डॉ. किशोर महाबळ
“सर, आम्ही शाळेत असल्यापासून अनुभव घेत आलो आहोत की, कोणताही शिक्षक किंवा शिक्षिका सामान्यतः विद्यार्थ्यांवर टीका करण्याची एकही संधी वाया घालवत नाही. याउलट, गेली काही वर्षे आम्ही बघतोय की, तुम्ही शिक्षक असलात तरी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा विद्यार्थ्यांचे कौतुक करत आहात. वारंवार हे घडत आहे. हे कसं?” एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने प्राध्यापकांना विचारले.
प्राध्यापकांनी उत्तर दिले, “याला दोन कारणे आहेत. खूप पूर्वी, मी एक अवतरण वाचले होते ज्यात म्हटले होते, “हजारो प्रतिभा तुमच्या नजरेस पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत” (“A thousand talents await recognition). दुसरे कारण म्हणजे, मला महान कलाकार, शास्त्रज्ञ, समाजसुधारक, विद्वान, तत्वज्ञ आणि लेखकांची चरित्र तसेच आत्मचरित्र वाचण्याची आवड आहे. या वाचनामुळे या पुस्तकांमधून लक्षात येणारी सर्वात समान गोष्ट म्हणजे, त्यांच्या शिक्षकांनी या महान व्यक्तींची प्रतिभा, बुद्धिमत्ता, गुण आणि प्रयत्नांकडे त्यांच्या बालपणात दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आज एक प्राध्यापक म्हणून मला वाटते की, तीच चूक मी करू नये. माझ्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे गुण आणि प्रतिभा असल्याचे मी नेहमीच पाहात आलो आहे. योग्य प्रेरणा आणि थोड्याशा कौतुकाने ते या गुणांचा नक्कीच विकास करू शकतील. हेच कारण आहे की, तुमच्या प्रतिभेचे कौतुक करण्याची आणि ते ओळखण्याची कोणतीही संधी मी कधीही वाया घालवत नाही.”
हेही वाचा – ‘तू मूर्ख’ आहेस!
“खरंतर, माझ्या मर्यादित ज्ञानामुळे मी प्रत्येक विद्यार्थ्याची प्रतिभा योग्य प्रकारे ओळखू शकत नाही. म्हणूनच, मी विविध प्रकारच्या बुद्धिमत्ता आणि प्रतिभेबद्दलचे माझे ज्ञान सुधारण्यासाठी आता मानसशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. जेणेकरून मी किमान विविध प्रकारच्या प्रतिभा ओळखू शकेन.” प्राध्यापकांची ही भूमिका एकून विद्यार्थ्यांच्या मनातील त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला.
हेही वाचा – शिक्षा नको, सुसंवाद हवा
(कै. डॉ. किशोर महाबळ यांच्या ‘Recognition of talent’ या कथेचा आराधना जोशी यांनी केलेला हा स्वैरानुवाद)