तंदुरी पनीर कबाब
साहित्य
- पनीर – 1 वाटी
- दही – 1 वाटी
- टोमॅटो – 1
- भोपळी मिरची – 1
- लहान कांदे – 2
- लसूण पाकळ्या – 8
- मोठा कांदा – 1
- हिरव्या मिरच्या – 3
- आल्याचा किस – 1 चमचा
- लाल तिखट – पाव चमचा
- गरम मसाला – अर्धा चमचा
- मीठ – चवीनुसार
- टूथ पिक्स किंवा हिरकाड्या
हेही वाचा – Recipe : कुरकुरीत मुरकू आणि चिडे
कृती
- दीड लिटर दुधाचे पनीर करावे किंवा तयार पनीर घेऊन ते फडक्यामध्ये ठेवून त्यावर वजन ठेवावे.
- थोड्या वेळाने पनीरचे चिंचोक्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे चौकोनी तुकडे कापावे.
- लसूण, आले, मिरच्या आणि मोठा कांदा एकत्र वाटून मसाला तयार करावा.
- वाटलेला मसाला, दही, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ एकत्र करून, त्यावर चार चमचे पाणी घालून मिसळावे आणि त्यात पनीरचे तुकडे बुडवून ठेवावे.
- पनीर-मसाला असलेले भांडे दोन तास मुरण्यास बाजूला ठेवावे.
- लहान कांद्याचे चौकोनी काप करावे. भोपळी मिरची आणि टोमॅटोचे देखील लहान चौकोनी तुकडे करावेत. हे तुकडे आणि कांद्याचे काप शक्यतो पनीरच्या आकाराचे असावेत.
- या भाज्यांच्या तुकड्यांना थोडे तिखट-मीठ लावावे. काडी किंवा टूथ-पिक घेऊन या काडीत कांदा, मिरची, टोमॅटो आणि पनीरचा तुकडा, पुन्हा टोमॅटो, मिरची, कांद्याचा तुकडा खोचावा.
- अशा सर्व काड्या तयार करून, ओव्हनमध्ये भाजण्यास ठेवाव्या. भाजायचे नसेल, तर पनीरचे तुकडे तुपावर तळून घेऊन, मधे पनीर आणि खाली-वर भाज्यांचे तुकडे खोचून, सॉसबरोबर खाण्यास द्यावे.
कुरकुरीत भेंडी
साहित्य
- भेंडी – पाव किलो
- लाल तिखट – दोन चमचे
- धणे पूड – अर्धा चमचा
- जिरे पूड – अर्धा चमचा
- दालचिनी पूड – पाव चमचा
- आमचूर – अर्धा चमचा
- शेंदेलोण – अर्धा चमचा
- पादेलोण – अर्धा चमचा
- मीठ – चवीनुसार
- तेल – तळणापुरते
हेही वाचा – Recipe : कारल्याची भाजी अन् कारल्याच्या चकत्या!
कृती
- शक्यतो कोवळी भेंडी घेऊन त्या मिठाच्या पाण्याने धुऊन आणि पुसून कोरड्या कराव्या.
- भेंड्यांचे देठ आणि शेंडे कापून टाकावे. (वाटल्यास भेंडीचे उभे काप करावेत.)
- सर्व भेंड्या तेलातून तळाव्या. भेंड्यांना लालसर रंग आल्यावर त्या तेलातून बाहेर काढाव्या.
- सर्व मसाले एकत्र करून, तो मसाला भेंड्यांवर भुरभुरावा आणि भेडी त्यात घोळवावी.
- आपल्या आवडीप्रमाणे मीठ लावावे आणि खाण्यास द्याव्या.
(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर,
avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


