भारतातल्या पहिल्या स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशींवर श्री. जा. जोशींनी लिहिलेली ‘आनंदी गोपाळ’ कादंबरी खूप लोकप्रिय झाली. या आधीही त्यांच्याबद्दल काशीबाई कानिटकरांनी लिहिले होते. कादंबरी रंजकतेने लिहिली असल्यामुळे खूप भावली. मध्यंतरी त्यावर सिनेमाही आला, तोही गाजला. आनंदीबाईंवरची कादंबरी वाचल्यावर त्यांच्याबद्दल कुतूहल वाटलं होतं.
‘डॉ. आनंदीबाई जोशी, एका ध्यासाचा प्रवास’ हे चरित्रात्मक अनुवादित पुस्तक अलीकडे वाचले. डॉ. नंदिनी पटवर्धन यांनी इंग्रजीत लिहिलेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. श्रुती फाटक यांनी केला आहे. हे पुस्तक वाचताना जाणवत राहिले की, ‘आनंदी गोपाळ’ कादंबरीचा पगडा मनावर आहे, मनात सर्व पात्रांच्या प्रतिमा तयार आहेत… पण चरित्र आणि कादंबरी यात असलेला मुलभूत फरक लक्षात घ्यायला हवा. या पुस्तकात असलेले लेखन तथ्यांवर आधारित आहे. कादंबरीकाराला साहित्यिक सूट असते ती इथे नाही… तरी हे पुस्तक स्तिमित करते. अजिबात एकसुरी होत नाही.
एका सामान्य घरातली कल्याणला राहणारी मुलगी पतीच्या साथीने, अदम्य इच्छाशक्तीच्या बळावर अमेरिकेत जाऊन डॉक्टर होते… हे धाडस कल्पनातीत वाटू लागते. सात समुद्र पार करणे पाप आहे, स्त्रियांनी शिकणे पाप आहे, ब्राह्मणाने इतरांच्या हातचे खाणे पाप आहे, अशा अनेक समजुती किंवा कठोर निर्बंध असलेल्या समाजाचा भाग असलेले हे जोडपे. गोपाळरावांना विधवेशी विवाह करायचा होता, पण ते जमले नाही. त्यामुळे हुंडा न घेता केवळ ‘मुलीला शिकवेन’ या अटीवर त्यांनी नऊ वर्षांच्या मुलीशी विवाह केला. या मुलीचं माहेरच नाव यमू. तिला वडिलांनी सुद्धा शिकवायला सुरवात केली होती. लग्न झाल्यावर नवऱ्याचा शिकण्याचा आग्रह आणि घरच्या स्त्रियांचा शिकू न देण्याचा निर्धार, यात आनंदी अडकली होती. मग गोपाळरावांनी अलिबागला बदली करून घेतली. आनंदीचे शाळेत जाणे, बूट घालणे, घोडागाडीतून जाणे, पती-पत्नीचे फिरायला जाणे इत्यादी समाजाला मान्य नसल्याने अवहेलना सहन करावी लागली.
आनंदी बारा वर्षांची असताना आई झाली आणि मूल काही दिवसांत गेले. त्यावेळी तिने ठरवले की, मी शिकून डॉक्टर होईन. गोपाळरावांची विलक्षण जिद्द आणि त्यांनी केलेला त्याग, यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते. आनंदीला एकदा विचारले की, “तुझे ध्येय काय?”
यावर ती म्हणाली, “To be useful.”
वाचून अंगावर काटा आला. पंधरा-सोळा वर्षांची कोवळी मुलगी इतके प्रगल्भ उत्तर देते! तिला जीवनाचा अर्थ फार लवकर उमगला होता. तिची प्रखर बुद्धिमत्ता या तीन शब्दांत सामावली आहे. Victor Frankle चं ‘Man’s search for meaning’ नावाचे गाजलेले पुस्तक आहे. माणसाच्या जीवनाचा नेमका अर्थ हाच आहे, हे या मुलीला इतक्या कोवळ्या वयात उमगले होते!
आता स्त्रियांनी परदेशात जाऊन शिक्षण घेणे, फारच सामान्य घटना आहे. पण त्या काळाचा विचार केला तर, आव्हानांचा डोंगर दिसतो. कॉलेजमध्ये इंग्लिश शिकताना त्रास होऊ नये म्हणून आजकाल मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवत नाहीत. आनंदीने त्या काळी इंग्लिश शिकून मेडिकलची गलेलठ्ठ पुस्तकं वाचून कशी आत्मसात केली असतील? ती प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन डॉक्टर झाली आहे! एकटीने बोटीने प्रवास करायचा, तोही महिनोमहिने… शाकाहारी अपुरे जेवण, त्यात तब्येत साथ देत नाही… बोलायला सुद्धा भाषा समजणारी व्यक्ती नाही, अशा परीस्थित ती अमेरिकेला जाऊन शिकली, ते केवळ लोकांना उपयोगी पडावे म्हणून!
