सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानीं पडो ।
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो ॥
सदघ्रिकमळीं दडो, मुरडितां हटाने अडो ।
वियोग घडता रडो, मन भवच्चरित्रीं जडो ॥
भक्ती, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि मानसशास्त्र यांचा विलोभनीय संगम मोरोपंतांच्या या रचनेत पाहायला मिळतो.
हा श्लोक मनाच्या उत्क्रांतीचा आणि साधनेचा एक परिपूर्ण मार्गदर्शक आहे. यात मोरोपंत परमेश्वराकडे धन, यश, आयुष्य किंवा स्वर्ग अशा कोणत्याही भौतिक गोष्टीची मागणी करत नाहीत. ते केवळ एकाच गोष्टीची प्रार्थना करतात, ‘माझं मन योग्य दिशेला वळू दे.’ साधनेचा खरा प्रारंभ मनाच्या योग्य दिशेपासूनच होतो.
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानीं पडो
संगत हा मनाचा मुख्य शिल्पकार आहे. स्वाती नक्षत्रात पावसाच्या पाण्याचा एक थेंब शिंपल्यात पडला की, त्याचे रूपांतर मौल्यवान मोत्यात होते. संगतीमुळेच अस्तित्वाला मूल्य प्राप्त होते. व्यक्तिमत्त्व हे त्याचे विचार, अभ्यास, साधना, अनुभव, वाचन, श्रवण, संवाद आणि सभोवतालच्या वातावरणाचा भाग असते.
साधनेला योग्य संगतीचे खतपाणी लागते. सज्जनांचे बोल मनाला साधनेची, भक्तीच्या खऱ्या स्वरूपाची निरंतर आठवण करून देतात. मनाला योग्य वळण देण्यासाठी सत्संग ही आयुष्यभराची प्रक्रिया ठरते.
सत्सङ्गः सर्वसंपत्तेः बीजमेकमनुत्तमम् । यत्र चित्तं प्रसन्नं स्यात् तत्रैव परमं पदम् ॥
(गीताव्रत साधना)
सत्संग हे सर्वश्रेष्ठ संपत्तीचे बीज आहे. जिथे मन प्रसन्न, निर्मळ आणि उन्नत होते, तिथेच परमपदाचा मार्ग खुला होतो.
“कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो”
मोरोपंत बुद्धीवरील कलंक दूर होण्याची प्रार्थना करतात. अज्ञान, अहंकार, लोभ आणि मत्सर या विकारांची धूळ बुद्धीच्या आरशावर साचलेली असते. ही धूळ झटकून बुद्धीला पवित्र, समर्पित करणे म्हणजेच साधना.
हेही वाचा – गुरूमंत्र… शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता
‘विषय सर्वथा नावडो’
ही खऱ्या वैराग्याची आणि अनासक्तीची अवस्था आहे. फुलाचे सौंदर्य पाहावे, त्याचा सुगंध घ्यावा, आनंद लुटावा; परंतु त्या फुलाशिवाय जगता येणार नाही, फूल तोडावेसे वाटेल अशी बुद्धीच्या परावलंबनाची अवस्था निर्माण होऊ नये, हा याचा मूळ उद्देश आहे.
एका आश्रमातील दोन शिष्यांपैकी एकाला गुरूंनी दूर लोटले, तरीही तो शिष्य दररोज आश्रमाबाहेर बसून गुरूंना श्रद्धेने नमस्कार करत राहिला. त्याच्या मते, गुरूंनी त्याला केवळ आश्रमाबाहेर काढले होते, त्यांच्या कृपेच्या परिघातून नाही.
