Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!
    अवांतर

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरMarch 26, 2026Updated:March 26, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, कौसल्येचा राम, रामनवमी विशेष लेख, रामनवमी स्पेशल आर्टिकल, एकवचनी राम, रामाचा महिमा, रामाचा वनवास, राम सीता लक्ष्मण, लक्ष्मण उर्मिला, दशरथ कैकेयी, कैकेयी मंथरा, कौसल्या कैकेयी, राम रावण युद्ध, रावणाचा अहंकार, रामभक्त हनुमान, रामभक्त शबरी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रामनवमी विशेष


    कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम
    भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम
    कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम…

    श्रीराम! संपूर्ण भारताचं आराध्य आणि लाडकं दैवत! रामनाम घेतले की, सगळी संकटं दूर होतात, तो सर्व परिस्थितीमध्ये आपला पाठीराखा असतो, ही सर्व भारतीयांची श्रीरामाच्या प्रती भावना आहे. तो आपल्यातीलच एक वाटत असल्यामुळे आपण त्याला ‘राम’ अशा एकेरी नावाने संबोधतो. सावळा, नीलवर्णी असा विरळा रंग असलेला, मानवजन्म घेऊनही आपले आगळेपण राखणारा राम! तो आपल्या प्रत्येकाचा हृदयस्थ आहे. वर्षानुवर्षे आपण रामायण ऐकतो, तीच कथा कितीतरी विद्वानांनी आपापल्या रसाळ वाणीत मांडली, पण आजही संपूर्ण कथा माहिती असूनही नव्याने ऐकताना रटाळ वाटत नाही, अशी अवीट गोडीची कथा आजची पिढीदेखील तिला आधीच्या पिढीइतकीच तल्लीनतेने ऐकते. त्यानुसार आचरण करायचा ही पिढी प्रयत्न करते, रामासारखा पुत्र असावा, अशी मनोकामना आजही प्रत्येक कुटुंबाची असते.

    असा हा राम जो फक्त सूर्यवंशी दशरथ राजा आणि महाराणी कौसल्येचा न राहता सामान्य जनमानसात देव म्हणून गणला गेला. हा राम आपल्या अलौकिक आणि दिव्य व्यक्तिमत्वाने युगानुयुगे देवत्व प्राप्त करून लोकांच्या मनावर अधिराज्य करतो आहे. रामाला त्याच्या भक्तांनी ज्या दृष्टिकोनातून पाहिले, त्यांना तो तसा दिसला आहे.

    श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले गेले आहे, ज्याच्या मर्यादा अमर्याद असूनही तो मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखला जातो, हेही त्याचे विशेष रूप आहे. संयमी,  धीरगंभीर, आज्ञाधारक, मातृ-पितृभक्त, एकवचनी, एकपत्नी व्रत धारण करणारा असा श्रीराम!! कर्तव्यकठोर, स्वतःच्या सुखाच्या आधी दुसऱ्याचा विचार करणारा, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजणारा, आपल्या प्रियजनांचा आदर करणारा, त्यांची काळजी घेणारा आदर्श पुत्र, आपल्या प्रजेच्या हिताकरिता झटणारा आदर्श राजा, आपल्या पत्नीवर लागलेला कलंक पुसण्याकरिता तिला अग्निपरीक्षा द्यायला लावणारा पती, आपल्या भावांवर अतोनात प्रेम करणारा प्रेमळ भाऊ, आपल्या गुरुजनांसाठी दानवांचे निर्दालन करणारा एक विनम्र शिष्य असा एकमेवाद्वितीय फक्त श्रीराम आणि श्रीरामच! असा हा राम तुमच्या आमच्यात सगळ्यांमध्ये वसलेला आहे, त्याला फक्त शोधायची गरज आहे, ज्याला तो समजला, त्याची नैया पार झाली, असे समजायचे! दुर्दैवाने आपल्याला राम लवकर समजतच नाही, तो समजायला दीर्घ काळ वाट पहावी लागेल, म्हणून त्यासम तोच आहे!

    हेही वाचा – अमृताहूनी गोड माझी माय मराठी!

    राम रावात आहे, राम रंकात आहे, त्याला राजा आणि रंक सारखेच आहे., भेदाभेद रामाला माहीत नाहीत. ते आपण निर्माण केले आहेत. राम हा काही एका विशिष्ट समूहाचा नाही तर, तो अखिल विश्वाचा त्राता आहे. रामासमोर सारे जग खुजे आहे, त्याच्याशी कोणाची तुलना करणे आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही. आजही एवढी युगे उलटूनही तो तितकाच वंदनीय आहे. तुलसीदासांनी जर तो आपल्या ‘रामचरीत मानस’मधून प्रकट केला आहे तर, कबीराने त्याला आपल्या दोह्यांमध्ये विणले आहे, असा हा बंधनमुक्त श्रीराम!! युगंधर, धनुर्धर, बलशाली, पराक्रमी, युगपुरुष श्रीराम!! अवतारी श्रीराम!!