हेही वाचा – बनगरवाडी… लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी
गोपाळराव एकदा लिहितात की, त्यांना विधुर झाल्यासारखे वाटत आहे. आपल्या देशात, माणसांत राहून त्यांना इतका एकटेपणा वाटत होता; मग परक्या देशात तिचे काय झाले असेल? आनंदीने गोपाळरावाना लिहिलेली पत्रे अमेरिकेतल्या वर्तमानपत्राने छापली. लेखिकेने पुस्तकात त्यातला काही मजकूर दिला आहे…
“माझ्या जातीतल्या लोकांच्या आणि माझ्या सुहृदांच्या विरोधाला तोंड देऊन निर्धाराच्या बळावर मी येथे तुमच्या देशात आले आहे. या विरोधामुळेच माझा हेतू साध्य करण्यास एवढा खडतर मार्ग चालायचं बळ मला मिळाले. माझ्या मातृभूमीतील असहाय्य स्त्रियांच्या आरोग्यासंबंधी यातना दूर करण्याचे माझे ध्येय आहे. या स्त्रिया, स्त्री डॉक्टरांच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या आहेत. कारण, मृत्यू आला तरी पुरुष डॉक्टरांकडून त्या उपचार करून घेणार नाहीत. माणुसकीचा कौल माझ्या बाजूने आहे, त्यामुळे अपयश येऊन चालणार नाही. ज्यांना स्वत:ला मदत करता येत नाही, अशांना मदत करण्यासाठी माझं मन आसुसलेलं आहे. मला खात्री आहे की, परमेश्वर, जो या कामात माझ्यामागे उभा आहे, तोच अनेकांना या कामात मदत करण्याची प्रेरणा देईल. तेच लोक मला आवश्यक असलेली मदत आणि सहाय्य करतील.”
असे पत्र तिने मेडिकल महाविद्यालयाच्या डीनना कॉलेजात प्रवेश द्यावा आणि आर्थिक मदत द्यावी, म्हणून लिहिले होते. फिलाडेल्फिया, बोस्टन आणि न्यूयॉर्क यामधली कॉलेज आनंदीला प्रवेश द्यायला उत्सुक होती; कारण तिथेही स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे म्हणून संघर्ष करावा लागला होता. नियमांना मुरड घालून तिला अठराव्या वर्षीच प्रवेश मिळाला. थिओडोशिया आणि बेंजामिन कारपेंटर या दाम्पत्याने तिला मुलीप्रमाणे सांभाळले. आनंदी त्यांना मावशी म्हणायची. त्यांनी तिला आधार दिला नसता तर, आनंदीला डॉक्टर होताना अजून त्रास सहन करावा लागला असता. सामान्य माणूस असामान्य कृती घडवून आणत असतो, तेव्हा असा कितीतरी जणांचा खारीचा वाटा असतो.
आनंदीबाई आणि गोपाळराव यांच्यातला पत्र व्यवहार लेखिकेने अभ्यासला आहे. पत्रे विलक्षण आहेत. आनंदीच्या पत्रातला काही मजकूर असा –
“शांत वृत्ती ही प्रत्येक हिंदू नवर्यास आपल्या बायकोपासून शिकायला उत्तम मार्ग आहे.”
“जर माझ्या शिक्षणाचा थोडाबहुत उपयोग मनुष्यप्राण्यांस व्हावा, असा ईश्वरी संकेत असला, तर एखाद्या परक्या राष्ट्रापेक्षा मी हिंदुस्थानातच अधिक उपयोगी होण्याचा संभव आहे.”
“आपण इकडे आल्यास परत जाणार नाही, असे आपले निश्चयाचे बोलणे ऐकून जरासे वाईट वाटते. आपला निश्चय फिरवायाचा नसल्यास आपण येण्याचेच तहकूब करावे, हे बरे. चार वर्षे कशीतरी काढीन. आपण इकडे घर करून राहिल्याने तिकडचे लोकांस कित्ता तो कशाचा घालून देणार? आपस्वार्थीपणाचाच की नाही? तर तो सर्वमान्य नाही. सज्जन त्यास मान देत नाहीत. खरा कित्ता घालण्याची जागा अमेरिका नव्हे. योग्य कित्ता घालण्यास हिंदुस्थानापेक्षा दुसरा योग्य देश सापडेल की नाही, याची शंका आहे.”
आनंदीला बालविवाह या विषयावर बोलायची संधी मिळाली, तेव्हा ती या प्रथेच्या विरुद्ध काही बोलली नाही, यामुळे श्रोत्यांची निराशा झाली; पण तिने हिंदुस्तानाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याचा निश्चय केला असल्याने फक्त स्वतःचे अनुभव सांगितले. तिने भारतात असतानाच ठामपणे सांगितले होते की, ती हिंदू आहे आणि कायम राहील.
गंमत म्हणजे, तिच्या कारपेंटर मावशीने लिहिले आहे की, “तिचे घर आनंदीमुळे हिंदू होत आहे.”
