अध्याय पंधरावा
जैसें वाहतें पाणी जाय वेगें । तैसेंचि आणिक मिळे मागें । तेवी असंतचि असिजे जगें । मानिजे संत ॥133॥ कां लागोनि डोळा उघडे । तंव कोडीवरी घडे मोडे । ते नेणतया तरंगु आवडे । नित्यु ऐसा ॥134॥ वायसा एकें बुबुळें दोहींकडे । डोळा चाळितां अपाडें । दोन्ही आथी ऐसा पडे । भ्रमु जेवीं जगा ॥135॥ पैं भिंगोरी निधिये पडली । ते गमे भूमीसी जैसी जडली । ऐसा वेगातिशयो भुली । हेतु होय ॥136॥ हें बहु असो झडती । आंधारें भोवंडितां कोलती । ते दिसे जैसी आयती । चक्राकार ॥137॥ हा संसारवृक्षु तैसा । मोडतु मांडतु सहसा । न देखोनि लोकु पिसा । अव्ययो मानी ॥138॥ परि ययाचा वेगु देखे । जो हा क्षणिक ऐसा वोळखे । जाणे कोडिवेळां निमिखें । होत जात ॥139॥ नाहीं अज्ञानावांचूनि मूळ । ययाचें असिलेंपण टवाळ । ऐसें झाड सिनसाळ । देखिलें जेणें ॥140॥ तयातें गा पंडुसुता । मी सर्वज्ञुही म्हणें जाणता । पैं वाग्ब्रह्म सिद्धांता । वंद्यु तोची ॥141॥ योगजाताचें जोडलें । तया एकासीचि उपेगा गेलें । किंबहुना जियालें । ज्ञानही तेणें ॥142॥ असो बहु हें बोलणें । वानिजेल तो कवणें । जो भवरुखु जाणें । उखि ऐसा ॥143॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : एऱ्हवीं पिंपळु म्हणतां विखीं, मियां गति देखिली असे निकी
अर्थ
जसे वाहणारे पाणी जोराने जात असते व त्यास मागून तसेच वाहात येत असलेले पाणी मिळत असते, (त्यामुळे पहाणारास तेच पाणी आहे असे वाटते). त्याप्रमाणे हा संसासरवृक्ष अस्थिर असतांनाच लोक याला स्थिर असे मानतात. ॥133॥ अथवा डोळा मिटून उघडावा इतक्या वेळा अवकाशात लाट, कोट वेळा घडते व मोडते, (परंतु) ते लाटांचे कोटी वेळा होणे-जाणे ज्यास कळत नाही, त्याला लाट नित्य (एकसारखी) टिकणारी अशी वाटते. ॥134॥ एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यांत चलाखीने कावळा फिरवीत असल्यामुळे, त्याच्या दोन्ही डोळ्यांत बुबुळे आहेत, असा लोकांना भ्रम पडतो ॥135॥ भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते, तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते, याप्रमाणे (संसारवृक्षाचा) अतिशय वेग हा (स्थिरतेच्या) भ्रमाला कारण होतो. ॥136॥ हे राहू दे, अंधारामधे कोलती फार जोराने फिरवली असता ती ज्याप्रमाणे अखंड चक्राच्या आकाराची दिसते. ॥137॥ त्याप्रमाणे हा संसारवृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचला जात आहे, हे जगास न कळल्यामुळे वेडे लोक याला अविनाशी असे मानतात. ॥138॥ परंतु जो याचा वेग पहातो व हा क्षणभंगुर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यावधी वेळा हा उत्पन्न होतो व नाहीसा होतो, असे ज्यास ज्ञान असते, ॥139॥ या संसारवृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्वही मिथ्या आहे, असा हा वृक्ष जीर्ण सालीचा (नाशवंत) भासमात्र आहे असे ज्याने जाणले ॥140॥ अर्जुना, त्याला मी जो सर्वज्ञ तोही ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे. ॥141॥ सर्व प्रकारच्या योगांच्या अभ्यासाचे मिळालेले फळ, त्या एकट्याच्याच उपयोगाला गेले. फार काय सांगावे? ज्ञानदेखील त्या पुरुषाच्या योगाने जगले. ॥142॥ हे फार बोलणे राहू दे. जो पुरुष हा संसारवृक्ष केवळ मिथ्याभास आहे असे जाणतो, त्याचे कोणाला वर्णन करता येईल? ॥143॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कलियुगांतीं कोरडीं, चहुं युगांची सालें सांडी