    रामासारखे आदर्श जीवन जगणे कठीण आहे, म्हणून तो सर्वोच्च आहे. अशा या रामाला अगणित संकटांचा सामना करावा लागला; पण कुठेही आपला तोल ढळू न देता तो त्यातून शांतपणे बाहेर पडला, म्हणून तो धीरोदात्त आहे. रामासारखा असा कोणताही राजा आजपर्यंत झाला नसेल की, ज्याच्या फक्त पादुका सिंहासनावर विराजमान करून त्याच्या नावाने राज्यकारभार चालवला गेला असेल… म्हणून तो सर्वोत्तम आहे. ज्या कैकेयीमुळे त्याच्यावर इतकी संकट आली, एक राजकुमार असूनही वनवास भोगावा लागला, राज्याभिषेकाच्या वेळेस राजपाट सोडावा लागला तरीही त्याने कधी कैकेयी मातेचा राग केला नाही किंवा तिच्याबद्दल मनामध्ये कुठलीही कटू भावना बाळगली नाही, असा तो सुपुत्र श्रीराम! आपल्या पित्याने सावत्र आईला दिलेल्या वचनाचा मान राखण्याकरिता पित्याची आज्ञा शिरोधार्थ मानणारा असा तो नरोत्तम श्रीराम!

    संपूर्ण रामायणातल्या व्यक्तिरेखा आपल्याला काही ना काही शिकवूनच जातात. आजच्या कलियुगातही कैकेयीसारखी हलक्या कानाची आई असेल तर, तिच्या मनात विष कालवणारी मंथराही कुठे ना कुठे असतेच! तर अशाच कैकेयीच्या पोटी भरतासारखा सुपुत्र जन्म घेतो. ज्याच्या मनामध्ये सख्खा आणि सावत्र असा भेद नसतो. लक्ष्मणासारखा रामाची पाठराखण करणारा भाऊ असतो… तर राम वनवासात असताना कधीही न झोपणाऱ्या लक्ष्मणाच्या वाटणीची झोप आपल्या वाटणीत घेणारी ऊर्मिलेसारखी पत्नीही असते… जी एक प्रकारे राजमहालात राहूनही वनवासी जीवन जगते. हनुमंतासारखा रामभक्त असतो, ज्याची आपल्या प्रभूवरची भक्ती कुठेही विचलित होत नाही. कैकेयीने रामाला वनवासात पाठवले म्हणून तिचा  तिरस्कार न करणारी कौसल्याही असतेच, शिवाय आपल्या पत्नीला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या लाडक्या लेकाला वनवासात धाडणारा आणि त्याच्या पुत्रवियोगाने प्राण त्यागणारा दशरथही कुठेना कुठे असतोच!

    राम जितका स्वयंपूर्ण, वीर, सर्वगुणसंपन्न तशीच त्याला अनुकूल सीताही तितकीच संयमी, धीरोदात्त, पतीच्या प्रत्येक विचाराशी सहमत असलेली होती. कैकेयीने रामाला वनवासात पाठवले नसते तर, रावणाकडून सीतेचे हरण करण्याचा प्रमाद घडला नसता आणि त्यामुळे पुढील रामायणही घडले नसते आणि त्यामुळे समस्त मानव जातीला रावणाचा अहंकार घातक ठरला असत. राम या सर्व गोष्टी जाणून होता म्हणूनच त्याने 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. कैकेयी, मंथरा आणि सीता या तिघीच रामायण घडायला कारणीभूत होत्या, असं म्हटलं तर त्यात काहीचं वावगं ठरणार नाही. याच कारणांमुळे रामाला रावणासारख्या बलवान,  अहंकारी शत्रूचा नायनाट करता आला. आपला पराक्रम दाखवायला मिळाला. त्या वनवासामुळे सुग्रीव, बिभीषणासारखे मित्र भेटले… शबरी, केवटासारखे निरपेक्ष भावना ठेवणारे लोक मिळाले… हनुमानासारखा परमभक्त मिळाला… अहिल्येसारख्या सतीचा उद्धार रामाला करता आला… तो केवळ वनवासामुळे!