आनंदीच्या प्रबंधाचा विषय होता ‘Obstratics in Aryan Hindoos’ भारतात प्रसूतीनंतर आयुर्वेदिक उपचार पद्धतीने जी काळजी घेतली जाते, त्याचे सविस्तर वर्णन यात होते. तिने इतक्या बारीकसारीक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत की, त्या काळच्या भारतातल्या वैद्यकाच्या त्या निदर्शक आहेत. ती म्हणते, “पापाच्या भीतीने का होईना, प्रसुतेची काळजी घेतली जाते.” हे वाक्य काही जणांना पटणार नाही, पण मला पटले आहे.
हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!
आनंदीची तब्येत ठीक नसताना तिचा अभ्यास सुरू होता. गोपाळराव अमेरिकेत आल्यावर त्यांच्यातले खोडकर बालक जागे झाले होते, त्यामुळे त्यांनी विक्षिप्त मतप्रदर्शन करून भाषणे दिली. आनंदीला अभ्यासात मदत करणे सोडाच तिला मानसिक त्रास दिला, कारण कुठेतरी मत्सर जागा झाला होता. दोघांचे संबंध तणावाचे झाले होते.
विमेन्स मेडिकल कॉलेज पेनिसिल्वेनियाच्या 34व्या पदवीदान समारंभात आनंदीला पदवी दिली गेली. पंडिता रमाबाई उपस्थित होत्या. गोपाळरावांनी मात्र मिशनरी, अमेरिकन लोक, त्यांची संस्कृती यावर ताशेरे ओढायला सुरवात केल्याने आनंदीची स्थिती बिकट झाली.
इंग्लंडच्या राणीचा स्त्रीशिक्षणाला विरोध होता, पण तिनेही आनंदीचे डॉक्टर होणे गौरवास्पद मानले. त्यामुळे आनंदीचा हिंदुस्थानात वैद्यकीय सेवा देण्याचा मार्ग खुला झाला.
प्रकृती ठीक न राहिल्यामुळे आनंदीला भारतात लवकर परतावे लागले. त्या आधी ती कारपेंटर मावशीकडे राहायला गेली असता तिच्या मैत्रिणींनी दिलेल्या कापडाच्या तुकड्यांना जोडून त्यावर कलाकुसर करून क्रेझी क्विल्ट (गोधडी) तयार केली. आज राजा केळकर संग्रहालयात ती आहे. आनंदीला परतताना बोटीवर फार वाईट वागणूक मिळाली. तिला पुरेसे खायला मिळाले नाही, वर्णद्वेषाचा सामना करावा लागला… त्यामुळे तिची प्रकृती आणखी खालावली. त्यातच गोपाळरावांबरोबर ती आपले दुःख वाटून घेऊ शकत नव्हती. मनात दुख साठवून ठेवल्याचा दुष्परिणाम झाला.
मृत्यूनंतर आपली थोडी रक्षा थिओडोशिया मावशीकडे पाठवावी आणि त्या कुटुंबीयांबरोबर दफन करावी, अशी इच्छा आनंदीने व्यक्त केली होती. त्यानुसार कलश अमेरिकेत पाठवला गेला आजही तिथे तिचे स्मृतीचिन्ह आहे.
‘द इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन (IAU)’ ही संस्था ग्रहांना आणि त्यांच्या विशेष पैलूंना नामनिर्देश करण्याची प्रथा पाळते. शुक्राची देवता स्त्री असल्याने त्याच्यावरच्या 900 विवरांना जगभरातल्या इतिहासात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्त्रियांची नावे दिली आहेत. त्यातील एका विवराचे नाव आनंदी जोशी आहे.
डॉ. आनंदीबाई जोशींच्या प्रखर बुद्धीमत्तेपुढे दिपून जायला होते. तिने भारतीय स्त्रीवर महान उपकार केले आहेत. तिने ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही, ती जशी अमेरिकेत गेली तशीच तितकीच भारतीय राहून परत आली. तिने याहून वेगळा व्यवहार केला असता तर स्त्रियांना शिक्षण द्यायला कोणी धजावले नसते. आधीच स्त्री शिक्षणाला विरोध करणार्यांचे फावले असते. एवढ्या लहान वयात असलेली परिपक्वता, समज आणि त्याहूनही महत्त्वाचे जीवनाचे सापडलेले उद्दिष्ट हे सगळे अद्भुत वाटते. तिने अनंत हालअपेष्टा सोसल्या, विक्षिप्त पतीने तिच्या अडचणी वाढवल्या पण तिने ध्येय पुरे केले.
पुस्तक वाचताना माझ्या डोळ्यासमोर कोवळी तरुण बुद्धिमान, तेजस्वी डोळ्यांची मुलगी येत राहिली आणि ती डॉ. आनंदीबाई जोशी ऐवजी ‘आपली आनंदी’ वाटू लागली!


