुमतीताई आणि कुसुमला शांत रहायला सांगितले. त्या दोघी आत निघून गेल्या.
हेही वाचा – विचार, संस्कार अन् जीवनमूल्यांचं कुंपण…
“दादा, आमचं म्हणजे माझं, सुमतीताई आणि कुसुमचं सगळं ठरलं आहे. माई म्हणाली तसं दुपारच्या जेवणानंतर मी याविषयी आमच्या तिघांचं म्हणणं माईला सांगणार आहे. तू निश्चिंत रहा अगदी.”
दुपारची जेवणं जणूकाही अबोला असल्यागत झाली. मागचं सगळं आवरून झाल्यावर आम्ही सगळे माई भोवती बसलो आणि मी बोलायला सुरुवात केली…
“माई, या विषयावर मी सुमतीताई आणि कुसुम सोबत गेल्या आठवड्यातच सविस्तरपणे बोललो आहे. आमचं एकमत झाले चटकन्. शेवटी आण्णांचे आणि तुझेच संस्कार झिरपले आहेत आमच्या नसानसात. माई आम्हा तिघांनाही या घराच्या वाटण्या नको आहेत. आमचं जे काही आहे ते तुझं आणि सुधाकरदादाचंच आहे आणि शेवटपर्यंत राहू दे. आमच्या हक्काच्या विनाअट सोडचिठ्ठीची कागदपत्रे एक-दोन दिवसात देण्याचे काळे वकिलांनी कबूल केले आहे. ती हातात आल्यावर त्यांवर सही करून ते सगळे दस्त मी तुझ्या हवाली करीन…”
“माई ज्या घरात आम्ही जन्मलो… मोठे झालो… ते हे ऐसपैस घर. माजघरातल्या कोपऱ्या-कोपऱ्यात आठवणींचे आरसे लावलेले आहेत, ज्यात डोकावल्यावर बालपणीचे दिवस आठवतात. ज्या देवाच्या खोलीत पिढीजात देव पुजले गेले आणि दीड दिवसाचा गणपती देखण्या नक्षीदार मखरात मोठ्या थाटामाटात विराजमान व्हायचा, त्या खोलीचे वारसा हक्काच्या लोभापायी भाग करायचे? जिथे आण्णांनी रोजच्या रोज आमच्याकडून तोंडपाठ करून घेतलेले पाढे आणि परवचे, स्तोत्र आणि श्लोक म्हटले जायचे, जिथे नीजानीज होताना तुझ्या मांडीवर डोके ठेवून अंगाई गीतं ऐकली जायची, जिथे संस्कारांच्या उंच माडाची बीजं आण्णांनी आम्हा सगळ्यांच्या मनांत कायमची रुजवली त्या वास्तूला हक्कांच्या कुंपणात बंदिस्त करायचं? नाही माई. ती कल्पनाच काळजात थरकाप उडवणारी आहे. आम्ही त्या कल्पनेचे शिकार नाही होणार. ते कदापि शक्य नाही!”
“माई, सुधाकरदादा जात्या हुशार होता. पण आण्णांच्या पोस्टातील नोकरीच्या तुटपुंज्या पगारात आपलं जेमतेम भागायचं. नाही म्हणायला जमिनीतून थोडं फार पिक यायचं. दादाने शालांत परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून देखील पुढे शिकायला नकार दिला. मास्तरकीचा कोर्स पूर्ण करून त्याने झेडपीच्या शाळेत शिक्षकाची नोकरी धरली. पण हे करताना आम्हा तिघांनाही पाहिजे तेवढे शिकायला दिले. मी शिष्यवृत्त्या मिळवत शिकत गेलो. पुढे परदेशी देखील गेलो. त्यासाठी आण्णांनी आपली जमीन गहाण ठेवली होती, जी यथावकाश दादाने शाळा आणि शिकवणीच्या जोरावर सोडवून आणली. माई, सुमतीताई आणि कुसुम त्यांच्या संसारात पूर्णपणे सुखी आहेत. मला देखील कसलीही आर्थिक काळजी नाही…”
हेही वाचा – मुलाचं परदेशी शिक्षण अन् मातृत्वाची परीक्षा!
“इतकं सगळं होत असताना दादाने आणि सुमावहिनीने घर सांभाळून आम्हाला आमच्या पायांवर उभे केले. या सगळ्या गोष्टीतून मिळणारे समाधान लाख मोलाचे आहे माई, जे आम्हाला उरलेल्या आयुष्यात कायम सोबत करणार आहे. माई म्हणूनच हे घर सर्वार्थाने तुझे आणि दादाचेच राहू दे तहहयात. ज्या घराने आणि घरातील प्रत्येकाने आजवर आपल्या घासातील एक तुकडा काढून भुकेल्या पोटाला शा़ंत केले त्याच घराचे तुकडे पाडण्याचा कृतघ्नपणा आमच्या कोणाच्याच हातून शेवटपर्यंत होणार नाही. आम्ही मात्र न चुकता वेळ मिळेल तेव्हा तुम्हा दोघांकडून लाड करून घेण्यासाठी हक्काने येत राहू. तेवढाच काय तो आमचा हक्क राहणार आहे यापुढे…”
“माई, आण्णांनी शेवटपर्यंत गावातील घराघरात मनीऑर्डरी पोहोचत्या केल्या काळवेळ न बघता. मला खात्री आहे की, आमच्यावर तुम्ही दोघांनी केलेल्या संस्कारांमुळेच एका क्षणांत झालेल्या आम्हा तिघांच्या या निर्णयाची मनीऑर्डर देवाकडे विश्रांती घेणाऱ्या आण्णांच्या हाती नक्की पोहोचेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा पाऊस बरसत राहील…”