    कैकेयीने आपले वचन जर दशरथाकडून पूर्ण करून घेतले नसते तर, रामला देवत्व प्राप्त झाले असते का? राम त्याच्या राजवाड्यात इतर क्षत्रिय राजांसारखा राज्य करत राहिला असता, म्हणून रामायणात जितका राम महत्त्वाचा आहे तितक्याच सीता, उर्मिला, कौसल्या, मंथरा, कैकेयी पण महत्त्वाच्या आहेत.

    आपण सामान्य लोकही आपल्या रोजच्या जीवनात हे रामायण जगत असतो, आपल्या अवती भवती रामायणातील प्रत्येक व्यक्तिरेखा कुठे ना कुठे अनुभवायला आजही मिळतात. राम म्हणजे संघर्ष, कितीही संकटे आली तरी खवळलेल्या समुद्रात वादळाचा सामना करत असलेला स्थितप्रज्ञ दीपस्तंभ! जो रामावर विश्वस्त झाला त्याला राम पावला! म्हणून तर जो परिस्थितीशी लढताना हतबल होतो, निराश होतो त्याला जीवनात काही राम वाटत नाही! राम म्हणजे चैतन्य, राम म्हणजे स्फुल्लिंग, राम म्हणजे स्फूर्ती, राम म्हणजे चेतना! हे स्फुल्लिंग मनामनात जागृत असायला हवे, तरच जीवनात राम मिळेल!

    हेही वाचा – नागपूरची प्रसिद्ध काळी पिवळी मारबत!

    आजच्या एकवीसाव्या शतकातही रामाचा महिमा आपला प्रभाव टिकवून आहे. राम कधी विशिष्ट चौकटीमध्ये बंदिस्त नव्हता आणि राहणारही नाही, राम हा अवतारी आहे म्हणून विश्वव्यापी आहे. म्हणून तर संत कबीर यांना राम आणि रहीम एकच वाटतात. याच भावनेमुळे ए. आर. रहमानसारखा मोठा संगीतकार रामाच्या भजनाला सुमधुर संगीत देऊ शकतो तर, जावेद अख्तरसारखा गीतकार रामाचे गाणे लिहू शकतो. कारण त्यांना राम आणि रहीम यांच्यात फरक दिसत नाही. एखादा प्रबुद्ध सौरभसारखा कवी सगळ्यांचा राम एकच आहे, हे स्पष्ट करताना लिहून जातो की,

    न दौलत न शोहरत न कोई बल मांगे
    मन का मंगता उस दाता से इतना केवल मांगे
    मंगल को मैं बजरंगी से तेरा शुक्र मनाऊँ
    और शुक्र को तू अल्लाह से मेरा मंगल मांगे

    कौसल्येचा राम हा असा विश्वबंधुत्वाची, समर्पणाची, त्यागाची, आदराची मूर्ती आहे. राम अभयंकारी, निर्भय आहे! ज्याने आपल्या दृढ निश्चयाने प्रत्येक संकटावर विजय मिळवला म्हणून तो अजेय प्रताप वीर आहे. आजही आपल्यावर कोणते मोठे संकट आले असता आपण, “श्रीराम जयराम जय जय राम” या तेरा अक्षरी मंत्राचा जप करतो, जो तारकमंत्र आहे. श्रीरामरक्षा रोज बहुतेक घरात म्हटली जाते, कारण ते रामनामाचे सुरक्षाकवच आहे आणि अभेद्य आहे. त्याचे एकेक नाव जपणे म्हणजे पातकांपासून मुक्ती मिळवणे होय. कौस्यलेचा राम हा जनसामान्यांच्या हृदयात राहणारा स्वामी, सखा असलेला आत्माराम आहे.

    मी अशी कोण आहे की, मी रामावर लिहावे? पण तरी मला जसा राम भावला तसा तो मी माझ्या शब्दांत मांडला. रामाला अशी एकच विनवणी आहे की, “हे श्रीरामा सध्याच्या संकटकालातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला शक्ती दे, भक्ती दे, रामराया, अखिल मानवजातीला तुझे संरक्षण लाभू दे. एकदा तरी रामा आता तुझे दर्शन घडू दे. मंदिरात बंदिस्त नको राहू, मानवजातीचा तारणहार होऊन एकदा परत अवतार घे!”

    जय श्रीराम!!

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    April 6, 2026 अवांतर

    स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!

    March 31, 2026 अवांतर

    World Idli Day… इडलीकुमारीची कहाणी!

    March 30, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    By हर्षा गुप्तेApril 6, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… 3 जानेवारी 2011ला आमच्या सोसायटीमध्ये बेबी…

    स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!

    March 31, 2026

    World Idli Day… इडलीकुमारीची कहाणी!

    March 30, 2026

    वो भी क्या दिन थे…

    March 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 264
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 380
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 18
    • ललित 547
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.