त्याची ही अढळ श्रद्धा पाहून गुरूंनी त्याला पुन्हा आश्रमात सन्मानाने बोलावले. समर्पण म्हणजे परिस्थिती बदलली तरीही श्रद्धेतील प्रेम आणि नितांत विश्वास कायम रहावा. हीच भावना मोरोपंतांनी पुढील कठीण ओळी लिहिली आहे,
सदंघ्रिकमळीं दडो, मुरडितां हटाने अडो
साधूंच्या आणि गुरूंच्या चरणकमळांत आश्रय घेण्याची ही ओढ आहे. एखाद्या लहान मुलाला आईने दूर लोटले तरी ते हट्टाने आईचाच पदर घट्ट धरून ठेवते ना, कारण त्याचा आईच्या प्रेमावर अढळ विश्वास असतो. भक्ती म्हणजे हाच ईश्वरावरचा निस्सीम विश्वास.
न त्यजामि पदाम्भोजं गुरोर्भक्तिपरायणः । त्यक्तोऽपि यदि लोकैःस्यां त्वयि मे नास्ति विस्मृतिः ॥
(गीताव्रत साधना)
गुरूंच्या चरणकमळांचा मी नेहमी आश्रय घेईन. जगाने मला दूर केले तरी, ईश्वराचे स्मरण माझ्या हृदयातून कधीही पुसले जाणार नाही.
वियोग घडता रडो, मन भवच्चरित्रीं जडो
हेही वाचा – अध्यात्मातल्या परिभाषेतील ‘स्थितप्रज्ञ ते स्थिरप्रज्ञ’
ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, संत मीराबाई आणि नामदेव महाराज यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे याच विरहाचे प्रतीक होते. परमेश्वराच्या भेटीच्या ओढीने डोळ्यांत येणारे अश्रू हे ईश्वरी कृपाप्रेमाचे सर्वोच्च प्रमाण आहे. हा विरह भक्ताला अधिक उन्नत करून ईश्वराच्या अधिक जवळ घेऊन जातो.
विरहो न दुःखहेतुः प्रेम्णः साक्षात्प्रकाशकः । यत्राश्रूणि प्रवर्तन्ते तत्रानन्दोऽपि वर्धते ॥
(गीताव्रत साधना)
भक्ताचा विरह हा दुःखाचे कारण नसून तो प्रेमाचाच प्रकाश असतो. जिथे प्रेमाचे अश्रू वाहतात, तिथे ईश्वरी आनंद अधिकाधिक विस्तारत जातो.
मन परमेश्वराच्या चरित्रात आणि चिंतनात एकरूप व्हावे, हेच या श्लोकाचे सार आहे. मन कधीही रिकामे राहत नाही; ते योग्य दिशेला वळवणे म्हणजेच भक्ती. समर्थ साधकाची खरी ओळख त्याच्या मनाच्या स्थैर्यात दडलेली असते. सुख-दुःख आणि यश, अपयशात त्याचे मन परमसत्याशी एकरूप राहिल्यामुळे तो कायम स्थिर राहतो.
ज्या दिवशी साधकाला सत्संगाची ओढ लागेल, गुरूंच्या सत्संगामध्ये, आध्यात्मिक सहवासामध्ये शांती मिळेल आणि परमेश्वराच्या स्मरणात जीवनाचे सार्थक वाटेल, त्या दिवशी त्याची साधना प्रयत्नांच्या पलीकडे जाऊन सहज स्वभावात रूपांतरित होते. मग तिथे कुठलेही भयंकर कठोर नियम उरत नाहीत, उरते ते केवळ निखळ प्रेम, समर्पण आणि अखंड भक्ती! जी ईश्वराच्या कृपेने सदैव फुलत असते.
सत्सङ्गभक्तिसंयुक्तं निर्मलं यस्य मानसम् । तस्य जीवितमेवास्ति देवयज्ञस्य मण्डपः ॥
(गीताव्रत साधना)
मन सत्संगात राहावे. सत्संगाने आणि भक्तीने मन परमेश्वराला ग्रहण करण्याच्या योग्यतेचे होते. ज्याचे मन सत्संग आणि भक्तीने निर्मळ झाले आहे, त्याचे संपूर्ण जीवनच परमेश्वराच्या अखंड कृपेचे पवित्र मंदिर, निवासस्थान होते.


